Latest

भूतानने वाढवली चिंता

Arun Patil

भारत-चीनच्या प्रश्नासंदर्भात भूतानच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या भूमिकेमुळे 'घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे', अशी भारताची अवस्था झाली आहे. आनंदी लोकांचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या भूतानचे पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांनी त्यांच्या बेल्जियम दौर्‍यात 'ला लेब्रे' या बेल्जियम वृत्तपत्राला दिलेली मुलाखत भारतासाठी निश्चितच आनंददायक नाही. त्यांनी भारताच्या चिंतेत नव्याने भर घातली आहे. भारत-चीन प्रश्नासंदर्भात नव्याने पुढे आलेला हा तिसरा कोन भारताला भविष्यात सतत टोचणी तर देणार नाही ना, अशी शंकाही त्यामुळे निर्माण झाली आहे. तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2020 मध्ये भूतानच्या सीमेच्या आत चीनने गावे वसवल्याची बातमी आली होती. त्यासंदर्भात स्पष्टीकरण देताना लोटे त्सेरिंग यांनी संबंधित गावे त्या देशाच्या सीमेच्या आत नसल्याचे म्हटले आहे. चीनने कोणतेही अतिक्रमण केलेले नाही, ही एक आंतरराष्ट्रीय सीमा आहे आणि आमची सीमारेषा कुठपर्यंत आहे, याची आम्हाला कल्पना आहे.

भूतानच्या सीमेच्या आत चीनने गावे वसवल्याची चर्चा माध्यमांतून सुरू असते, त्याच्याशी आमचा संबंध नाही, कारण तो भाग भूतानमध्ये येतच नाही, हे त्यांचे स्पष्टीकरण चक्रावून टाकणारे आणि संशयात भर घालणारेच आहे. हे वक्तव्य निखालस खोटे असल्याचे आणि त्यांनी ते चीनच्या दबावाखाली दिल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. भूतानच्या वायव्येला तिबेट आणि भारताच्या ईशान्येला भूतानची सीमा. त्यामुळे चीन आणि भारत या दोन्ही देशांसाठी या देशाचे विशेष महत्त्व. भारत-चीन यांच्यातील संघर्ष जुना आहे आणि भारताच्या द़ृष्टिकोनातून पाकिस्तानपेक्षाही चीन धोकादायक आहे. त्याचप्रमाणे भूतानसोबतही चीनचा सीमावाद खूप वर्षांपासूनचा आहे. या देशाच्या 764 चौरस किलोमीटर जमिनीवर चीनचा दावा आहे. अशा परिस्थितीत तेथे चीनचे अस्तित्व वाढू लागले, तर ते भारतासाठी धोकादायक ठरू शकते.

या देशाला आजही भारताचा विश्वासू आणि निष्ठावान शेजारी देश म्हणून ओळखले जाते. अन्य शेजारी राष्ट्रांसोबत भारताच्या संबंधांमध्ये चढ-उतार दिसले असले तरी याबाबतीत असे कधी घडले नव्हते. वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे तो भारताचा मित्र असताना दुसरीकडे भूतान आणि चीनमध्ये राजनैतिक संबंधही नाहीत. त्याचमुळे चीनच्या बाजूने झुकलेले त्यांच्या या वक्तव्याचे गांभीर्य वाढते. बलदंडाने छोट्यांना गुलामासारखे वागवणे किंवा त्यांच्याकडून हवे ते करवून घेण्याचे सूत्र आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांमध्ये चीन ज्याप्रमाणे नेपाळपासून मालदीवपर्यंत ठिकठिकाणी वर्चस्व वाढवीत आहे आणि भारतविरोधी वातावरण तयार करीत आहे, त्याच मालिकेत आता भूतान समाविष्ट झाला आहे की काय, अशी शंका नव्या घडामोडींमुळे निर्माण झाली आहे.

गेल्या महिन्यात भूतानच्या शिष्टमंडळाची चीनमध्ये बैठक झाली, शिवाय पुढील महिन्यात चीनच्या शिष्टमंडळाचा थिम्पू दौरा आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांच्या मुलाखतीकडे पाहावे लागते. या नव्या कथित संबंधांमुळे भारताच्या सुरक्षिततेसंदर्भातील चिंता वाढू शकते. सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या ईशान्य भागाला जोडणार्‍या भारत सिलीगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेच्या द़ृष्टिकोनातून डोकलाममधील चीनच्या हालचाली चिंता वाढवणार्‍याच आहेत. डोकलाम ट्रायजंक्शनवर चीनसोबत द्विपक्षीय नव्हे, तर त्रिपक्षीय चर्चा होईल, असे काही महिन्यांपूर्वी भूतानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले होते. भूतान, भारत आणि चीन या तिन्ही देशांच्या हितांचा विचार केला जाईल, असेही त्यांनी म्हटले होते. मूळ मुद्दा आहे तो चीनने भूतानच्या हद्दीत केलेल्या अतिक्रमणाचा. पंतप्रधानांनी जो दावा केला, तो अनेक अभ्यासकांनी खोडून काढला आहे. चीनने जी गावे वसवली, ती भूतानच्या पश्चिम, उत्तर आणि ईशान्य सीमेच्या आत वसवल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तिबेटी इतिहासाचे तज्ज्ञ रॉबर्ट बर्नेट यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यासंदर्भातील वस्तुस्थिती जगासमोर आणली आहे. रॉबर्ट बर्नेट यांच्या म्हणण्यानुसार चीनने तीन गावे भूतानच्या उत्तर सीमेच्या आत, दोन गावे ईशान्य सीमेच्या आत आणि पाच गावे पश्चिम सीमेच्या आत वसवली. आंतरराष्ट्रीय, चिनी आणि भूतानच्या नकाशाच्या आधारे आपण हा दावा करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चीनने इतक्या ढळढळीतपणे अतिक्रमण केलेले असतानाही भूतानचे पंतप्रधान ते मान्य करायला तयार नाहीत, याचे अनेक अर्थ अभ्यासकांकडून काढले जात आहेत. आंतरराष्ट्रीय, चिनी आणि भूतानचा जो नकाशा वर्षानुवर्षे प्रचलित आहे, तो चुकीचा असल्याचा एक निष्कर्ष या वक्तव्यातून काढला जातो. किंवा दुसरा एक निष्कर्ष असा निघू शकतो की, ज्या भागामध्ये चीनने गावे वसवली, तो आपला नसल्याचे भूतानने मान्य केले आहे. खरे तर भारत-चीन यांच्यातील संघर्ष 2017 मध्ये चिघळला. नैऋत्य भूतानकडील डोकलाममध्ये चीनने रस्ता बनवण्याचा प्रयत्न केला. डोकलामचा प्रदेश भारताला लागून असल्यामुळे भारताकडून त्याला तीव— विरोध झाला आणि सुमारे अडीच महिने दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर ठाकले. असे सगळे चित्र जगासमोर असताना पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांची नवी भूमिका आश्चर्यकारक असल्याचे मानले जाते. भूतानने आपली जमीन चीनच्या ताब्यात दिली आणि बाकीच्या जगाला त्याची वार्ता लागू दिली नाही, अशीही एक शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राप्त परिस्थितीत भूतान गोंधळला किंवा घाबरला असल्याचे स्पष्ट दिसून येते. चीनशी आजवर संबंध न ठेवलेल्या या देशाची पावले वेगळ्या दिशेने पडू लागली आहेत.

भारताशी असलेले पारंपरिक संबंध पणाला लावून तो चीनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहे, ही भारतासाठी निश्चितच चिंताजनक बाब आहे. बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि राजनैतिक पातळीवर प्रश्न हाताळणे हाच पर्याय भारतासमोर आजघडीला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT