Latest

मटेरियल्स सायन्स आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअर संधी

Arun Patil

आजच्या स्पर्धात्मक जगात प्रत्येक विद्यार्थी करिअरच्या सर्वोत्तम संधी शोधत असतो. मटेरियल्स सायन्स आणि इंजिनिअरिंग या क्षेत्रातील करिअर संधी निश्चितच समाधानकारक आहेत.

आपल्या सर्वांना दैनंदिन जीवनात अशा सर्वोत्कृष्ट सुविधा हव्या असतात, ज्यामुळे आपले जीवन सोपे, आरामदायी आणि किफायतशीर होईल. तर, या सर्व सुविधांसाठी आपल्याला अशा मटेरिअल्सची योग्य निवड आवश्यक असते, जे सहज उपलब्ध होईल, ज्याचे उत्पादन स्थानिक पातळीवर होऊ शकेल आणि जे टिकाऊ असेल.

मटेरिअल्स सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये मुख्यत्वे विविध कार्यात्मक मटेरिअल्स, हलक्या वजनाचे संरचनात्मक मटेरिअल्स, बायोमटेरिअल्स बनविण्यावर भर दिला जातो. यांचा मुख्यत्वे उपयोग आरोग्यसेवा, बांधकाम, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि उपकरणे, एरोस्पेस, संरक्षण, इलेक्ट्रिकल व्हेईकल्स, इत्यादी क्षेत्रांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी केला जातो.

या शाखेचा अभ्यासक्रम हा इतर शाखेच्या अभ्यासक्रमाशीही निगडित असतो. या शाखेत प्रामुख्याने इंटेलिजेंट आणि स्मार्ट मटेरिअल्स, नॅनोमटेरिअल्स, बायोमटेरिअल्स, कंपोझिट्स, कॉम्प्युटेशनल मटेरिअल्स मॉडेलिंग आणि सिम्युलेशन यांसारख्या क्षेत्रांसह AIML, डेटा सायन्स, Phython प्रोग्रामिंग, IOT यांसारख्या आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमावर भर दिला जातो.

आजकाल अनेक सॉफ्टवेअर्स मटेरिअल्सच्या डिझायनिंग, मॉडेलिंगसाठी उपलब्ध आहेत. ज्याचा उपयोग आपण विविध क्षेत्रात आवश्यक असणार्‍या मटेरिअल्सच्या डिझायनिंगसाठी करू शकतो. या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपल्याला प्रत्येक मटेरिअलच्या गुणवत्तेचा बारकाईने अभ्यास करून उत्तम प्रोडक्ट डिझाईन करण्यासाठी करता येतो. मटेरिअल कोणतेही, मटेरिअल्सच्या नॅनो ते मॅक्रो म्हणजेच अतिसूक्ष्म ते अतिभव्य प्रमाणात डिझाईन आपण या सॉफ्टवेअर्सच्या मदतीने करू शकतो. तसेच एखाद्या कामासाठी कोणत्या प्रकारच्या मटेरिअलचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येईल हेही ठरवू शकतो. या शाखेत मुख्यत्वे उद्योग-संबंधित संगणकीय आणि प्रायोगिक तंत्रांकडे लक्ष वेधून कौशल्ये विकसित केली जातील, अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाची रचना करतात.

ही शाखा संगणकीय, डिझायनिंग, प्रोसेसिंग, परफॉर्मन्स यांचा सुरेख संगम आहे, ज्यात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. जसे, विविध मटेरिअल डिझाईन आणि विकास संबंधित उद्योगांमध्ये मटेरिअल अभियंता, उत्पादन अभियंता, डिझाईन अभियंता, गुणवत्ता विश्लेषक, उत्पादन/प्रक्रिया विकास अभियंता म्हणून करिअर करू शकता तसेच डीआरडीओ, एनसीएल, सीमेट, एआरडीई, एचईएमआरएल, बीएचईएल, बीईएल, इत्यादी विविध नामांकित सरकारी संस्थांमध्ये मटेरिअल सायंटिस्ट आणि अभियंता म्हणून उत्कृष्ट करिअर करू शकता.

याशिवाय या क्षेत्रामधील उच्चशिक्षण आणि संशोधनाच्या संधी भारतात आणि भारताबाहेर उपलब्ध आहेत. यामध्ये भारतात प्रामुख्याने आयआयटी, आयआयएससी, आयसीटी, डीआरडीओ, एनसीएल, सीमेट यांसारख्या संस्थांमध्ये तसेच भारताबाहेर अमेरिका, सिंगापूर, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलियामधील नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होतात. कोरोना व्हायरसच्या उपचारामध्ये आवश्यक असणार्‍या पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स, टेस्टिंग अँड सॅम्पलिंग किट्स अँड इतर वैद्यकीय साधनांमध्ये इंटेलिजेंट आणि स्मार्ट मटेरियल्स, नॅनोमटेरियल्स, बायोमटेरिअल्सचा वापर महत्त्वाचा ठरला. मटेरिअल्स सायन्स अँड इंजिनिअरिंग हा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी बारावीमध्ये पीसीएम घेऊन जेईई व एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून या शाखेत प्रवेश घेता येऊ शकतो.

मटेरिअल्स सायन्स अँड इंजिनिअरिंग ही शाखा दिवसेंदिवस विकसित होत आहे, त्यामुळे आपले जीवन अधिकाधिक सुसह्य होत आहे. या संधीचा पुरेपूर वापर करून प्रगतीची वाटचाल नक्कीच करता येऊ शकते. त्यासाठी मटेरिअल्स सायन्स अँड इंजिनिअरिंग या शाखेचा एक चांगली करिअर संधी म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विचार करावा.

डॉ. मल्हारी कुलकर्णी

SCROLL FOR NEXT