Latest

भारताकडून अण्वस्त्रांचे अत्याधुनिकीकरण!

Arun Patil

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : आपल्याविरुद्ध घट्ट होत चाललेल्या चीन-पाकिस्तान सामरिक युतीविरोधात भारताने वज्रमूठ आवळली आहे. प्रसंग उद्भवल्यास एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर युद्धासाठीची सज्जता आणि क्षमता अर्जित करण्याचा सपाटाच भारताने चालविलेला आहे. याच दिशेने उचललेले एक खंबीर पाऊल म्हणून भारताने आपल्या भात्यातील सर्व अण्वस्त्रांचे अत्याधुनिकीकरण सुरू केले आहे. दोन्ही दिशांनी वेगवेगळ्या ठिकाणांवर एकाचवेळी महाविनाश घडविता येईल, अशा बेताने अणुबॉम्ब डागता यावेत म्हणून भारत 4 नव्या यंत्रणाही विकसित करत आहे, असा खळबळजनक दावा अमेरिकेतील 'फेडरेशन ऑफ अमेरिकन सायन्टिस्ट' (अमेरिकन शास्त्रज्ञांचा महासंघ) या प्रतिष्ठित संघटनेने केला आहे.

चीन तसेच पाकिस्तानला लागून असलेल्या सीमांवरील परिस्थितीच्या अनुषंगाने अन्य कुठल्याही बाबींपेक्षा भारत आपल्या सैन्य क्षमतेवर सर्वाधिक लक्ष देतो आहे. सातत्याने क्षमता वाढवतो आहे. अण्वस्त्रांचे अद्ययावतीकरणही भारताने सुरू केले आहे. तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत भारताचे अण्वस्त्र धोरण पाकिस्तानला डोळ्यासमोर ठेवून ठरत असे. आता भारताचे अधिक लक्ष 'ड्रॅगन'कडे (चीन) आहे. अण्वस्त्रवाहू विमाने, जमिनीवरून रॉकेटच्या माध्यमातून मारा करता येईल असे अणुबॉम्ब आणि पाणबुडीतून मारा करता येईल असे बॉम्ब भारत अद्ययावत करत आहे. यासह या सर्वांना पूरक, त्यांची जागा घेऊ शकतील असे अथवा त्यांच्याऐवजी वापरता येतील, असे पर्यायही भारताने शोधून काढल्यात जमा आहेत, हेदेखील महासंघाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

अण्वस्त्रांसाठी प्लुटोनियमचा स्रोत मुंबईतील भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमधील ध्रुव रिअ‍ॅक्टर (अणुभट्टी) हा आहे. प्लुटोनियम उत्पादनवाढीसाठी भारत आणखी एक अणुभट्टी तयार करण्याच्या बेतात आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT