Latest

भारत चीन संघर्ष : ड्रॅगनचा मुखभंग

Arun Patil

पूर्व लडाखमधील गलवान खोर्‍यात भारताशी संघर्ष करणारा चीन गेली दोन वर्षे सातत्याने आपल्या ताकदीचा टेंभा मिरवत होता. दोन्ही देशांमधील समझोत्याचा भंग करून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संकेत झुगारून चीनने सीमेवर गेली दोन वर्षे उच्छाद मांडला आहे. गेल्या चाळीस वर्षांतील सर्वात गंभीर संघर्ष इथे दीड वर्षापूर्वी घडला. त्यामध्ये भारताचे वीस जवान शहीद झाले होते. या संघर्षावरून भारत सरकारला देशांतर्गत टीकेलाही सामोरे जावे लागत होते.

कोरोना काळातील विषाणूचा जन्मदाता देश म्हणून चीनची जगभर छी-थू होत असताना त्यापासून अन्यत्र लक्ष वळवण्यासाठी गलवान खोर्‍यात चीनकडून कुरापती सुरू होत्या. अशा संघर्षातील जीवितहानीवरून देशांतर्गत जनमतही विरोधात जात असते, तो धोका पत्करून भारत सरकारने वेळोवेळी या खोर्‍यातील नुकसानीची माहिती दिली. चीनने मात्र आपले नुकसान दडवून आपण फार मोठे शौर्य गाजवल्याचे आभासी चित्र निर्माण केले होतेच,

त्या फसव्या आधारावर खोटारडेपणाही चालवला होता; परंतु एका ताज्या संशोधनावरून चीनची ही लपवाछपवी उघड झाली असून त्या काळात चीनचीही मोठी मनुष्यहानी झाल्याचे समोर आले. चीनचा बुरखा टराटरा फाडणारे हे संशोधन आहे. गलवानमधील संघर्षाचा फटका एकट्या भारतालाच बसला असून चीन मात्र किरकोळ नुकसानीत निभावल्याचे जे चित्र निर्माण केले जात होते, त्याला यामुळे तडा गेला आहे. ऑस्ट्रेलियातील 'द क्लॅक्सन' वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या एका शोध अहवालानुसार 15 जून 2020 च्या संघर्षावेळी चीनचे चार सैनिक ठार झाल्याची माहिती देण्यात आली होती.

प्रत्यक्षात त्याहून नऊपट अधिक म्हणजे 38 जवानांचा त्यावेळी मृत्यू झाला होता. यासंदर्भातील शोधकर्ते आणि चीनच्या ब्लॉगर्सच्या हवाल्याच्या आधारे संबंधित वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. भारताने मात्र सुरुवातीपासून यासंदर्भात पारदर्शकता बाळगून आपल्या वीस सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाल्याचे म्हटले होते. चीनने त्यावेळी तर आपल्या मृत सैनिकांबाबत मौनच बाळगले होते. काही महिन्यांनी म्हणजे फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांनी आपल्या चार सैनिकांचा मरणोत्तर सन्मान करण्याची घोषणा केली होती.

चीनने आपल्या देशांतर्गत उभारलेल्या पोलादी भिंतीमुळे तेथील वस्तुनिष्ठ माहिती लोकांसमोर येणे कठीण असते. त्यामुळेच आपले नुकसान कमी झाल्याचा दावा करून जगासमोर आपले नाक वर ठेवण्याचा प्रयत्न चालवला होता. परंतु, त्यामागचे वास्तव नव्याने समोर आलेच. आपल्याकडील माहितीबाबत कोणत्याही राष्ट्राने कितीही गुप्तता पाळण्याचा प्रयत्न केला, तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्या माहितीला पाय फुटतात आणि सत्य जगासमोर येते. थोडा विलंब लागला, तरी सत्य कायमस्वरूपी काळाच्या उदरात गडप करता येत नाही.

गलवान खोर्‍यातील चीनच्या मनुष्यहानीची माहितीही तशीच जगासमोर आली. ऑस्ट्रेलियन दैनिकाच्या म्हणण्यानुसार गलवानसंदर्भात चर्चा होऊ नये आणि आपल्या नुकसानीची मूठ झाकलेलीच राहावी, यासाठी चीनकडून आटोकाट प्रयत्न करण्यात आलेे. चीनच्या या कृत्यामागे कथित बलदंडांमागची भेदरट मानसिकताच दिसून येते.

एखाद्या संघर्षात आपण मार खाल्ल्याबद्दल बलदंडांना काही वाटत नसते. त्यांना भीती वाटत असते की, आपण मार खाल्ला हे जगाला कळले, तर जगासमोर आपल्याला शरमिंदे व्हावे लागेल, वर्चस्वाला धक्‍का लागेल. त्यामुळे अशा बाबी दडवण्याचा प्रयत्न केला जातो. चीनने नेमके तसेच केले; परंतु त्यांचा तो डाव यशस्वी होऊ शकला नाही. या दैनिकाच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार 15 जून 2020 चा भारत-चीनमधील संघर्ष एका तात्पुरत्या पुलावरून निर्माण झाला होता, जो भारताने 22 मे रोजी गलवान नदीच्या एका बाजूला उभारला होता.

त्यावेळच्या संघर्षात चीनने अनेक तथ्ये दडवून स्वतःच्या बढाईच्या आणि भारताच्या नुकसानीच्या अनेक काल्पनिक कहाण्या प्रसृत केल्या. चीनच्या अधिकार्‍यांनी त्यासंदर्भातील अनेक ब्लॉग्ज हटवलेे; परंतु डिजिटल अर्काइव्हजच्या आधारे दडवलेल्या अनेक गोष्टी समोर आणण्यात शोधकर्त्यांना यश मिळाले. या संघर्षाचे नेमके कारणही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार या खोर्‍यातील तणाव कमी करण्यासाठी दोन्हीकडील अधिकारी एका बफर झोनसाठी सहमत झाले होते.

या बफर झोनमध्ये चीनकडून अवैध बांधकामे करण्यात येत होती; परंतु भारताने पूल उभारणी सुरू केल्यावर त्यांच्याकडून विरोध करण्यात आला. समझोत्याचे उल्लंघन करण्याबरोबरच आपल्या गस्तीच्या हद्दीचा विस्तारही चीनकडून करण्यात येत होता. याचा सरळ अर्थ असा होतो की, दोन्ही देशांमधील कराराचा भंग करून या खोर्‍यात चीनकडून सरळसरळ दादागिरी सुरू होती आणि भारतीय सैनिक त्याला जशास तसे उत्तरही देत होते. भारताच्या वीस सैनिकांच्या हौतात्म्याला कारणीभूत ठरलेल्या चीनलाही आपल्या 38 जवानांना गमावावे लागल्याचे ढळढळीत वास्तव या

अहवालाच्या निमित्ताने समोर आले असून चीनचे नाक ठेचले गेले. अर्थात, चीन सहजासहजी आपली नामुष्की मान्य करणारा देश नाही. काही तरी निमित्ताने कुरापती काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच असतो. हिवाळी ऑलिम्पिकच्या निमित्ताने त्यांनी केलेला ताजा चावटपणा त्यांच्या या वृत्तीचाच निदर्शक. गलवानाच्या संघर्षात जखमी जवानाच्या हाती हिवाळी ऑलिम्पिकची ज्योत देऊन चीनने भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा आपल्या युद्धखोरीच्या प्रदर्शनासाठी वापर करून संकेतांचा भंग केला. अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या वरिष्ठ सदस्याने ही लाजिरवाणी घटना असल्याचे म्हटले आहे. आर्थिक ताकदीच्या बळावर जागतिक महासत्तेचा टेंभा मिरवणार्‍या चीनला त्यामुळे काही फरक पडणार नसला, तरी या ड्रॅगनच्या शरीरात किती विष भिनले आहे, हे जगासमोर येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासाठी ती एक जमेची बाजू!

SCROLL FOR NEXT