Latest

भाजप-शिंदे गट एकत्र येणार

Arun Patil

राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार येऊन आता जवळपास सहा महिने लोटले आहेत. रायगडमधील शिवसेनेचे सर्वच्या सर्व तीन आणि रत्नागिरीत दोन, तर सिंधुदुर्गात एक आणि ठाणे, पालघरचे चार आमदार असे दहा आमदार बाळासाहेबांच्या शिवसेनेत गेले. मात्र, भाजप- शिंदे गटाचे मनोमिलन हवे तसे झाले नव्हते. आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी, नारायण राणे लोकसभा निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचा प्रचार करणार, असे सांगत मनोमिलनाच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे संकेत दिले आहेत.

एका बाजूला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंचे मुख्यमंत्रिपद धोक्यात असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली होती. तर दुसर्‍या बाजूला नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांना राज्यात मंत्रिपद मिळणार, अशा चर्चा केेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरू झाल्या. नारायण राणे हे भाजपचे कोकणातील ताकदवान नेते आहेत.

भाजपचे 'मिशन 2024' सुरू झालेले आहे. यामध्ये राणेंना कोकणातून उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. नारायण राणेंकडे कोकणातील दोन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राणेंना भाजप अधिक ताकद देण्याची शक्यता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटात असलेले विनायक राऊत हे खासदार आहेत. यापूर्वी या मतदारसंघात राणेंचे पुत्र डॉ. नीलेश राणे हे पाच वर्षे खासदार होते. त्यामुळे ही जागा भाजप आपल्याकडे ठेवण्याची शक्यता वाढली आहे.

एका बाजूला शिंदे गटाकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू भैया सामंत हे लोकसभा निवडणुकीची तयारी करत असताना दुसर्‍या बाजूला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितल्याने हा मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता वाढली आहे. आणि म्हणूनच राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिंदे गटाचे मनोमिलन सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी यांच्यातील पहिला सामना विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी होत आहे. महायुतीमधील बंडखोर वेणुनाथ कडू यांची उमेदवारी मागे घेण्यात भाजपला यश आले आहे. कडू हे शिक्षक परिषदेचे प्रमुख कार्यकर्ते होते. त्यांची उमेदवारी भाजपसाठी डोकेदुखी होती. ही उमेदवारी मागे घेत महायुती विरुद्ध महाआघाडी अशी थेट लढत या मतदारसंघात होत आहे.

केसरकर हे कोकणचेच असल्याने त्यांच्यासाठी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासाठी हा प्रतिष्ठेचा सामना आहे. भाजपचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या निवडणुकीचे भाजपचे प्रभारी आहेत. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाचे पहिले मनोमिलन या निवडणुकीच्या निमित्ताने झालेले पाहायला मिळत आहे. त्यानंतरचा टप्पा हा लोकसभेचा असणार आहे. लोकसभेसाठी आता जवळपास 12 महिन्यांचा कालखंड उरल्याने या निवडणुकीची तयारीही सुरू झाली आहे.

उमेदवारांच्या यादीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव थेट आल्याने राणेंनी खरेच रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून निवडणूक लढविल्यास ही प्रतिष्ठेची लढत होणार आहे. विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी ही लढत असणार आहे. दुसर्‍या बाजूला रायगड लोकसभा मतदारसंघात खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात रामदास कदम यांना रिंगणात उतरवण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे. त्यामुळे या दोन्ही लढती 'हाय व्होल्टेज' असणार आहेत. यासाठी मनोमिलनाची प्रक्रिया सावंतवाडीपासून सुरू झाली आहे. हळूहळू हा ट्रेंड उत्तर कोकणातील ठाणे, पालघरपर्यंत येऊन पोहोचेल, अशी शक्यता आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची परंपरा ही बॅरिस्टर नाथ पै, प्राध्यापक मधू दंडवते ते सुरेश प्रभू अशी आहे. मधल्या काळात कर्नल सुधीर सावंत आणि डॉ. नीलेश राणे, विनायक राऊत यांनीही या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. यातील प्राध्यापक मधू दंडवते रेल्वेमंत्री, अर्थमंत्री या पदांवरही कार्यरत होते, तर सुरेश प्रभू रसायन, ऊर्जा, पर्यावरण, रेल्वे या खात्यांचे मंत्री राहिले. त्यानंतर कोकणातून केेंद्रात मंत्रिपद भूषविणारे नारायण राणे मंत्री ठरले आहेत. राणेंची राज्यसभेची टर्म 2024 ला संपत आहे. त्यामुळे भाजप त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता अधिक आहे.

– शशिकांत सावंत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT