कोळसा, वीज, पेट्रोरसायने, तेलशुद्धीकरण कारखाने, ऊर्जा आदी क्षेत्रांत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे दोन उद्योगपती कार्यरत आहेत. मात्र, हे दोघेही सध्या परस्परांना टक्कर देत असून, उद्योगवर्तुळात त्याचीच चर्चा सुरू आहे.
सध्या देशात ठिकठिकाणी विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याला कारण कोळशाची चणचण. त्याचबरोबर इंधनाचे दर वाढले असून, परदेशांतून तेल आणून, त्याचे शुद्धीकरण करणे, हा एक मोठा व्यवसाय आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, ऊर्जाक्षेत्रात अंबानी आणि अदानी या दोघांमध्ये चुरस निर्माण होणार आहे. सौदी अरेबियाच्या अरामको या जगविख्यात तेल कंपनीशी हातमिळवणी करण्याचा अदानींचा विचार आहे. परंतु; यापूर्वी अरामको हीच कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेलशुद्धीकरण आणि रासायनिक व्यवसायातील वीस टक्के भागभांडवल, एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च करून विकत घेण्यासाठी चर्चा करत होती. मात्र, गेल्या नोव्हेंबरमध्ये ही बोलणी फिस्कटली आणि त्यानंतर अदानी समूहाने अरामकोशी बोलणी सुरू केली. जर ही बोलणी फलद्रूप झाली, तर अदानींच्या दृष्टीने ते मोठे पाऊल ठरेल. अरामको ही जगातील सर्वात मोठी तेल निर्यातदार कंपनी आहे. तर गुजरातमधील जामनगर येथे अंबानींचा तेलशुद्धीकरण प्रकल्प असून, ही कंपनी पॉलिमर, पॉलिस्टर यांची सर्वात मोठी उत्पादक आहे. वस्त्राचे धागे निर्माण करण्यासाठी जी 'इंटरमिजिएट्स' लागतात, त्यांचे उत्पादन तेथे होते. दुसरीकडे, अदानी समूहाला मुंदरा बंदराजवळ चार अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा क्रॅलिक्स प्रकल्प उभारायचा असून, त्यासाठी त्यांनी अबुधाबी नॅशनल ऑईल कंपनीशी सहयोग केला आहे.
मध्यंतरी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. त्यानंतर त्यांना अदानी यांनी मागे टाकले. अब्जाधीशांच्या यादीत या दोघांची सतत स्पर्धा रंगलेली असते. हे दोघेही मूलतः गुजरातमधील असून, या राज्यात गुंतवणुकीसाठीसुद्धा त्यांच्यात स्पर्धा आहे. रिलायन्सने गुजरातेत एक लाख मेगावॅट अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि हरित हायड्रोजन पर्यावरणाच्या विकासासाठी पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. याशिवाय कंपनी सौर फोटोव्होल्टेइक मॉड्युल्स, हायड्रोजन उत्पादनासाठी इलेक्ट्रोलायझर, ऊर्जा साठवण बॅटरीच्या निर्मितीचा कारखाना उभारण्यासाठी सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
दुसरीकडे, अदानी समूहाने दक्षिण कोरियातील पोस्को कंपनीसोबत गुजरातमध्ये तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून पोलाद प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. यामुळे अदानी समूहाला पोलाद क्षेत्रात पदार्पण करता येणार आहे. हे दोन उद्योगपती गुजरातमध्ये भराभर जमिनी घेत असून, विविध क्षेत्रांतील प्रकल्पही उभारत आहेत. 'व्हायब्रंट गुजरात' या गुजरात सरकारच्या कल्पक उपक्रमांतर्गत देशभरातील गुंतवणूक आकर्षित केली जात असते. कमॉडिटी व्यापाराच्या क्षेत्रातही गुजरातेतील व्यापारी देश-विदेशांत नावलौकिक कमावून आहेत. महाराष्ट्रातील उद्योगपतींनीदेखील मूलतः आपल्या राज्यात अधिकाधिक विशाल प्रकल्प कसे येतील, हे बघितले पाहिजे. परदेशी कंपन्यांशी तांत्रिक, आर्थिक सहयोग केला पाहिजे. शिवाय मुख्यतः महाराष्ट्रातील जे विभाग मागासलेले आहेत, अशा ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे; परंतु महाराष्ट्रात जैतापूर असो वा नाणार प्रकल्प. त्यावरून सतत वाद होत असतो. एक तर स्थानिक लोकांना विश्वासात घेतले जात नाही अथवा त्यामध्ये राजकारण शिरते. त्यामुळे सगळे प्रकल्प लांबणीवर पडतात आणि त्यांच्यावरचा खर्चही वाढत जातो. अशावेळी राज्याची प्रतिमाही खराब होते आणि येणार्या नवीन गुंतवणुकीचा ओघ कमी होऊ शकतो. गुजरातमधील या उद्योगपतींनी आपापसांत स्पर्धा सुरू ठेवली असली, तरी त्यामुळे गुजरातचे व देशाचे नुकसान न होता, उलट सर्वांचाच फायदा झाला आहे. अर्थात, काहीवेळा या कंपन्यांसंदर्भात काही वादग्रस्त गोष्टी घडल्या, तर त्यांचे समर्थन करण्याचे कारण नाही; परंतु तो अपवाद असतो. मात्र, महाराष्ट्रातही अंबानी व अदानी यांच्यासारखे अब्जाधीश उद्योगपती निर्माण व्हावेत, अशी आकांक्षा बाळगायला काय हरकत आहे?