Latest

भाजप-शिंदे गटात अद्याप मनोमिलन नाही

backup backup

कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटात, शिवसेनेचे एकमेव आमदार शिंदे गटात, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या महाविकास आघाडीची एकजूट अद्यापपर्यंत तरी कायम, तर जिल्ह्यात भाजप-शिंदे गटाचे मनोमिलनच नाही, अशा पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर नेते काय भूमिका घेणार, यावर जिल्ह्याचा राजकीय नकाशा निश्चित होणार आहे. या नकाशावर राज्य कोणाचे, हे मतदार ठरवतील. मात्र, नेत्यांची कसोटी पाहणारा हा काळ आहे.

जिल्ह्यात एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार होते. काँग्रेसचे तीन मंत्री होते. अशा जिल्ह्यात आता राष्ट्रवादी केवळ दोन आमदारांवर आहे. मात्र, काँग्रेसने पराभवाच्या राखेतून भरारी घेत शून्यावरून सहा आमदार अशी झेप घेतली आहे. विधानसभेपूर्वी झालेली लोकसभा निवडणूक पक्षापेक्षा व्यक्तिगत पातळीवर जास्त लढविण्यात आली. राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार धनंजय महाडिक यांचा थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 2 लाख 70 हजार 568 मतांनी पराभव करणारे शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद होती. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी 'आमचं ठरलंय' असे म्हणत पारंपरिक शत्रू धनंजय महाडिक यांच्या विरोधात दंड थोपटले आणि 'आमचं ठरलंय' हे त्यांचे वक्तव्य राज्याच्या राजकारणातील 'टॅगलाईन' बनली.

महाडिक यांचा पराभव झाला. मात्र, संधी येताच त्यांनी उसळी मारली. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभूत करून लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या धनंजय महाडिक यांनी विजय मिळविला. आता येणार्‍या निवडणुकीत महाडिक काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचे आहे. मुळात या निवडणुकीकडे दोन-तीन गोष्टींकडे पाहावे लागेल. 2014 ची निवडणूक धनंजय महाडिक विरुद्ध संजय मंडलिक अशी झाली होती. महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर मंडलिक शिवसेनेचे उमेदवार होते. आता मंडलिक शिंदे गटामध्ये आहेत, तर महाडिक भाजपचे खासदार आहेत. राज्यात शिंदे गट व भाजपची सत्ता आली. मात्र, जिल्ह्यात शिंदे गट आणि भाजप यांचे मनोमिलन झालेलेच नाही. त्यामुळे मंडलिक यांना शिंदे गटाची उमेदवारी मिळणार की, त्यांना भाजपच्या तिकिटावर उभे राहावे लागणार, हे अद्याप अस्पष्ट आहे. शिंदे गटाने मंडलिक यांना उमेदवारी दिली तर महाडिक त्यांना मदत करणार का? हा प्रश्न आहे.

त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे निकटवर्तीय व्ही. बी. पाटील यांच्या नावाचे सूतोवाच करून राष्ट्रवादीच्या राजकारणाला बत्ती दिली आहे. व्ही. बी. पाटील यांचे नाव जाहीर करण्यामागे मुश्रीफ यांनी बर्‍याच गोष्टींचा अभ्यास केला असावा. विशेषत: कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर, कागल, चंदगड या मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आपल्याला ही निवडणूक सोपी आहे, असा त्यांचा अंदाज असावा. मात्र, काही वर्षांपूर्वी जिल्हा बँकेतील राजकारणावरून मुश्रीफ आणि व्ही. बी. पाटील एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी या दोघांमध्ये झडल्या होत्या. मात्र, राजकारणात योग्यवेळी योग्य ते विसरायचे असते आणि हवे तेवढेच लक्षात ठेवायचे असते, हेच यातून दिसून येते. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हेसुद्धा शिंदे गटात दाखल झाले आहेत.

यापूर्वी 2014 ची निवडणूक भाजपच्या, तर 2019 ची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने लढविलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आता कोणाच्या साथीने लढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण, शेट्टी यांनी भाजप व काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष आपल्याला समान अंतरावर असल्याचे सांगून सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोणाच्या पाठिंब्यावर कोण लढणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिंदे आणि भाजप गटाचे मनोमिलन अद्याप झालेले नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या महाविकास आघाडीची एकजूट अद्याप तरी भक्कम आहे. आता आगामी निवडणुकीत कोण कोणाबरोबर राहणार, हे स्पष्ट होईल. त्याचवेळी जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. गोकुळ आणि जिल्हा बँकेत एकमेकांना मदत करणार्‍या नेत्यांमधील एकजूट या दोन कारखान्यांच्या निवडणुकीत कायम राहणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

  • चंद्रशेखर माथाडे 
SCROLL FOR NEXT