Latest

भगवंतसिंग मान : शहीद भगतसिंगांच्या गावात पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

backup backup

चंदीगड ; वृत्तसंस्था : शहीद-ए-आझम भगतसिंग यांचे पैतृक गाव खटकरकला हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काँग्रेस पक्ष आणि अकाली दलाचा दारुण पराभव करीत पंजाबमध्ये जोरदार मुसंडी मारलेल्या आम आदमी पक्षाचे नवे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांचा शपथविधी सोहळा 16 मार्च रोजी शहीद भगतसिंग यांचेगाव खटकरकला येथे होणार आहे. पंजाबमधील भगतसिंगनगर जिल्ह्यात हे गाव आहे.

पंजाबचा नवा मुख्यमंत्री हा नेहमी राजधानी चंदीगडमध्ये शपथ घेत असे. मात्र, यंदा प्रथमच ही परंपरा मोडली जाणार आहे. आम आदमी पक्ष हा नेहमी 'राजकारणातील वेगळा विचार' या नवसंकल्पनेसाठी ओळखला जातो. पक्षाच्या या धोरणानुसार मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंतसिंग मान हे यावेळी चंदीगडऐवजी सरदार भगतसिंग यांच्या खटकरकला या मूळ गावी शपथ ग्रहण करतील.

सरकार स्थापनेचा दावा सादर करण्यासाठी मान हे शनिवारी राज्यपालांना भेटणार आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले असून, त्यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. निकाल हाती आल्यापासूनच पक्षाने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. स्वत: मान यांनी चंदीगडऐवजी शपथविधी सोहळा भगतसिंगनगर जिल्ह्यातील खटकरकला गावात होईल, असे गुरुवारीच स्पष्ट केले आहे.

भगवंतसिंग मान यांनी शासकीय कार्यालयांतूनही भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच फोटो लावण्यात यावेत, अशी भूमिकाही मांडलेली आहे. शपथविधीला मान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना निमंत्रण दिले आहे. विजयोत्सव साजरा करण्यासाठी भगवंतसिंग मान 13 मार्च रोजी अमृतसर येथे रोड शो करणार आहेत. त्यात केजरीवाल यांचीही उपस्थिती असेल.

SCROLL FOR NEXT