Latest

भारताचे मिशन आशिया कप धोक्यात

backup backup

दुबई; वृत्तसंस्था : सुपर-4 मधील सलग दोन पराभवामुळे भारताचे 'मिशन आशिया चषक' धोक्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने भारताला 6 विकेटनी हरवले. 'करो या मरो' सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 174 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 41 चेंडूंत 72 धावांची आक्रमक खेळी केली. हे आव्हान लंकेने एक चेंडू राखून पूर्ण केले. श्रीलंकेच्या पथुम निसंका (52) आणि कुसल मेंडीस (57) यांनी 97 धावांची भागीदारी करून विजयाची पायाभरणी केली होती, परंतु यजुवेंद्र चहलने 34 धावांत 3 विकेट घेत भारताला संधी निर्माण केली. शेवटच्या षटकांत लंकेला विजयासाठी फक्‍त 7 धावा हव्या होत्या. दासून शनाका आणि धनुष्का राजपक्षा यांनी एक चेंडू शिल्‍लक विजय साकार केला.

आशिया चषकातील प्राथमिक फेरीतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर सुपर-4 फेरीत भारताने दोन सामने गमावले. पहिल्यांदा त्यांना पाकिस्तानने पराभूत केले तर आता श्रीलंकेने हरवले. या फेरीत चार पैकी दोन टॉपचे संघ फायनलमध्ये जाणार आहेत, त्यामुळे भारताचे आव्हान आता संपल्यात जमा आहे. भारताचा आता अफगाणिस्तान विरुद्ध शेवटचा सामना होणार आहे.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकन सलामीवीरांनी धडाक्यात सुरुवात केली. दोघांनी 33 चेंंडूंत संघाची पन्‍नाशी ओलांडली. पॉवरप्लेमध्ये संघाच्या 57 धावा झाल्या होत्या.पथुम निसंकाने 32 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. 10 षटकांत लंकेने 89 धावा केल्या होत्या. भारताला पहिली विकेट मिळायला बारावे षटक उजाडले. पहिल्या 2 षटकांत 23 धावा देणार्‍या यजुवेंद्र चहलने निसंकाला (52) बाद केले. त्याने 4 चौकार 2 षटकार मारले. त्यानंतर चौथ्या चेंंडूवर चरिथ असलंका (0) शून्यावर बाद झाला. यावेळी लंकेला 50 चेंडूंत 77 धावा हव्या होत्या. दरम्यान, कुसल मेंडीसने 33 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण अश्‍विनने धनुष्का गुणतिलकाला (1) बाद करून भारताला पुन्हा सामन्यात पदार्पण करून दिले. चहलने आपली तिसरी विकेट घेताना कुसल मेंडीसला बाद करुन भारताला मोठे यश मिळवून दिले. मेंडीसने 57 धावा करताना 4 चौकार, 3 षटकार ठोकले.

लंकेला शेवटच्या 4 षटकांत 42 धावा हव्या होत्या. मैदानावर होते दासून शनाका आणि भानुका राजपक्षा. या षटकांत अर्शदीपने 9 धावा दिला. त्यानंतर हार्दिक पंड्याच्या षटकांत 12 धावा आल्या. त्यामुळे शेवटच्या 12 चेंडूंत 21 धावांचे समीकरण आले. 19 वे षटक टाकण्याची जबाबदारी अनुभवी भुवनेश्‍वर कुमारकडे देण्यात आली, परंतु भुवीने 14 धावा दिल्याने शेवटच्या षटकांत फक्‍त 7 धावांचा बचाव करण्याची जबाबदारी अर्शदीपवर आली.

शेवटच्या षटकांत पहिल्या दोन चेंडंवर दोन एकेरी आणि तिसर्‍या चेंडूवर दोन धावा गेल्या. चौथ्या चेंडूवर एक धाव मिळाली. पाचवा चेंडू शनाकाला मारता आला नाही, चेंडू पंतच्या हातात गेला, पण फलंदाजांनी धाव घेतली, पंतने थ्रो मारला पण स्टम्पवर लागला नाही, तो अर्शदीपच्या हातात गेला, त्यानेही थ्रो मारला तोही हुकला आणि फलंदाजांनी दुसरी धाव पूर्ण केली आणि सामना जिंकला.

तत्पूर्वी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या दुसर्‍याच षटकात महीश तिक्ष्णाने केएल राहुलला पायचित बाद केले. राहुल फक्‍त 6 धावांवर माघारी परतला. यानंतर आशिया कपमध्ये सलग दोन सामन्यांत दोन अर्धशतकी खेळी करणारा विराट कोहली क्रीजवर आला. मात्र डावखुरा वेगवान गोलंदाज मधुशंकाने त्याचा शून्यावरच त्रिफळा उडवला.
विराट आणि केएल राहुल स्वस्तात माघारी गेल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आक्रमक अर्धशतक ठोकत भारताचा डाव सावरला. त्याने सूर्यकुमार यादवबरोबर भागीदारी रचत भारताला 10 षटकांत 79 धावांपर्यंत पोहोचवले. यानंतर आक्रमक फलंदाजी करत रोहित शर्माने भारताला 12 व्या षटकांत शतक पार करून दिले. मात्र रोहितची ही 41 चेंडूंत केलेली 72 धावांची खेळी करुणारत्नेने संपवली. पाठोपाठ सूर्यकुमार यादव देखील 29 चेंडूंत 34 धावा करून बाद झाला.

हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांनी काही आक्रमक फटके मारले. मात्र ते दोघेही प्रत्येकी 17 धावा करून बाद झाले. दीपक हुड्डानेही निराशा केली. तो शेवटची 2 षटके राहिली असताना 3 धावांवर बाद झाला. अखेर अश्‍विनने शेवटच्या दोन चेंडूंवर 8 धावा करत भारताला 20 षटकांत 8 बाद 173 धावांपर्यंत पोहोचवले. श्रीलंकेकडून मधुशंकाने 3 तर चमिका करुणारत्ने आणि शनकाने 2-2 विकेट घेतल्या.
जर-तर च्या समीकरणात भारताला निसटती संधी?

श्रीलंकेने भारतावर विजय मिळवून आशिया चषक 2022 स्पर्धेच्या अंतिम फेरीतील जागा पक्के केली आणि भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले. पाकिस्तानच्या खात्यात 1 विजय आहे आणि त्यांच्या दोन लढती शिल्लक आहेत. पाकिस्तानला उर्वरित दोन सामन्यांत अफगाणिस्तान व श्रीलंका यांच्याशी खेळायचे आहे. यापैकी एक सामना जिंकल्यास पाकिस्तान अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि पाकिस्तान- श्रीलंका यांच्यात जेतेपदाची लढत होईल.

पण, भारताला अजूनही एक संधी आहे. पाकिस्तानने दोन्ही सामने गमावल्यास आणि भारताने अफगाणिस्तानला पराभूत केल्यास, सुपर 4 मधील उर्वरित तीन संघांचे प्रत्येकी एक विजय होतील. अशात ज्याचा नेट रन रेट चांगला असेल तो संघ अंतिम फेरीत जाईल. सध्याच्या घडीला पाकिस्तानचा नेट रन रेट 0.126 असा, तर अफगाणिस्तानचा -0.589 असा आहे. भारताचा नेट रन रेट -0.125 झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT