बीजिंग : 'मायोपिया' हा डोळ्यांचा एक विशिष्ट आजार आहे. या आजारात रुग्णाला दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. अगदी दोन मीटर अंतरावरील वस्तूही त्याला अस्पष्ट दिसते. मायोपिया या आजाराचा प्रभाव कमी करणारा एक स्मार्ट चष्मा चिनी संशोधकांनी बनवला आहे. त्याच्या परिणामकारकतेच्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत.
चीनच्या वेंझाऊ मेडिकल युनिव्हर्सिटीने 167 मुलांना हा चष्मा घालून याबाबतची पाहणी केली. या मुलांना दिवसातून बारा तास हा चष्मा परिधान करण्यास सांगण्यात आले. दोन वर्षे असे केल्यानंतर मायोपियाचा परिणाम 67 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे दिसून आले. 'मायोपिया'च्या आजारात रुग्णाच्या बुबुळाची चहुबाजूंनी वाढ न होता ते केवळ रुंद होते.
त्यामुळे रेटिना म्हणजेच नेत्रपटलावर विपरित परिणाम झालेला असतो. त्यामुळे जवळच्या वस्तू जरी चांगल्या दिसत असल्या तरी दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही संशोधकांना यामागे जनुकीय समस्येचे कारण असावे असे वाटते. घराबाहेर अधिक वेळ न घालवणे हे त्यामागील एक कारण असू शकते असे काही संशोधकांना वाटते.
एका अन्य सिद्धांतानुसार डोळ्यांवर प्रखर प्रकाश पडल्याने रेटिनामधून डोपामाईन हार्मोन उत्सर्जित होऊ लागते आणि डोळ्यांवर विपरित परिणाम होतो. चष्म्याच्या काचेत विशिष्ट प्रकारची रिंग्ज बनवण्यात आली आहेत. या रिंग्ज रेटिनावर प्रकाश टाकतात जेणेकरून सर्व काही स्पष्ट दिसेल.