मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी तर्फे काढण्यात येणाऱ्या महामोर्चासाठी मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला असून पोलिसांनी भायखळा ते आझाद मैदान या परिसरात सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून सर्व बारीकसारीक हालचालींवर नजर ठेवणार आहेत. सोबतच मोर्चावेळी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस खबरदारीचा उपाय म्हणून साध्या वेशातही पोलीस तैनात ठेवले आहेत.
भायखळ्यातील रिर्चड्सन क्रुडासपासून शनिवारी सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने जाणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारती समोर सभा घेण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी करुन संशयित व्यक्ती आणि वाहनांची कसून तपासणी सुरु केली आहे. तसेच, मोर्चाच्या मार्गावर श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकांच्या माध्यमातून तपासणीसुद्धा सुरु केली आहे..
मोर्चाच्या ठिकाणी ०३ अप्पर पोलीस आयुक्त, ०८ ते १० पोलीस आयुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक असे एकूण ३१७ पोलीस अधिकारी, ०१ हजार ८७०- पोलीस अंमलदार तसेच, राज्य राखीव पोलीस बलाच्या २२ प्लाटुन, दंगल नियंत्रण पथक, अश्रुधुर पथक, वॉटर कॅनन, सीसीटीव्ही व्हॅन, राखीव पथके अशी एकूण ३० पथके असा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.आहे.
महामोर्चाचे अनुषंगाने सशस्त्र पोलीस बल 'नायगाव' येथून प्रतिनियुक्तीवर असलेल्या ०४ अधिकारी आणि १८४ अंमलदार, सशस्त्र पोलीस बल 'ताडदेव' येथून प्रतिनियुक्तीवर असलेल्या ५९ अंमलदार आणि कोर्ट ऑर्डरली म्हणून नियुक्तीवर असलेल्या २५ अंमलदार तसेच, सशस्त्र पोलीस बल 'मरोळ' येथून प्रतिनियुक्तीवर असलेल्या ०५ अधिकारी आणि ३८ अंमलदार यांना बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा