Latest

महाबळेश्वर : आंबेनळी घाटात पुन्हा दरडी कोसळल्या

रणजित गायकवाड

महाबळेश्वर / प्रतापगड : पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर – पोलादपूर दरम्यानचा आंबेनळी घाट अतिवृष्टीने खचल्याने सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. अशातच शनिवारी दुपारी पुन्हा एकदा दरडी कोसळल्या. यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. दरम्यान, अतिवृष्टीमुळे परिसरातील माती निसरडी झाली असून ती काही ठिकाणी खचू लागली आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात आले.

महाबळेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटातील रस्त्याचे नुकसान झाले होते. प्रतापगड व कोकणाला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने रस्ता दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. रस्त्यावरील दगड व माती हटवून जेथे रस्ता खचला होता तेथे भराव टाकून जाळीचे बेड तयार करण्यात येत आहेत. हे काम सुरू असतानाच शनिवारी सकाळी कामाच्या अलीकडेच दरड कोसळल्याने दगड व माती रस्त्यावर आली. यामुळे रस्ते कामात पुन्हा एकदा अडथळा निर्माण झाला. याच कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश कुंभारदरे, गोपाळ लालबेग व अ‍ॅड. अरुण बावळेकर गेले होते. यावेळी दरड कोसळल्याची माहिती त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली. त्यानंतर ही दरड हटवण्यात आली. आंबेनळी घाटात दरड कोसळण्याचे सत्र अजूनही सुरू आहे. वारंवार कोसळणार्‍या दरडींमुळे आंबेनळी घाट धोकादायक झाला आहे.

दरम्यान, पावसाळ्यात या दुर्गम भागातील जनजीवन कायमच धास्तावलेले असते. आता तर वारंवार दरडी कोसळत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने उपाययोजनांना आणखी गती देण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

SCROLL FOR NEXT