Latest

भाजपमध्ये सातारा जिल्हा जिंकण्याचा दम नाही : शशिकांत शिंदे

दिनेश चोरगे

उंब्रज;  पुढारी वृत्तसेवा :  सातारा जिल्हा स्वाभिमानी आहे, व तो राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला आहे. त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला. दरम्यान, सातारा जिल्हा जिंकण्याचा दम भाजपमध्ये नाही असे सूचक विधान आ.शिंदे यांनी केले.

उंब्रज तालुका कराड येथे राष्ट्रवादीच्या बूथ कमिटी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील, आ. अरुण लाड, राष्ट्रवादी आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, तालुकाध्यक्ष देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, शहाजीराव क्षीरसागर, सौ.संगीता साळुंखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आ. शशिकांत शिंदे यांनी माण खटाव मतदार संघात भाजपच्या दिग्गजांनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत, हिम्मत असेल तर भाजपने भाजपचा कार्यकर्ता असलेली व्यक्ती निवडणुकीसाठी उभी करावी. तसेच विदर्भ व मराठवाड्याचा अनुषेश भरून काढावा असे आवाहन केले. तसेच बूथ कमिटी कागदावर कार्यरत न राहता प्रत्यक्ष कार्यरत असण्यासाठी बूथ कमिटीची योग्य बांधणी करावी, असे सांगितले.

आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात आंदोलन करण्यासाठी पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता रस्त्यावर उतरले पाहिजे. तसेच बूथ कमेटी स्थापन करताना कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून काम करणे गरजेचे आहे.
सारंग पाटील म्हणाले, बूथ कमिटीचे पदाधिकारी यांनी बूथमधील मतदारांच्या प्रत्यक्ष आकडेवारीचा अभ्यास केल्यास निवडणुकीतील विजय सोपा होणार आहे.

यावेळी आ. अरुण लाड, देवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कराड उत्तर मधील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक देवराज पाटील यांनी केले. आभार माजी पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. प्रमोद पुजारी यांनी मानले.

हे कमिशन सरकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार हे कमिशन सरकार आहे. शासन आपल्या दारी या शासनाच्या योजनेतून सर्वसामान्य जनतेला काहीच मिळाले नसल्याची टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT