Latest

मनसुख मांडवीय : 86 टक्के लोकांना किमान एक डोस

Arun Patil

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा ; देशातील 86 टक्के लोकांना कोरोनावरील किमान एकतरी डोस देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली. आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन, संयुक्‍त जदचे राजीव रंजन सिंग तसेच काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी याबाबतचा प्रश्‍न उपस्थित केला होता.

मांडवीय म्हणाले की, कोरोना नियंत्रणाच्या द‍ृष्टीने शंभर टक्के लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. अनेक प्रकारची परीक्षणे, चाचण्या आणि अभ्यासाअंती लसीला परवानगी दिली जाते. त्यामुळे लसीचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. विनाकारण लसीवर संशय घेणे उचित ठरणार नाही. त्यामुळे लसीच्या संदर्भात लोकांमध्ये संशय निर्माण होऊ शकतो.

दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम सापडलेल्या ओमायक्रॉन स्ट्रेनवर अभ्यास सुरू करण्यात आला असल्याचेही मनसुख मांडवीय यांनी नमूद केले. ओमायक्रॉनवरील अभ्यासात जे निष्कर्ष सापडतील, त्यानुसार पुढील उपचार पद्धतीस सुरुवात केली जाईल. कोरोना वरचेवर आपले स्वरूप बदलत आहे. जिनोम सिक्वेन्सिंगचा देशातील 36 प्रयोगशाळांमध्ये अभ्यास केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिस कारवाईत एकाही शेतकर्‍याचा मृत्यू नाही : कृषिमंत्री तोमर

आंदोलन काळामध्ये पोलिस कारवाईत एकाही शेतकर्‍याचा मृत्यू झाला नसल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शुक्रवारी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. केंद्र सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर संयुक्‍तकिसान मोर्चाने आंदोलन मागे घेतले आहे. आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍यांना भरपाई देण्याचा मुद्दा राज्य सरकारांशी संबंधित आहे, असेही तोमर यांनी उपप्रश्‍नाच्या उत्तरादाखल सांगितले. काँग्रेसचे सदस्य धीरज प्रसाद साहू, तसेच आम आदमी पार्टीचे सदस्य संजय सिंग यांनी याबाबतचा प्रश्‍न उपस्थित केला होता.

विदेशातील हस्तलिखित परत आणण्याची मागणी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : जगभरातील भारताशी संबंधित हस्तलिखिते राष्ट्रीय पांडुलिपी मिशनअंतर्गत पुन्हा भारतात आणावीत, अशी मागणी राज्यसभेत प्रश्‍नकालादरम्यान खा. राकेश सिन्हा यांनी केली. या दस्तऐवजांचे हिंदीत भाषांतर करावे, अशी मागणीही त्यांनी केली. भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आहे आणि या संस्कृतीचा मोठा प्रभाव जगावर पडला आहे.

आपल्या हस्तलिखितांमध्येही ते दिसून येते. देशात राष्ट्रीय पांडुलिपी मिशनअंतर्गत 44 लाख हस्तलिखिते एकत्रित केली गेली आहेत. तथापि, यातील 95 टक्के हस्तलिखितांचा आजही हिंदीत अनुवाद झालेला नाही. एका अंदाजानुसार देश-विदेशात अशी चार कोटी हस्तलिखिते आहेत. तर, युरोपात दोन लाख हस्तलिखिते आहेत.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ग्रंथालयात भारताची 35 हजार हस्तलिखिते आहेत.

तर ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, नेदरलँड अशा देशांत 50 हजारांहून अधिक हस्तलिखिते भारताशी संबंधित आहेत. विविध विद्यापीठांमध्ये हस्तलिखितांच्या शिक्षण केंद्रांची स्थापना करावी. गत सरकारांकडून या हस्तलिखितांची उपेक्षाच झाली. राष्ट्रीय पांडुलिपी मिशनची सुरुवात केल्याबद्दल त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे कौतुक केले.

SCROLL FOR NEXT