Latest

मधुमेही यांच्यासाठी फळे, भाज्या निवडताना…

Arun Patil

मधुमेही व्यक्तींना त्यांच्या आहारातील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करावा लागतो. वेगवेगळी पथ्ये हाच या आजाराचा मुख्य गाभा असल्यामुळे रोजच्या आहारातील फळे आणि भाज्या यांच्या बाबतीतही काही नियम पाळल्यास आजार काही प्रमाणात सुकर होण्याची शक्यता असते.

दैनंदिन आहारामध्ये प्रत्येक मधुमेही व्यक्तीने भाज्या आणि फळांचा समावेश करणे आवश्यक आहे. कारण, त्यामधून शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर यांचा पुरवठा होण्यास मदत होते. जीवनसत्त्वे आणि फायबरमुळे शरीरात अधिक प्रमाणात कॅलरीज वाढत नाहीत. त्यामुळे नैसर्गिक स्वरुपातील फळे आणि भाज्यांचा आहारात जास्त समावेश करावा.

ज्या फळे आणि भाज्यांमध्ये कॅलरीज आणि पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते, अशा फळे आणि भाज्यांचा आहारातील समावेश अल्प असावा. अशावेळी फळांमधील कॅलरीजनुसार फळे निवडावीत. सुका मेवा जास्त खाणे टाळावे. फळांमध्ये कलिंगड, खरबूज, लिंबू यांचा आहारातील समावेश वाढवावा. सफरचंद, पपई, संत्रे, मोसंबी, स्ट्रॉबेरी, जांभूळ यांचा आहारात समावेश आवश्यक असला तरी तो बेतानेच करावा. केळी, आंबे, द्राक्षे, सीताफळ यांचा आहारातील समावेश अल्प असावा.

काही थोड्या भाज्या वगळता बहुतेक सर्व भाज्या मधुमेही व्यक्ती बिनधास्त खाऊ शकतात. फ्लॉवर, कोबी, नवलकोल, दुधी भोपळा, कारले, भेंडी, तोंदली आणि पडवळ या भाज्यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा, तर गाजर, कांदा, बीट, बिन्स, पावटा यांचा आहारात समावेश केला तरी तो बेताने करावा.

मधुमेही व्यक्तींसाठी भाज्या करत असताना त्यामध्ये दाणे, खोबरे, तेल, तूप आणि बटर यांचा वापर मर्यादित करावा. नैसर्गिकरीत्या भाज्यांमध्ये कॅलरीज कमी असल्या, तरी भाजी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पदार्थांमुळे त्यातील कॅलरीज वाढतात. त्यामुळे ग्रेव्ही पद्धतीच्या भाज्या खाणे शक्यतो टाळावे. त्याऐवजी भाज्या उकडून, कोशिंबीर स्वरुपात खाणे जास्त लाभदायक ठरते.

कच्च्या भाज्या चिरून त्यांची कोशिंबीर करून खाणे उत्तम. बटाटे, रताळी, सुरण यांमध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या घटकांचा आहारातील समावेश कमी करावा. बटाटेवडे, पोटॅटो चिप्स, वेफर्स, चिवडा असे बटाट्याचे तळलेले पदार्थ, बेकरीजन्य पदार्थ, खारवलेले पदार्थ, कार्बनयुक्त पेये, आर्टिफिशल स्वीटनर्स वापरलेले पदार्थ वर्ज्यच करावेत.

डॉ. भारत लुणावत

SCROLL FOR NEXT