Latest

माजी आयएएस, आयपीएस यावेळीही मोठ्या संख्येने रिंगणात

Arun Patil

यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात झालेला माजी नोकरशहांचा प्रवेश. काही माजी आयएएस आणि आयपीएस अधिकारी विविध पक्षांतून लोकसभेच्या रिंगणात उतरले असून, यामुळे ते चर्चेतील चेहरे बनले आहेत. यावेळीही असे माजी अधिकारी मोठ्या संख्येने निवडणूक लढवित आहेत.

के. अण्णामलाई

तामिळनाडूतील भाजपची सूत्रे के. अण्णामलाई हे माजी आयपीएस अधिकारी सांभाळत आहेत. त्यांनी 2019 मध्ये पोलिस सेवेचा राजीनामा दिला आणि पुढच्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते कोईम्बतूर मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत.

परमपाल कौर

माजी आयएएस अधिकारी परमपाल सिंह कौर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपने पंजाबमधील भटिंडा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांच्याशी त्यांचा मुकाबला आहे. माजी मंत्री सिकंदर सिंह मलुका यांच्या स्नुषा असलेल्या परमपाल सिंह कौर यांना विजयाची खात्री आहे.

शशिकांत सेंथिल

कर्नाटक केडरचे माजी आयएएस अधिकारी शशिकांत सेंथिल यांना काँग्रेसने तामिळनाडूतील तिरुवल्लूर मतदार संघातून तिकीट दिले आहे. सेंथिल यांनी 2019 मध्ये पदाचा राजीनामा दिला होता.

व्यंकटराम रेड्डी

तेलंगणातील मेडक मतदार संघातून माजी आयएएस अधिकारी व्यंकटराम रेड्डी यांना भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएसने मैदानात उतरविले आहे. विशेष म्हणजे तेलंगणातील नगरकुर्नूल येथून माजी आयपीएस अधिकारी आर. एस. प्रवीण कुमार हेही बीआरएसच्या तिकिटावर आपले नशीब आजमावत आहेत.

मैथिलीशरण गुप्त

मध्य प्रदेशचेे सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी मैथिलीशरण गुप्त यांनी वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. 2021 मध्ये ते निवृत्त झाले. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि उत्तर प्रदेशातील झाशीतूनही निवडणूक लढविण्याचा त्यांचा मनोदय आहे.

अरुप पटनायक

ओडिशातील पुरी लोकसभा मतदार संघातून बिजू जनता दलाने माजी आयपीएस अधिकारी अरुप पटनायक यांना मैदानात उतरविले आहे. ते 1979 च्या बॅचचे अधिकारी आहेत. याच मतदार संघातून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा हेही निवडणूक लढवत आहेत. ही लढत रंगतदार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आनंद मिश्रा

माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा बिहारमधील बक्सर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवू शकतात. त्यांचा प्रचारही सुरू आहे. येथून भाजपने केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचे तिकीट कापून मिथिलेश तिवारी यांना मैदानात उतरविले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT