Latest

माध्यमे बदलली तरी पत्रकारांनी बातमी सांगण्याचे काम प्रामाणिकपणे करावे : डॉ. योगेश जाधव

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ऑनलाईनच्या काळात सोशल मीडियामुळे प्रत्येक जण पत्रकार बनला आहे. खरे-खोटे ठरवायला जनतेकडे वेळ नाही. त्यामुळे पत्रकारांची सर्वाधिक गरज येणार्‍या काळात वाढत जाणार आहे. येणार्‍या काळात माध्यमे बदलत राहतील, मात्र बातमी सांगणारा कायम राहणार असून ते काम पत्रकारांनी प्रामाणिकपणे करावे, असे आवाहन दै.'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी केले.

मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स असोसिएशनतर्फे आयोजित पत्रकार दिन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक प्रा. शिवाजीराव भुकेले होते.

डॉ. जाधव म्हणाले, इंटरनेट, सोशल मीडियाचा शिरकाव झाल्यापासून पत्रकारिकेत बदल झाला आहे. मात्र आजही वृत्तपत्रांची विश्वासार्हता कायम आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्याने माहितीचा विस्फोट झाला आहे. नव्या प्लॅटफॉर्ममुळे लोकांचा अटेंन्शन स्पॅन कमी झाला आहे; मात्र नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. ड्रीव्हन जर्नालिझम प्रकार देशात रूळू लागला आहे. हायपर लोकल न्यूज भविष्यकाळ असणार आहे. पत्रकारांना काळाप्रमाणे बदल करावा. माहितीच्या पुढे जाऊन बातमी मागची बातमी सांगावी लागेल. त्याचबरोबर आपण विकासाचे विरोधक होत नाही ना याची काळजी पत्रकारांनी घेतली पाहिजे.

प्रा. भुकेले म्हणाले, आताचे पत्रकार हे स्वत:ची वेगळी द़ृष्टी असणारे आहेत. त्यांनी राजहंसाप्रमाणे शेवटच्या घटकापर्यंत पत्रकारिता पोहोचविण्याचे काम करावे. संजय घोडावत पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी, पत्रकार ताज मुल्लाणी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी 'जागल्या' स्मरणिका व 'संतांचा जागर' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी दै. 'पुढारी'चे मोहसीन मुल्ला (जिल्हा उत्कृष्ट पत्रकार- इलेक्ट्रॉनिक मीडिया), ज्येष्ठ पत्रकार सुधाकर काशीद (जीवन गौरव पुरस्कार) यांना सन्मानित करण्यात आले. दै. नवराष्ट्रचे दीपक घाटगे (जिल्हा आदर्श आवृत्ती प्रमुख), प्रा. रवींद्र पाटील (जिल्हा उत्कृष्ट पत्रकार), जयसिंगपूरचे ग्रामीण वार्ताहर संतोष बामणे, (उत्कृष्ट सेवा पुरस्कार), एस न्यूजचे तानाजी पाटील (उत्कृष्ट छायाचित्रकार) यांच्यासह 12 तालुक्यांसह निपाणीतील ग्रामीण पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सचिव सुरेश पाटील यांनी अहवाल वाचन केले. अतुल मंडपे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रवींद्र पाटील यांनी आभार मानले. यावेळी सदानंद कुलकर्णी, सुरेश कांबरे, प्रा. भास्कर चंदनशिवे, धनाजी गुरव, दीपक मांगले उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT