Latest

भारतातील दहशतवादाचे केंद्र पाकमध्ये : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात घडविल्या जाणार्‍या दहशतवादी कारवायांचे केंद्र पाकिस्तानात आहे, असा घणाघाती दावा केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केला आहे.

ऑस्ट्रियामधील एका वृत्तवाहिनीच्या अँकरने टॉक शोमध्ये पाकिस्तानबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला जयशंकर यांनी सणसणीत उत्तर दिले असून, त्याविषयीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पाकिस्तानचा उल्लेख जयशंकर यांनी 'दहशतवादाचा अड्डा' असा स्पष्टपणे केला आहे.

जयशंकर यांनी पाकिस्तानचा उल्लेख 'दहशतवादाचा अड्डा' असा केल्याबद्दल संबंधित अँकरने विचारलेल्या प्रश्नाला भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी कडक शब्दांत उत्तर दिले. ते म्हणाले, तुम्ही डिप्लोमॅट आहात याचा अर्थ तुम्ही खोटारडे असायला हवे असा होत नाही. मी त्यापेक्षाही कठोर शब्द वापरू शकलो असतो. विश्वास ठेवा, आमच्याबाबत जे काही घडत आले आहे त्यावरून मला वाटते, 'केंद्रबिंदू' हा फारच डिप्लोमॅटिक शब्द आहे. कारण, हा तोच पाकिस्तान आहे, ज्याने काही वर्षांपूर्वी भारताच्या संसदेवर हल्ला केला होता. याच देशाने मुंबईवर हल्ला केला होता. हॉटेल आणि परदेशी पर्यटकांवर हल्ले केले होते.

जागतिक पातळीवर दहशतवादाची भरपूर चर्चा केली जाते. जेव्हा भारत आणि पाकिस्तानचा मुद्दा येतो तेव्हा अन्य देश मौन पाळणे पसंत करतात. कारण, दहशतवादाच्या घटना त्यांच्या अंगणापासून दूर घडत असतात, असा टोला केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लगावला. अमली पदार्थ आणि बेकायदा शस्त्रांच्या तस्करीला कोणता देश उघडपणे प्रोत्साहन देतो हे मी सांगण्याची गरज नाही. तो देश आमचा शेजारीही असू शकतो, असेही त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT