Latest

मधमाश्यांच्या सातेरी वसाहती घटल्या; जाणून घ्या कारणे

मोहन कारंडे

सातारा; प्रवीण शिंगटे : जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात सातेरी मधमाश्यांचे पोळे आढळतात. या पोळ्यात केवळ मध गोळा केला जातो. मधमाश्यांच्या या वसाहतीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे राज्यातील 'सातेरी' व 'मेलीफेरी' वसाहतींची संख्या घटू लागली आहे. त्यासाठी मध संचालनालयामार्फत विविध उपाययोजना राबवल्या जात असल्या तरी निसर्ग संवर्धनासाठी मधमाश्या वाचवणे काळाची गरज बनली आहे. राज्यात सध्या सुमारे 25 ते 30 हजार 'सातेरी' तर 10 ते 15 हजार 'मेलीफेरा' वसाहती आहेत.

मधमाश्या पालनामध्ये सातार्‍यासह अहमदनगर, पुणे, धुळे , नंदुरबार, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रांगांमधील 63 तालुक्यांचा समावेश आहे. 'सातेरी' मधमाश्या या जंगलात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. तसेच या जंगलातील पिसा, हिरडा, गेळा, जांभुळ, आखरा, खरखर, कार्वी, व्हायटी, बुरबी, पांगळ या सर्व वनस्पतीपासून मिळणारा मध हा औषधीरमूल्य असणारा आहे. या मधाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. हजारो मधपेट्या ठेवून लाखो शेतकर्‍यांना रोजगाराची संधी मिळत आहे. जिल्ह्यात मध योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांचे मार्गदर्शन उपक्रमास लाभले असल्याची माहिती मध संचालनालयाचेे संचालक दिग्विजय पाटील यांनी दिली.

मधमाश्यांच्या वसाहती कमी होण्याची कारणे

अतिवृष्टीने पेट्या वाहून जाणे, वणवा लागणे, जंगली प्राण्यांचा मधमाश्यांच्या वसाहतीला होणारा उपद्रव, निसर्गातील मधमाशांच्या वसाहतींची नैसर्गिक ठिकाणे कमी कमी होत जाणे, वेळोवेळी पिकांवर औषध फवारणी करणे, वेगवेगळा समाज घटकांतील लोकांमध्ये मधमाश्यांविषयी असणारे गैरसमज व अज्ञान, मधमाश्या हाताळण्याविषयी असणार्‍या माहितीचा अभाव ही मधमाश्यांच्या वसाहती कमी होण्याची कारणे आहेत.

रोग व किडीचा प्रादुर्भाव…

वेगवेगळ्या प्रकारचे रोग व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात मधमाशांना होत आहेत. वॅक्स मॉथमुळे अनेक कॅलरीज नष्ट होत आहेत. त्यासाठी ट्रॅप लावून त्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. तसेच प्रगतशील शेती करत असताना शेतकरी किड नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाचा वापर करतात. कीटकनाशके मधमाश्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतात. त्यामुळे कामकरी माश्या फुलांपासून ते त्यांच्या मधपोळ्यापर्यंत जाण्याचा मार्ग विसरतात. शिवाय मधपोळ्यातील मधमाश्यांची संख्या कमी होत जाते. काही वेळाने ती मधपोळे वेगवेगळ्या किडी व रोगांना बळी पडून नष्ट होतात.

बसतोय कार्बनडाय ऑक्साईडचाही फटका

वातावरणातील बदलाचा परिणाम मधमाश्यांच्या संख्येवर होत आहे. वातावरणात सोडला जाणारा कार्बनडाय ऑक्साईड वायू प्रचंड प्रमाणात नाश होत चालला आहे. हरित द्रव्याच्या होत असलेल्या नाशामुळे माश्यांची संख्या कमी होत चालली आहे.

राज्यात झपाट्याने कमी होणारी मधमाश्यांची संख्या वाढवण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने व निसर्गातील मधमाश्यांच्या वसाहती वाढवण्याच्या उद्देशाने बी ब्रिडिंग हा कार्यक्रम मंडळामार्फत राबवण्यात येत आहे. पर्यावरणपूरक मधमाशीपालन व्यवसाय करण्यासाठी स्वयंपूर्ण खेडे ही संकल्पना नाविन्यपूर्ण उपक्रमातून राबवली जात असून त्याला देशासह राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– अंशु सिन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी (महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT