Latest

मध्य रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट पाच पट महागले!

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वे वर महत्त्वाच्या स्थानकांचे प्लॅटफॉर्म तिकीट 9 ते 23 मेदरम्यान 50 रुपये करण्यात आले असून, सोमवारपासून हा भुर्दंड सुरू होईल.

या पाच पट दरवाढीला प्रवासी आणि त्यांना स्टेशनवर सोडायला येणारे कुटुंबीय जबाबदार असल्याचे दिसते. उन्हाळी सुट्ट्यांच्या गर्दीत आपल्या माणसांना सोडण्यासाठी येणारे कुटुंबीय, मित्र किंवा नातलग थेट गाडीत चढतात, सामान वगैरे ठेवून गप्पांमध्ये गुंग होतात. लवकर गाडीतून उतरत नाहीत आणि मग अचानक गाडी सुरू होते आणि धांदल उडालेले हे महाभाग मग सरळ चेन ओढून गाडी थांबवतात. हे प्रकार वाढल्यामुळेच प्लॅटफॉर्मचे तिकीट पाच पट महाग करण्यात आल्याचे सांगितले जाते.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात एकट्या एप्रिल महिन्यात चेन ओढण्याच्या तब्बल 332 घटना घडल्या. यापैकी 53 घटनांमागे योग्य कारण होते. उर्वरित 279 चेन ओढण्याचे प्रकार हे विनाकारणचे निष्पन्न झाले. यातही यूपी, बिहारकडे जाणार्‍या मेल एक्स्प्रेसमध्ये सर्वाधिक चेन ओढण्याच्या घटना घडल्या.

अलार्म चेन ओढली जाते, तेव्हा गाडी जागीच थांबते. गाडी पुन्हा सुरू करण्यासाठी ज्या कोच किंवा डब्यामधून चेन खेचली जाते तेथील ब्रेक आधी सुरू करावा लागतो. त्यानंतर गाडी सुरू होते. या सर्व प्रक्रियेला वेळ लागतो. त्यामुळे गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडते.

SCROLL FOR NEXT