Latest

भरारी : मन आणि मेंदूची मशागत कशी कराल?

मोहन कारंडे

देविदास लांजेवार

ज्ञान ही शक्ती आहे. ही शक्ती अर्जित करण्यासाठी महात्मा गांधी अगदी भल्या पहाटे उठत असत. ध्यानधारणा करीत. पहाटेची प्रार्थना या महान आत्म्याला अमृत बोलण्याची शक्ती देई. या शक्तीमागे होते त्यांनी महत्प्रयासाने विकसित केलेले जैविक घड्याळ. संपूर्ण एकाग्रतेने साधलेल्या मनाच्या निग्रहातून गांधीजींनी त्यांच्या जैविक घड्याळावर कमालीचे नियंत्रण मिळविले होते. हेच ते क्रोनोबायोलॉजी!

तुम्ही विद्यार्थी असाल तर वाचलेले संपूर्ण लक्षात ठेवणे आणि हवे तेव्हा त्याचे स्मरण करणे याची अर्थात अशा अभ्यासाची वेळ पहाटेशिवाय दुसरी असू शकत नाही. पहाटेला उठण्यापूर्वी मस्त झोप झालेली असते. थकवा निघून गेलेला असतो. गार वारा आणि प्रसन्न वातावरणामुळे मूड छान असतो. परिणामी, अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित होते, म्हणजेच 100 टक्के एकाग्रता! म्हणूनच कदाचित दिवाळी पहाट, सुरेश भटांची 'पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची मिठी सैल झाली' ही अजरामर झालेली गझल आणि आजपर्यंतचे सर्वाधिक बहुचर्चित 'पहाटेचे सरकार' या संपूर्ण एकाग्रतेतूनच मूर्तरूपास आले असावे.

तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग हा अभ्यास असेल, तर असा स्मरणयोग्य अभ्यास करण्यासाठी 'पेशन्स आणि प्रॅक्टिस' लागतेच. त्यामुळे अशा एकाग्रशील अभ्यासाची उत्तम वेळ कोणती' हा प्रश्न कित्येकांना पडतो. दुपार, सायंकाळ किंवा रात्र या अभ्यासाच्या योग्य वेळा आहेत, अशी काहींची धारणा आहे. यावेळी अभ्यासावर चांगला फोकस असतो, असे त्यांना वाटते; मात्र क्रोनोबायोलॉजीने पहाटेची वेळ, ही वाचलेले स्मरणात ठेवणे आणि योग्य वेळी ते 'रिकॉल' करणे अर्थात आठवणे यासाठी योग्य ठरवली आहे.

क्रोनोबायोलॉजी म्हणजे मानवी शरीरातील जैविक घड्याळावर वेळ आणि काळाचा कसा परिणाम होतो, याचा अभ्यास करणारे शास्त्र. या शास्त्रात बायोलॉजिकल र्‍हिदम हा वाक्प्रचार शरीराची अनेक कार्ये सुरळीत चालण्यासाठी वापरला जातो. झोपणे, उठणे, शरीराचे तापमान, हार्मोन्स सिक्रिशन (संप्रेरकांचे स्रवणे) आणि शरीराच्या इतर बर्‍याच उपद्व्यापांवर हा र्‍हिदम नियंत्रण ठेवतो. हे जैविक घड्याळ आपल्या मेंदूत असते. आपल्या अभ्यासाची योग्य वेळ कोणती हेही हे घड्याळ सांगते.

तर, यात या शास्त्राने कोणत्या कालावधीत मन किती टक्के एकाग्र असते, याची मीमांसा केलेली आहे. पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत मन 100 टक्के एकाग्र असते. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 7.30 वाजेपर्यंत मेंदू 50 टक्के कार्यरत असतो. दिवसभर मशागत करून मन आणि मेंदू थकल्याने रात्री तो फक्त 20 टक्केच कार्यरत असतो. मेंदूमधील ऑक्सिजन स्तराचेही असेच आहे. सकाळी नाश्त्याच्या वेळी मेंदूंचा ऑक्सिजन स्तर 60 ते 80 टक्के असतो. दुपारच्या जेवणावेळी हा स्तर 10 ते 20 टक्के एवढा खालावलेला असतो, तर रात्री त्यात वाढ झाल्याने हा ऑक्सिजन स्तर 30 ते 40 टक्के या प्रमाणात वाढतो. मनाची एकाग्रता उत्तम राहावी आणि मेंदूतील ऑक्सिजनचा स्तर पुरेसा असावा, यासाठी मनुष्याने किती तास निवांत झोप घेतली पाहिजे, यावरही क्रोनोबायोलॉजीने भाष्य केले आहे. प्रत्येक व्यक्तीने रात्री कमीत कमी सहा तास झोप घेतलीच पाहिजे. 8 तासांची झोप मन आणि मेंदूच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे, असे हे शास्त्र सांगते. मेंदूचा ऑक्सिजन स्तर वाढविण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी कमीत कमी 20 मिनिटे दीर्घ श्वास घ्यावा. दररोज 8 ते 10 ग्लास पाणी आवर्जून प्यावे आणि एकाग्रता साधण्यासाठी दररोज 20 ते 30 मिनिटे ध्यान (मेडिटेशन) करावे, असा सल्लाही क्रोनोबायोलॉजीने दिला आहे.

नवे संशोधन हे सांगते की, मेंदू जेव्हा सक्रिय अवस्थेत असतो ती वेळ म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 ते रात्री 10 या काळात अभ्यास चांगला होतो. तथापि, याच संशोधनाने प्रभावी वाचन, मनन आणि चिंतन करण्याची योग्य वेळ पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंतच असल्याचा निष्कर्ष काढला आहे. याचा अर्थ पहाटेचे अभ्यासकर्म यशोशिखरावर घेऊन जातात, हे सिद्ध होते.

SCROLL FOR NEXT