Latest

मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण 34 कुटुंबीयांसाठी मदतीची रक्‍कम संबंधित जिल्हाधिकार्‍यांना वर्ग करण्यात आली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा भाजप सरकारच्या काळात करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात केवळ 15 कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात आले होते.

महाविकास आघाडी सरकार हे आश्‍वासन पूर्ण करेल व या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समन्वयकांना दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 कोटी 65 लाख रुपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकार्‍यांना वर्ग करण्यात आला आहे.

शासनाची मदत न मिळालेल्या 19 वारसांना प्रत्येकी 10 लाख, तर यापूर्वी 5 लाख रुपये मिळालेल्या 15 वारसांना प्रत्येकी आणखी 5 लाख रुपये या निधीतून दिले जातील. शासनाची आर्थिक मदत मिळणार्‍या 34 कुटुंबीयांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 6, जालना 3, बीड 11, उस्मानाबाद 2, नांदेड 2, लातूर 4, पुणे 3, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT