Latest

महापालिका निवडणुक : मुंबईत बहुरंगी लढती?

Arun Patil

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला स्वबळावर निवडणूक लढण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी मनसेला सोबत घेण्यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील होते. मात्र, उत्तर भारतीय नेत्यांनी या युतीचा परिणाम उत्तर भारतीय मतांवर होईल, असा सल्ला दिल्यामुळे भाजपने दोन पावले मागे घेतली आहेत.

हे लक्षात घेऊन मनसेने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारीही सुरू केल्याचे समजते. त्यामुळे मराठी मतांची विभागणी होऊन, त्याचा फटका शिवसेनेबरोबरच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसलाही बसू शकतो. काँग्रेसने स्वबळाचा नारा आधीच दिला आहे. आता मनसे स्वबळावर लढल्यास मुंबई महापालिकेसाठी बहुरंगी लढती होतील.

या निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे राष्ट्रवादीलाही मनसेची साथ नको आहे. काँग्रेस या आघाडीत सहभागी होऊ इच्छित नाही.

काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा आधीपासूनच चालवली आहे. कारण, शिवसेना-राष्ट्रवादीसोबत आपला पक्ष गेल्यास मुंबईतील मुस्लिम, तसेच उत्तर भारतीय मतदारांमध्ये चलबिचल निर्माण होऊ शकते, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते.

त्यामुळेे काँग्रेस स्वबळावरच ही निवडणूक लढवेल अशी शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत इतर छोट्या पक्षांना एकत्र घेऊ, असे भाजपने गेल्याच आठवड्यात झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत जाहीर केले होते. मात्र, मनसेबाबत चर्चा करू आणि त्यानंतर पाहू, अशी भूमिका घेतली.

तसेच मनसेला सोबत घेतल्यास उत्तर भारतीय मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो, अशी भीती उत्तर भारतीय नेत्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत व्यक्त केली. त्यामुळे थेट दिल्लीतून महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना मनसेसोबत युती नको, असा सल्ला दिल्याचे समजते. भाजप ऐनवेळी साथ सोडणार याची कुणकुण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लागल्यामुळे त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

मनसैनिकांना कामाला लागा, असा सल्लाही कृष्णकुंजमधून देण्यात आला असल्याचे समजते. मनसे स्वबळावर लढल्यास मराठी मतांची मोठ्याप्रमाणात विभागणी होऊन त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेलाच बसेल असे भाजपला वाटत असले तरी, 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीचा निकाल बघता मराठी मतांची विभागणीचा फटका भाजप काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसलाही बसला होता. त्यामुळे मनसेला सोबत घेऊन महापालिका निवडणूक लढवण्यासाठी भाजपचा मुंबईतील एक गट प्रयत्नशील आहे.

उत्तर भारतीय मतदारांची संख्या सर्वाधिक

मुंबईत उत्तर भारतीय मतदारांची संख्या वाढली आहे. 1 कोटी मतदारांपैकी सुमारे 28 टक्केपेक्षा जास्त मतदार उत्तर भारतीय आहेत. मराठी मतदारांचा टक्का 25 टक्के इतका असून मुस्लिम मतदारांची संख्या 18 टक्के आहे. गुजराती मतदारांची संख्याही सुमारे 20 टक्के इतकी आहे, तर उर्वरित 9 टक्के मतदार दक्षिण भारतीय व अन्य राज्यातील आहेत.

2017 मधील महापालिका निवडणुकीतील मतांची टक्केवारी

शिवसेना 30.41 टक्के भाजप 28.28 टक्के काँग्रेस 16.69 टक्के मनसे 8.52 टक्के राष्ट्रवादी 5.74 टक्के समाजवादी पक्ष 4.87 टक्के अपक्ष 6.40 टक्के

येथे बसू शकतो शिवसेनेला फटका

2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. मात्र यापैकी सहा नगरसेवकांनी अवघ्या काही महिन्यांतच शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. त्यामुळे मुंबईत मनसेचा एकमेव नगरसेवक शिल्‍लक राहिला आहे. पण हा नगरसेवकही भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते.

तरीही मनसेचे दादर, लोअर परेल, प्रभादेवी, वरळी, माहीम, भांडुप, चेंबूर, घाटकोपर, गोरेगाव, जोगेश्वरी आदी भागांत आजही प्राबल्य आहे. त्यामुळे या भागातील किमान 35 ते 40 प्रभागांमध्ये शिवसेनेच्या मतांवर परिणाम होऊ शकतो. मराठी मतांची विभागणी झाल्यास याचा थेट फायदा भाजपला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT