Latest

माध्यम : …तर लोकशाहीच्या अस्तित्वालाच धोका!

Arun Patil

राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी किंवा खरोखरच जाणीवपूर्वक लक्ष्य करणार्‍या काही पत्रकारांवर थेट आरोप करत सर्वच पत्रकारांवर जरब बसवण्यासाठी किंवा अंकित करण्यासाठी… कारण काहीही असो, राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष तर नाही तर अप्रत्यक्षही पत्रकारांना भलती विशेषणं वापरत पत्रकारितेची विश्वासार्हता संपवण्याचा प्रयत्न करणे, हे त्यांच्यासाठीही घातक आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसाठी HMV शब्द वापरल्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी अर्थही स्पष्ट केला. तसे 4-5 आहेत, असे बोलून सर्वच बिथरू नयेत, याचीही काळजी घेतली. पण त्यामुळे ते जे बोलले त्याची गांभीर्य कमी होत नाही.

HMV म्हणजे काय?

HMV म्हणजे कळी His Master's Voice शब्द ही गेल्या शतकातील ग्रामोफोन कंपनी. तिच्या लोगोमध्ये एक कुत्रा ग्रामोफोनसमोर बसलेला दिसतो. आपल्या मालकाचा आवाज त्याला आवडतो. फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत या एचएमव्ही पत्रकारांचे मालक कोण, ते तुम्हाला माहीत आहे, असेही सांगत, तिथं मात्र हातचं काही राखून ठेवलं नाही.

HMVच नाही, आणखीही आहेत पत्रकारांसाठी विशेषणं! : फडणवीसांच्या आधीही पत्रकारांसाठी खूप वेगवेगळी विशेषणे वापरली गेलीत. त्यांच्यापैकी काहींबद्दलही मांडतो. HMV, DOD, प्रेस्टिट्यूट, गोदी मीडिया, ल्युटियन्स मीडिया, चहा-बिस्कीट अशी अनेक विशेषणं पत्रकारांसाठी राजकारण्यांकडून, त्यांच्या ट्रोलर ब्रिगेडकडून वापरली जातात. त्यात भाजपाच नाही तर सर्वच पक्ष पुढे असतात. सर्व विशेषणं दिली जातात, 'पत्रकार' सोडून बरंच काही वापरलं जातं!

1) ल्युटियन्स मीडिया : भारतीय राजकारणात मोदी पर्व सुरू होताच 2014 मध्ये महाराष्ट्रातील नाही, पण राष्ट्रीय पातळीवर भाजपने ल्युटियन्स मीडिया हा शब्द प्रचलित केला. ल्युटियन हे दिल्लीची रचना करणार्‍या वास्तुरचनाकाराचे नाव. त्यांनी वसवलेल्या बंगल्यांमध्ये दिल्लीतील नाही तर देशातील सत्ताधारी वास्तव्य करतात. त्यात काँग्रेस काळात जे राहात, त्यांच्या इशार्‍यावर चालणारा मीडिया तो ल्युटियन्स मीडिया असा भाजपाचा आरोप होता.

सत्तेशी सक्तीची भक्ती अपवाद होती, आता नियम!
असे असले तरीही त्याचवेळी एक बाब नजरेआड करता येत नाही. सत्तेच्या इशार्‍यावर चालणं आणि सत्ताहित पाहणं, सत्यापेक्षा सत्तेला महत्त्व देणं हे त्यावेळी चालायचं ते अपवादासारखं होतं. आता पत्रकारिता म्हणजे तीच असा नियम झाल्यासारखे काही वागतात, तसं तेव्हा नव्हतं. अपवाद जेव्हा नियम बनतो, तेव्हा ते जास्त धोकादायक असतं. तिथं एक रेड अलर्ट मिळत असतो.

2) गोदी मीडिया : त्यानंतर भाजपाविरोधक शांत बसले असं नाही. मोदी सत्ताकाळाच्या काही वर्षांतच त्यांनी एक विशेषण प्रचलित केलं. गोदी मीडिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी फक्त चांगलंच दाखवायचं, काही चुकलं तरी सरकारवर टीका करायची नाही, अशा पत्रकारांना, माध्यमांना गोदी मीडिया म्हणून संबोधलं जातं.

3) प्रेस्टिट्यूट : भाजप समर्थकांनी ल्युटियन्स मीडियानंतर जे विशेषण किंवा अतिशय गलिच्छ दूषण पत्रकारांसाठी प्रचलित केलं ते म्हणजे प्रेस्टिट्यूट! प्रॉस्टिट्यूट म्हणजे वारांगना. जो पैसे देईल त्याच्या लैंगिक इच्छांची मनाविरुद्धही पूर्तता करणारी. पत्रकारांसाठी प्रेस्टिट्यूट शब्द वापरून भाजप ट्रोलर आर्मीने जे पैसे देतात, त्यांच्या इच्छापूर्तीसाठी पत्रकार वाट्टेल ते करतात, थोडक्यात त्या प्रॉस्टिट्यूट तसे पत्रकार प्रेस्टिट्यूट!

4) चहा-बिस्कीट : सुशांतसिंह राजपूत प्रकरण सुरू होतं. नॅशनल मीडिया एका बाजूला आणि स्थानिक मुंबईकर पत्रकार एका बाजूला, असा सामना रंगू लागला. कारण सुशांतसिंहला ओळखणारे मुंबईकर पत्रकार प्रकरणाचे सर्व कंगोरे जाणून होते. ते वास्तव मांडत होते. त्यानंतर लव्ह, सेक्स, ड्रग्ज आणि धोका असे बरेच टिपिकल फिल्मी अँगल त्या कव्हरेजमध्ये घुसले. त्यातून काही पत्रकार अस्वस्थ झाले. त्यांनी स्थानिक पत्रकारांना चाय-बिस्कूट पत्रकार, असं हिणवलं. मुंबईकर पत्रकारांनी आपला कणा दाखवला. कुणीतरी फेकलेल्या हाडकांना चघळण्यापेक्षा चहा-बिस्कीटवालेच चांगले, असं प्रत्युत्तर देण्यात आलं.

5) आता DOD! – Dalal Of Delhi!!

HMV पत्रकारांचा वाद उसळल्यानंतर मुंबईतील पत्रकारांशी बोलताना एक नवा शब्द कानावर आला. DOD म्हणजे Dalal Of Delhi! महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भूमिका मांडली तर काही राजकारण्यांचे चाकर असल्याचे आरोप करत HMV हिणवलं जात असेल, तर जे महाराष्ट्राच्या हिताचा विचार न करता दिल्लीतील नेत्यांची तरफादारी करतात, सर्व मर्यादा ओलांडतात, त्यांना DOD म्हणजे Dalal Of Delhi का म्हणू नये, असा टोला लगावला जात आहे!

'पत्रकार' सोडून बरंच काही! असं का? : आम्हा पत्रकारांचंही चुकत आहेच. पण ते एवढं चुकत नाही, जेवढं भासवलं जातं. पत्रकारांनी नेहमी जागल्याच्या भूमिकेत असणं अभिप्रेत असतं. इतर सर्वांवर टीका करणार्‍या पत्रकारांवर टीका होणेही गैर नाही. पण ही टीका केवळ कामांचं मूल्यमापन करून नाही, तर हेतुपुरस्सरपणे होऊ लागते, तेव्हा वेगळी भीती निर्माण होते. अशी विशेषणं देणं हा काही पत्रकारांचीच नाही तर एकंदरीतच आपल्या पत्रकारितेची विश्वासार्हताही संपण्याचा एक सुनियोजित प्रयत्न तर नाही ना, असाही संशय घ्यायला वाव आहे. त्याचं कारण, हा प्रयोग केवळ पत्रकारितेच्या बाबतीत होत नाही, तर लोकशाहीच्या सर्वच स्तंभांच्या बाबतीत होताना दिसतो. मग ते न्यायालय असो वा इतर. आम्हा पत्रकारांच्याही चुका आहेत. पण सर्वच पत्रकार तसे आहेत का? आजही पत्रकारितेत बहुसंख्या ही कोणतीही बांधिलकी न पत्करता, सत्तेशी नाही तर सत्याशी इमान राखत पत्रकारिता करणार्‍यांचीच आहे. त्यांना त्याचा त्रासही भोगावा लागतो. उलट गोदी मीडियावाले असो वा ल्युटियन्सवाले, त्यांनाच सर्व लाभ मिळत असतात.

सर्वच नेत्यांना HMVच लागतात! : पत्रकारितेतील ती एक प्रवृत्ती आहे. पण वास्तव हेच आहे की, राजकीय पक्ष कोणताही असो, त्यांच्या नेत्यांना आपल्याभोवती असेच पत्रकार लागतात; नव्हे अशा पत्रकारांनाच सभोवताली ठेवलं जातं. तरीही मग अशी टीका केली जाते, त्याचं कारण मुळातच पत्रकारिता ही कणा असलेली कुणालाच नको आहे. आघाडीचा सत्ताकाळ आठवा.

रणनीती ओळखा : सत्य मांडणं हे कोणत्याही सत्तेला आवडत नाही. त्यातूनच मग सोपा मार्ग काय, तर पत्रकारितेविषयीच संशय निर्माण करा. आधी काहींना विशिष्ट विशेषणं वापरत पिंजर्‍यात उभं करायचं आणि मग हळूहळू संपूर्ण पत्रकारितेविषयी संशय निर्माण करायचा. असं सातत्यानं करत राहिलं की, गोबेल्स तंत्राने लोकांना तेच खरं वाटेल. पत्रकार जे मांडतील ते खरं आहे का, याविषयीच लोकांच्या मनात कमाल संशय तयार होईल, असा एक दूरगामी प्रयत्न राजकीय नेत्यांच्या विशेषणांच्या मार्‍यामागे असला तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. त्यातूनच मग पत्रकारितेच्या विश्वासार्हतेलाच संपवायचं, असाच डाव असावा.

वेळीच सावध होणं गरजेचं! : त्यामुळे आपण पत्रकारांनी आणि समाजातील इतर जाणत्यांनी या विशेषणबाजीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. थांबवून कुणी थांबणार नाही. पण किमान लोकांच्या मनात टीकेमागचे हेतू आले तरी बरंच साध्य होईल.

पत्रकारितेची विश्वासार्हता संपवणे राजकीय नेत्यांसाठीही घातक! : राजकीय ईप्सित साध्य करण्यासाठी किंवा खरोखरच जाणीवपूर्वक लक्ष्य करणार्‍या काही पत्रकारांवर थेट आरोप करत सर्वच पत्रकारांवर जरब बसवण्यासाठी किंवा अंकित करण्यासाठी… कारण काहीही असो. राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष तर नाही तर अप्रत्यक्षही पत्रकारांना भलती विशेषणं वापरत पत्रकारितेची विश्वासार्हता संपवण्याचा प्रयत्न करणे, हे त्यांच्यासाठीही घातक आहे. सत्ता येते-जाते. सत्य हे कायम साथ देतं. पत्रकारितेला संशयाच्या भोवर्‍यात आणून विश्वासार्हता संपवली, तर उद्या तुम्ही केलेले आरोप, दावे त्याच पत्रकारांकडून ऐकताना कोण विश्वास ठेवेल? तसेच सत्ता नसताना दुसर्‍या सत्ताधार्‍यांनी तुम्हाला तुम्ही आता करता त्याच पद्धतीनं त्रास देण्यास सुरुवात केली तर कोण साथीला असणार आहे? विश्वासार्हता संकटात आणलेल्या पत्रकारितेनं साथही दिली तर लोक कसा विश्वास ठेवतील?

पत्रकारांनी काळजी जास्त घ्यावी! : आपण पत्रकार तर शब्दांचे सौदागरच! वाट्टेल तेवढे, वाट्टेल तेव्हा, वाट्टेल तसे आणि वाट्टेल ते शब्द वापरू शकतो. पण मुळात आपण पत्रकार आहोत हे विसरायला नको. पत्रकारितेमुळेच आपण जे काही आहोत ते आहोत. विश्वासार्हता हाच पत्रकारितेचा प्राण आहे. तो असेल तर आणि तरच आपलं आणि लोकशाहीचंही अस्तित्व बळकट राहिल! हे उगाच काही तरी अतिरंजित नाही. एकाही स्तंभाचं अस्तित्व संकटात तर लोकशाहीचं अस्तित्व संकटात.

तुळशीदास भोईटे

SCROLL FOR NEXT