मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात वीजटंचाईचे संकट अधिक गडद झाले असून, त्यावर मार्ग काढण्यासाठी शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.
वीजटंचाईमुळे राज्याच्या काही भागात भारनियमन सुरू झाले आहे. अतिरिक्त वीज खरेदी केली नाहीतर हे भारनियमन आणखी वाढण्याची भीती आहे. ते टाळण्यासाठी तातडीची वीज खरेदी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होण्याची चिन्हे आहेत.
कडाक्याच्या उन्हामुळे चढलेला पारा उतरण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. उष्णतेच्या लाटेमुळे राज्यभर विजेची मागणी वाढली. सध्याची मागणी 28 हजार मेगावॅटची असून ती 30 ते 32 हजार मेगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तूर्तास 1500 मेगावॅट विजेची टंचाई राज्यात निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारनियमन वाढवण्याचा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत दिला.
विशेष म्हणजे हे संकट टाळण्यासाठी वीजखरेदीचा प्रस्ताव ऊर्जामंत्र्यांनी या बैठकीत आणला नाही. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली असता वीज खरेदी कराराची तयारी पूर्ण झाली नव्हती, अशी कबुली राऊत यांनी दिली आणि वीजनिर्मितीच्या अडचणींचा पाढा वाचला. त्यामुळे भारनियमन टाळण्यासाठी शुक्रवारी विशेष मंत्रिमंडळ बैठक बोलावण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागला.