जागतिक बौद्धिक संपदा कार्यालयाने म्हणजेच WIPO (World Intellectual Property Organization ) महिला आणि पेटंट बाबतच्या सर्वेक्षणानुसार 2021 साली जागतिक स्तरावर महिलांचा पेटंटमधील वाटा केवळ 17 टक्के एवढाच नोंदविला आहे.
क्युबासारख्या छोट्या देशाने सर्वेक्षणात महिला पेटंट अर्जदारांची सर्वाधिक (53 टक्के) असणारा देश म्हणून प्रथम स्थान पटकावले. फिलिपिन्सने देखील जागतिक सरासरी ओलांडत 38 टक्के महिला अर्जदारांना पेटंट देऊन द्वितीय स्थान पटकावले आहे. पोर्तुगाल या युरोपियन देशाचा तिसरा क्रमांक आहे, 6 व्या क्रमांकावर रोमानिया आणि 10 व्या क्रमांकावर स्पेन आहे. महिला संशोधकांमध्ये जागतिक महासत्ता बनू पाहणार्या चीनची सरासरी फक्त 24 टक्के आहे तर इतर प्रमुख युरोपीय देश जसे की जर्मनी, यूके, इटली आणि स्वीडन हे महिला शोधकांमध्ये जागतिक सरासरीच्या मागे राहिले. जर्मनी आणि अमेरिका हे देश जरी पहिल्या पन्नास देशांमध्ये असले तरी तेथील महिला पेटंट अर्जदारांचे प्रमाण हे अनुक्रमे 12 टक्के आणि 16 टक्के आहे. सर्वात कमी म्हणजे जपानमध्ये केवळ 10 टक्के महिला शोधकांना पेटंट दिल्याची नोंद आहे. भारतीय महिलांचा पेटंटमधील सहभाग नाममात्र आहे.
महिलांचे पेटंटमधील योगदान बघायचे झाले तर आपल्याला इतिहासात अनेक उदाहरणे सापडतील. डिशवॉशर, फ्रीज, विंडस्क्रीन वायपर, संगणक आणि संगणक प्रणाली (अल्गॉरिथम), सीसीटीव्ही इ. आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू या महिलांनी शोधून काढल्या आहेत. मेरी किज ही महिला अमेरिकेमध्ये पेटंट मिळवणारी पहिली महिला ठरली. 5 मे 1809 रोजी तिने हा बहुमान पटकावला. पेटंट म्हणजे एखाद्या नवीन आणि उपयुक्त अशा संशोधनाच्या वापरासंबंधी संशोधकाला सरकारने दिलेला एकाधिकार. जर कोण्या एका व्यक्तीने नवीन आणि उपयुक्त असे उत्पादन विकसित केले किंवा ते उत्पादन तयार करण्याची नवीन प्रक्रिया विकसित केली तर त्याच्या या संशोधनाला पेटंट मिळू शकते. बर्याच लोकांना असे वाटत असते की, फक्त बुद्धिमान माणसेच किंवा तज्ज्ञ व्यक्तीच आविष्कार/शोध निर्माण करू शकतात. जागतिक स्तरावर गाजलेले बहुतेक पेटंट हे काही मोठे संशोधन नसून कुठल्या तरी समस्येवर शोधलेला नवीन आणि उपयुक्त असा तोडगा आहे. तसेच पेटंट घेण्यासाठी (विकसित करण्यासाठी) विशिष्ट शैक्षणिक पार्श्वभूमीचीदेखील गरज नाही, गरज आहे ती फक्त सर्जनशीलतेची आणि कृतिशीलतेची.
स्वतःच्या संशोधनाकरता पेटंट नावावर असणार्या अनेक महिला महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी एक आहेत पुण्याच्या जयश्रीताई यादव. स्वतःचा गुलकंद, गुलाबपाणी, सरबत व्यवसाय करताना त्यांनी गुलाबाच्या पाकळ्यांपासून वाईन निर्मितीचा ध्यास घेतला. आठ-नऊ वर्षे प्रयत्न करून त्यांनी गुलाबापासून वाईन निर्मिती केली. त्यांच्या या संशोधनाला भारतातले पेटंट मिळवून देण्यासाठी आम्ही यशस्वी प्रयत्न केले. केवळ पेटंट मिळवून त्या थांबल्या नाहीत, तर त्याआधारे त्यांनी वाईन निर्मितीसाठी पूर्ण यंत्रणा उभी केली. पुण्याजवळच दहा एकर जमिनीवर वाईनसाठी लागणार्या गुलाबांची शेती सुरू केली. नाशिकच्या डॉ. अनिता हंडोरे यांनी आपल्या गाईड व मोठ्या भावाबरोबर अनेक वर्षे संशोधन करून एंडोफाईट्स विलगीकरण प्रणाली विकसित केली.
ही प्रणाली आरोग्य, कृषी, औद्योगिक, जैवइंधन, जैवसिमेंट, पर्यावरण इ. विविध क्षेत्रांत ऊपयुक्त ठरत आहे. डेरवण (ता. रत्नागिरी) येथील बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटल तसेच डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टर सुवर्णा पाटील व त्यांच्या टीमने एखाद्या महिलेची मासिक पाळी पुढील 24 तासांत सुरू होईल की नाही याची माहिती देणारे किट विकसित केले. देशातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी भारत अजून ठोस पावले उचलत आहे. महिलांनी दाखल केलेल्या पेटंट अर्जाची त्वरित तपासणी करणे तसेच त्यांच्या अर्जाचे लवकरात लवकर परीक्षण करून त्यांचे पेटंट त्वरित मंजूर करण्याची सुविधा भारत सरकारने 2020 साली रुजू केली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी सबलीकरणासाठी या पेटंटच्या मार्गाचे अनुसरण करायला हवे.
– सौ. रश्मी हिंगमिरे
(पेटंट तज्ज्ञ, पुणे)