Latest

भारताच्या विजयाने शिवाजी चौकात जल्लोष

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भारतीय संघाने अत्यंत अटीतटीच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. या विजयामुळे दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच सर्वत्र आतषबाजी पहायला मिळाली. शहराच्या मध्यवर्ती छत्रपती शिवाजी चौकात एकत्रित जमून जल्लोष साजरा केला. भारतीय ध्वज घेऊन दुचाकींवरून तरुणाईने जल्लोषी मिरवणुका काढल्या. 'जय भवानी, जय शिवाजी', 'भारत माता की जय', अशा घोषणांनी शहर दुमदुमले.

अखरेच्या षटकापर्यंत अत्यंत थरारक झालेल्या भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणार्‍या या सामन्यातील अखेरचे षटक चाहत्यांच्या कायमचा लक्षात राहणारे ठरले. प्रत्येक चेंडूगणीक जल्लोष आणि निराशा असे चित्र होते. शेवटच्या षटकात दोन विकेट गेल्या तर कोहलीचा षटकार, नो बॉल, व्हाईटबॉल अशा प्रत्येक घडामोडीनंतर फटाके फुटत होते. अश्विनच्या चौकारासोबतच घराघरात जल्लोषाला सुरुवात झाली. अनेक तरुण भारतीय तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरले. शहराच्या मध्यवर्ती छत्रपती शिवाजी चौक काही मिनिटांतच गर्दीने फुलून गेला.

फटाक्यांची आतषबाजी

दिवाळीच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाच्या या विजयाने अनेकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. एकदिवस आधीच दिवाळीचे वातावरण शहरात अनुभवायला मिळाले. गल्लोगल्ली तसेच चौकांमध्ये ही आतषबाजी उशिरापर्यंत सुरू होती.

शिवाजी चौक हाऊसफुल्ल

सामना संपताच छत्रपती शिवाजी चौक गर्दीने फुलून गेला. भगवे ध्वज, तिरंगा ध्वज, फटाके घेऊन कार्यकर्ते चौकात दाखल झाले होते. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी', 'भारत माता की जय', अशा घोषणांनी शिवाजी चौक दणाणून गेला.

इचलकरंजीत आनंदोत्सव

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर विजय मिळवला. त्यामुळे इचलकरंजी येथील तरुणाईने राजर्षी शाहू महाराज पुतळा परिसरात आनंदोत्सव साजरा केला.

तत्पूर्वी सुमारे 200 हून अधिक युवकांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मोटारसायकल रॅली काढली. 'भारत माता की जय…'च्या घोषणा देत आनंद साजरा केला. यावेळी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. ऐन दिवाळीत भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवल्याने दिवाळीतच भारतीयांची दुसरी दिवाळी साजरी झाली. दुपारी दीड वाजता सुरू झालेला सामना सायंकाळी 5.30 च्या दरम्यान संपला. शेवटच्या चेंडूवर भारतीय फलंदाजाने धाव घेताच जल्लोषात सुरुवात झाली.

SCROLL FOR NEXT