Latest

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात दर्शन वेळ पहाटे ५ ते रात्री ९

अमृता चौगुले

कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून बंद असणारी राज्यातील मंदिरे घटस्थापनेच्या मुहूर्तावर दर्शनासाठी खुली होत आहेत. यामुळे दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापनांसह जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा इशारा देण्यात आल्याने सुरक्षिततेच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे.

करवीरनिवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा, जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिर, टेंबलाई टेकडीवरील त्र्यंबोली मंदिर यासह नवदुर्गा मंदिरांमध्ये नवरात्रौत्सवासह दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव दि. 7 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे. यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार अटी-शर्तींच्या सक्तीनुसार दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

नवरात्रौत्सव काळात 14 ऑक्टोबर (खंडेनवमी) हा दिवस वगळता मंदिर दि. 7 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पहाटे 5 ते रात्री 9 या वेळेत दर्शनासाठी खुले राहणार आहे. गुरुवार, दि. 14 रोजी मंदिर सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत दर्शनासाठी सुरू राहील. भाविकांना 'ई-दर्शन पास'द्वारे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी करवीरनिवासिनी अंबाबाई देवस्थानच्या वतीने 'ई-दर्शन पास www.mahalaxmikolhapur.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मेडिकल कॅम्प व नियंत्रण कक्ष मंदिराच्या पूर्व दरवाजाकडील दर्शन मंडपाच्या शेजारी मेडिकल कॅम्प व नियंत्रण कक्षा करीता जागा निश्चित केली आहे.

11 ठिकाणी एलईडी स्क्रीन

नवरात्रोत्सव काळात दररोज होणारे धार्मिक सोहळे, पारंपारिक विधी भाविकांना गर्दी न करता पाहता यावेत यासाठी देवस्थान समितीच्यावतीने शहरात 11 ठिकाणी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. यावरून भावीकांना मंदीरात दररोज बांधण्यात येणारी देवीची पूजा, पालखीचे थेट दर्शन, कोव्हीड बाबत सूचना देण्यात येणार आहेत. करवीर निवासिनो विद्यापीठ (दक्षिण) दरवाजा, जोतिबा रोड, बिनखांबी गणेश मंदिर, छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौक, उभा मारुती चौक, शिवाजी पेठ, बागल चौक (शाहू मिल), गंगावेश, मिरजकर तिकटी, क्रशर चौक सानेगुरुजी रोड, राजारामपुरी जनता बझार चौक या 11 ठिकाणी या स्क्रीन बसविण्यात येणार आहेत.

देणगीसाठी क्यूआर कोड

भाविकांना देणगी द्यावयाची असल्यास दर्शन मंडपांमध्ये टठ कोड सह बँक खात्याचा तपशील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याद्वारे करवीर निवासिनी अंबाबाई चरणी देणगी अर्पण करता येणार आहे.

भाविकांसाठी विविध सुचना

1) चप्पल, बॅग किंवा इतर कोणत्याही वस्तु स्वतःच्या वाहनांमध्ये ठेवाव्यात. 2) मंदिरामध्ये साडी, ओटी, नारळ, तेल, पुजेचे कोणतेही साहित्य किंवा इतर कोणतेही सामान घेवून जाण्यास सक्त मनाई आहे. 3) 10 वर्षाखालील तसेच 65 वर्षावरील व्यक्ती, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती, रेड झोन, कन्टेन्मेंट झोन मधील व होम क्वारंटाईन असलेल्या भक्तांनी दर्शनाकरीता मंदिरात येवू नये. 4) दररोज मर्यादित संख्येमध्ये दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याने 'ई-दर्शन' पास बंधनकारक राहिल. 5) सदरची सेवा निःशुल्क असून भाविकांसोबत ई पास किंवा त्याचा संदेश असणारा मोबाईल व प्रत्येकाचे आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. अन्यथा प्रवेश मिळणार नाही. एका पासवर नोंदणी केलेल्या सर्वांनी एकत्रच दर्शनासाठी जाणे आवश्यक आहे. एका पासवर एकदाच दर्शन करता येईल. 6) भाविकांना मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे. खराब मास्क, हातमोजे, फेस कव्हर मंदिर परिसरामध्ये इतरत्र न टाकता पिवळया कचरा कुंडीतच टाकावेत. 7) दर्शन रांगेमध्ये 6 फुटाचे अंतर ठेवून वैयक्तिक अंतर नियमाचे पालन करावे. 8) ऑनलाईन बुकींग लिंक दि. 6 ऑक्टोंबर, रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उपलब्धअसून बुकींग केलेल्या भाविकांनी दर्शन मंडपामध्ये 'ई-दर्शन' पास पडताळणीकरीता नियोजीत वेळेपूर्वी 30 मिनिटे अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. पडताळणी करीता SMS / QR Code / ई पास क्रमांक व्दारे पडताळणी करूनच मंदिर प्रवेश निश्चित करण्यात येईल. 9) प्रत्येक तासाला 700 भाविकांना 'ई-दर्शन' पासव्दारे दर्शन घेता येणार आहे. 10) दर्शन रांगेमध्ये व मंदिरामध्ये मोबाईल बंद ठेवावा.

देणगीसाठी क्यूआर कोड

भाविकांना देणगी द्यावयाची असल्यास दर्शन मंडपांमध्ये क्यूआर कोडसह बँक खात्याचा तपशील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याद्वारे करवीर निवासिनी अंबाबाई चरणी देणगी अर्पण करता येणार आहे.

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम

मंदिरात नवरात्रौत्सवात दरवर्षी होणारे सर्व पारंपरिक व धार्मिक विधी-कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार आहेत. रविवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी कोहळा पंचमीनिमित्त अंबाबाईची पालखी त्र्यंबोलीदेवीच्या दर्शनासाठी गतवर्षीप्रमाणे वाहनातूनच नेण्यात आणि आणण्यात येणार आहे. बुधवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता, अष्टमी रोजी देवीच्या वाहनाची नगरप्रदक्षिणाही वाहनातूनच काढण्यात येणार आहे. शुक्रवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी पालखी वाहनातून केवळ पंचगंगा नदीघाटावर धार्मिक पूजा विधीकरिता नेऊन परत आणण्यात येणार आहे.

10 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था

शहरात येणार्‍या भाविकांच्या पार्किंगकरिता 10 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. यात महात्मा गांधी मैदान, छत्रपती शिवाजी स्टेडियम, छत्रपती शाहू स्टेडियम पूर्व बाजू, दसरा चौक, प्रायव्हेट हायस्कूल मैदान, पेटाळा-पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, पंचगंगा नदीघाट, खानविलकर पेट्रोल पंपाशेजारील प्रस्तावित 100 फुटी रोडवरील मोकळी जागा, निर्माण चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणांचा समावेश आहे. पार्किंग तळांवर भाविकांना सूचना देण्याकरिता स्पीकर सिस्टीम, सीसीटीव्ही, मोबाईल टॉयलेट, पाण्याची सोय करण्यात येणार आहे.

जोतिबा डोंगरावर जय्यत तयारी

जोतिबा डोंगर : जोतिबा डोंगर येथे गुरुवारपासून सुरू होणार्‍या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे. या अनुषंगाने सोमवारी मंदिरातील पाकाळणी सोहळा संपन्न झाला. यामध्ये मंदिर परिसर पाण्याने स्वच्छ केला. ग्रामपंचायतीकडून रस्ते, प्रसाधनगृहे, गटारी, दर्शन मार्गाचे डिजिटल, स्पीकर, विद्युत बल्ब आदी गोष्टींची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. देवस्थान समितीकडून पार्किंग, दर्शन रांग, नियंत्रण कक्ष यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संपूर्ण मंदिर परिसर व पार्किंग भागाची पाहणी केल्यानंतर योग्य त्या सूचना ग्रामपंचायत व देवस्थान समितीस दिल्या आहेत. सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

उद्यापासून आदमापूरचे बाळूमामा मंदिर सुरू

मुदाळतिट्टा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा यांचे मंदिर अमावस्या यात्रेदिवशी 5 व 6 ऑक्टोबर रोजी दर्शनासाठी बंद राहणार आहे. मात्र, 7 ऑक्टोबर म्हणजे घटस्थापनेपासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी दिली. दसरा सणाचे औचित्य साधून मंदिर स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, प्रशासन यांचे आदेश मानून देवालय समिती सर्व त्या सेवासुविधा उपलब्ध करून देणार आहे. 7 ऑक्टोबर, घटस्थापना दिवशी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

सात महिन्यांनी नृसिंहवाडी दत्त मंदिर दर्शनासाठी होणार खुले

नृसिंहवाडी : विनोद पुजारी
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर कोरोना महामारीमुळे 22 मार्च 2021 पासून दर्शनासाठी बंद होते. यामुळे पंचक्रोशीतील सर्व अर्थव्यवहार ठप्प झाले होते. राज्य शासनाने गुरुवारी (दि. 7) घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्व मंदिरे खुली करण्याचे आदेश जारी केले आहेत. यामुळे शासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करून दत्त मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येत आहे. त्यामुळे येथे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री दत्तात्रयांचे अवतार नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, या दत्त क्षेत्री महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांतून लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेत असतात. परंतु, कोरोना प्रादुर्भावामुळे केंद्र आणि राज्य शासनाने मंदिरे बंद केल्यामुळे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरावर अवलंबून असलेल्या शेकडो व्यावसायिकांचे अर्थकारण ठप्प झाले होते. या कोरोना महामारी काळातच येथे महापूरही आल्यामुळे सर्वच घटकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. यामुळे शेतकरी, मिठाई दुकानदार, पौरोहित्य करणारे तसेच सर्व नागरिक यांना मोठा फटका बसल्यामुळे येथील दत्त मंदिर दर्शनासाठी उघडण्याची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली होती. राज्य शासनाने घटस्थापनेचा मुहूर्त ठरवला आणि या मुहूर्तावर मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, घटस्थापनेपासून येथील दत्त मंदिर दर्शनासाठी शासकीय नियमानुसार खुले करण्यात येणार असल्याची माहिती श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान अध्यक्ष मेघश्याम पुजारी, सचिव महादेव पुजारी व अन्य विश्वस्तांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT