Latest

राज्यसभेच्या मतदानानंतर रंगले शह-काटशहाचे राजकारण, नेमकं काय घडलं?

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी झालेल्या अटीतटीच्या लढतीनंतर मतमोजणीपूर्वी शह-काटशहाचे राजकारण रंगले. भाजप आणि महाविकास आघाडीने घेतलेल्या आक्षेपानंतर मतमोजणी थांबली.

भाजपने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी पक्षाच्या नियुक्त प्रतिनिधीशिवाय अन्य नेत्यांना मतपत्रिका दाखविल्याचा आक्षेप घेतला. हा आक्षेप निवडणूक अधिकार्‍यांनी फेटाळल्यानंतर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. दुसरीकडे महाविकास आघाडीने भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याविषयी अशीच तक्रार केली. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने शहानिशा करण्यासाठी मतमोजणी थांबविली. मतदानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग मागविले.

जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील यांना मतपत्रिका दाखवली तर यशोमती ठाकूर यांनी नाना पटोले यांना मतपत्रिका दाखवली, असा आक्षेप भाजपने घेतला. मात्र ही तक्रार निवडणूक अधिकार्‍यांनी फेटाळून लावल्यानंतर काही मिनिटांतच भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्याचवेळी भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी अन्य नेत्यांना मतपत्रिका दाखविल्याची तक्रार महाविकास आघाडीने नोंदविली. तसेच अपक्ष आमदार रवी राणा यांनी हनुमानचालिसाची पुस्तिका दाखवून मतदारांना प्रभावित केल्याचा आक्षेपही आघाडीने घेतला. त्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. त्यावर दिल्लीत निवडणूक आयोगापुढे सुनावणी झाली. त्यावर आयोगाने मतदान केंद्रातील चित्रीकरण मागविले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतमोजणी होऊ शकली नाही.

285 आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क

या निवडणुकीत 287 पैकी 285 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना मात्र उच्च न्यायालयानेही परवानगी नाकारल्याने मतदान करता आले नाही. महाविकास आघाडीला आपल्या आमदारांची आणि अपक्षांची नाराजी दूर करण्यात आलेले यश पाहता सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना विजयाची संधी आहे.

विधानसभेचे 288 आमदार आहेत. त्यापैकी शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने 287 आमदारांचे मतदान अपेक्षित होते. मात्र अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता आले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा हिरमोड झाला. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे दोन मतपत्रिका आल्याची तक्रारही भाजप नेत्यांनी केली. झालेले मतदान पाहता महाविकास आघाडीला चारही जागा जिंकण्याची संधी आहे. एमआयएमने ऐनवेळी काँग्रेसला पाठिंबा दिला. शिवाय सपा, बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, माकप आणि आघाडीला पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदारांनीही अपेक्षेप्रमाणे मतदान केल्याने शिवसेनेच्या संजय पवार यांना विजयाची संधी होती.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या कोट्यातील अतिरिक्त मते शिवसेनेला दिल्याने संजय पवार यांचे पारडे जड झाल्याचा दावा काँग्रेसने केला. बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी अखेरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे त्यांची मते नेमकी कोणाची गेली, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

…त्यांना आम्ही मतदान केले : हितेंद्र ठाकूर

ज्या पक्षांनी आमच्या जिल्ह्यातील विकासाची कामे करण्याचे आश्वासन दिले आहे, त्यांना आम्ही मतदान केले, असे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मतदानानंतर स्पष्ट केले. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार असून या तीन मतांसाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाकूर यांची भेट घेऊन मनधरणी केली होती. पण, आम्ही मतदानाच्या दिवशी आमची भूमिका जाहीर करू, असे ठाकूर यांनी सांगितले होते.

भाजपचे हे घाणेरडे राजकारण आहे. ईडीचा डाव फसल्यानंतर त्यांनी रडीचा डाव टाकला आहे. पराभव समोर दिसू लागल्याने व डाव फसल्याने भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाचा आश्रय घेतला; पण त्याचा काही फायदा होणार नाही.
– संजय राऊत, शिवसेना उमेदवार
———————————————————–
मतदानादरम्यान आमच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही. परंतु, भाजपने काहीतरी कारण काढून मतमोजणी रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. जिंकण्याच्या आशा संपल्यानंतर भाजपने हा रडीचा डाव टाकला आहे.
– जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
———————————————————–
कोणत्याही परिस्थितीत निवडणूक उधळण्याचा भाजपचा डाव आहे. ही निवडणूक आधी बिनविरोध होईल अशी अपेक्षा होती; मात्र भाजपने 24 वर्षांनंतर ही निवडणूक लादली. निवडणुकीत आधीच घोडबाजार झाल्याची चर्चा असताना भाजपने आता हा अखेरचा प्रयत्न केला.
– एकनाथ खडसे, राष्ट्रवादी नेते
———————————————————–
प्रकृतीच्या गंभीर तक्रारी असतानासुद्धा मतदानाला आलेले आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे आभार मानावे तरी कोणत्या शब्दात. आभार मानायला शब्द अपुरे पडतील.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
———————————————————–
पक्षाच्या निवडणूक एजंटला मी मतपत्रिका दाखवली. मी माझे मत बाद होईल असे काही केले नाही. मी अन्य कोणालाही मतपत्रिका दाखवली नाही. तसे केले असते तर माझा पक्ष मला निलंबित करू शकला असता.
– जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT