Latest

मिकी माऊसचे पहिले नाव ठाऊक आहे का!

Arun Patil

वॉशिंग्टन : डिस्नेच्या मिकी माऊस, मिनी, डोनाल्ड डक, गुफी, प्लुटोसारख्या कार्टून व्यक्तिरेखांना जगभर लोकप्रियता मिळालेली आहे आणि ती अनेक दशकांपासून आहे. मिकी माऊसने तर गुरुवारी आपला 93 वा वाढदिवस साजरा केला. वॉल्ट डिस्ने यांनी या चिमुरड्या, खोडकर, पण गोड उंदराला आधी 'मिकी' नव्हे तर वेगळेच नाव दिले होते हे अनेकांना ठाऊक नसेल. त्याचे पहिले नाव होते 'मोर्टिमर'!

मिकी माऊस हा काही डिस्ने यांचे पहिले कार्टून कॅरेक्टर नव्हते. त्यांनी तत्पूर्वी 'ओसवॉल्ट ः द लकी रॅबिट' या नावाने सशाचे कार्टून बनवले होते. 1927 मध्ये डिस्ने यांनी पहिल्यांदा अ‍ॅनिमेटेड चित्रपटांच्या मालिकेवर काम सुरू केले. पहिल्या चित्रपटात हा ओसवॉल्ट ससा होता. मोठ्या कानांचा हा ससा लोकांना आवडला.

युनिव्हर्सल पिक्चर्सने तर त्याचे कायदेशीर हक्कही खरेदी केले होते. कंपनीने डिस्ने यांना एकत्र काम करण्याची ऑफर दिली; पण डिस्ने यांनी नकार दिला. त्यावेळी कंपनीने डिस्ने ब्रदर्स स्टुडिओच्या अ‍ॅनिमेटर्सना आपल्या कंपनीत काम दिले. डिस्ने यांच्याकडे त्यावेळी स्वतःचे कार्टून कॅरेक्टर नव्हते.

एक दिवस ते डेस्कवर याबाबत विचार करीत बसले असतानाच तिथे एक चिमुकला उंदीर आला. त्याच्या उड्या, धावपळ त्यांना मजेशीर वाटली. त्यांनी तत्काळ उंदराचे पोर्ट्रेट बनवले. पोट थोडे मोठे केले, कान छोटे, हातात ग्लोव्ज, पायात बूट आणि पोशाखही घातला. नाव ठेवले 'मोर्टिमर'!

डिस्ने यांच्या पत्नीला हे नाव अजिबात आवडले नाही. त्यांनी त्याला साधेसोपे व गोड नाव दिले 'मिकी'! डिस्ने यांना आता ओसवॉल्टला टक्कर देण्यासाठी स्वतःचे कार्टून कॅरेक्टर मिळाले होते. त्यांनी 1928 मध्ये मिकी माऊसच्या शॉर्ट फिल्म 'प्लेन क्रेजी' आणि 'द गॅलोपिन गॅचो' बनवल्या. या लघुपटांना चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्याचवर्षी 'स्टीमबोट विली' हा अ‍ॅनिमेशनपटही आला. त्यामध्ये सिंक्रोनाईज्ड म्युझिकचा इफेक्ट टाकला होता. वर्षअखेरपर्यंत मिकी चांगलाच लोकप्रियही झाला!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT