Latest

मित्राची ताटातूट झाल्याने खिन्न झाले सारस

Arun Patil

लखनौ : पशू-पक्षीही आपल्या रक्षणकर्त्याला लळा लावत असतात. अशाच एका सारस पक्ष्याची उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे राहणार्‍या मोहम्मद आरिफ या तरुणाशी दोस्ती जमली होती. या जखमी सारस पक्ष्यावर आरिफने उपचार करून त्याला बरे केले होते व हा सारस पक्षी त्यावेळेपासून सतत आरिफजवळच राहत होता. आरिफ मोटारसायकलवरून निघाला की, तो त्याच्या मागे उडत येत असे.

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही दोघांमधील ही मैत्री पाहण्यासाठी आले होते. मात्र वन्यजीवांना गावात किंवा घरात ठेवता येत नसल्याने त्याला कानपूरमधील प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आले. आरिफशी ताटातूट झाल्यानंतर हा सारस पक्षी आता उदास राहत असून, त्याचे खाणेही कमी झाले आहे!

कानपूर प्राणी उद्यानात या सारस पक्ष्याला 'क्वारंटाईन' करण्यात आले आहे. त्याने गेल्या दोन दिवसांमध्ये केवळ जिवंत राहण्यापुरतेच अन्न घेतले आहे. मंगळवारी दिवसभरात त्याने केवळ एक उकडलेला बटाटा आणि थोडा भात खाल्ला. त्याचा उत्साह वाढवण्याचा कीपर आणि डॉक्टरांचा प्रयत्न अपयशी ठरला. रविवारी रात्री त्याला खाण्यासाठी काही मासे देण्यात आले होते. त्यापैकी दोन-तीन छोटे मासेच त्याने खाल्ले. हा पक्षी खाण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने त्याच्या प्रकृतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच्या राहण्याच्या ठिकाणाजवळ दोन कीपर आणि एका डॉक्टरांची ड्यूटी लावलेली आहे.

तेथील एका कॅमेर्‍यातून त्याच्या सर्व हालचाली टिपल्या जात आहेत. त्याच्या आहाराचीही काळजी घेतली जात आहे. सकाळी त्याला मसूर आणि मक्याचे दाणे दिले जातील तर दुपारी उकडलेला बटाटा, भात दिला जाईल. रात्री त्याला मासे खाऊ घातले जातील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT