Latest

महाबळेश्वर : मांघर होणार खिलार गायीचं देशातील पहिलं गाव

Arun Patil

सातारा ; प्रवीण शिंगटे : मधाचे गाव म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर तालुक्यातील मांघर आता खिलार गायीचे देशातील पहिले गाव ठरणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत या गावात खिलार गायीचे संगोपन करण्याचा संकल्प सोडला असून शेतकर्‍यांना अनुदानही देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे मांघरच्या शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचावणार आहे.

महाबळेश्वरची ओळख जागतिक दर्जाची आहे. या पर्यटनस्थळाची महती जगभर पसरली आहे. आता महाबळेश्वर बरोबरच तालुकाही आगळ्या- वेगळ्या उपक्रमांनी देशाच्या पटलावर येऊ लागला आहे. या तालुक्यातील स्ट्रॉबेरीची चव प्रत्येकाच्याच जिभेवर पोहोचली आहे. पुस्तकांचं गाव भिलारची ख्याती तर आता सर्वदूर पोहोचली आहे. मांघर हे गाव मधाचं गाव म्हणून ओळखलं जायचं. आता हेच गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 'खिलार गायीचं गाव' म्हणून त्याची नवी ओळख निर्माण होणार आहे.

दुर्गम भागामध्ये उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण व्हावा म्हणून देशी गोवंश पालन हा एकमेव कमी खर्चात व सहज करण्यासारखा व्यवसाय. देशी गाईच्या दुधास अनन्यसाधारण महत्व असून पुरातन काळापासून त्याला पूर्णान्नचा दर्जा आहे. म्हणून दुर्गम भागामध्ये जेथे रोजगाराचे साधन नाही, अशा या मांघरची निवड करण्यात आली आहे.

या गावामध्ये पूर्ण देशी गायीचे संवर्धन व उत्पादन करून त्या उत्पादनास उत्तम बाजारपेठ मिळवून उत्पन्नाचे साधन शेतकर्‍यांना मिळणार आहे. त्याबरोबर देशी गोवंशाचे जतनही होण्यास मदत होणार आहे. जि.प.सेस अंतर्गत सन 22-23 या वर्षामध्ये देशी गोवंश गाव प्रोत्साहन ही नाविन्यपूर्ण योजना मांघरला जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे यांनी दिली.

पशुसंवर्धन विभागाकडून या योजनेसाठी लाभार्थी निवड केली जाणार आहे. गाईचा एक वर्षाचा विमा उतरवला जाणार आहे. गाय खरेदीसाठी खिलार, गीर, गवळावू, देवणी, लालकंधारी, डांगी व इतर देशी गाईंसाठी 40 हजार रुपये खर्च येणार आहे. त्यामध्ये लाभार्थी हिस्सा 20 हजार 750 रुपये तर 50 टक्के अनुदान 20 हजार 750 देण्यात येणार आहे.

मांघर या दुर्गम गावामध्ये देशी गायीचे संवर्धन केले जाणार आहे. सुमारे 50 लाभार्थी निवडून हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्याद्वारे दररोज 250 लिटर दुधापासून तूप, ताक निर्मिती केली जाणार आहे. त्यातून दररोज 25 हजार रुपयांप्रमाणे 150 दिवसांचे 37 लाख 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. याशिवाय गोमूत्र, शेण यावर प्रक्रिया केल्यास अधिक उत्पन्न मिळणार आहे. देशी गायीचे गाव म्हणून मांघरची ओळख होणार आहे. पर्यटनाच्या द़ृष्टीने एक दिवस गोमातेसोबत राहण्याचा आनंद पर्यटकांना मिळणार आहे.
– विनय गौडा, प्रशासक तथा, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सातारा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT