Latest

बोगस आयबी अधिकार्‍यास अटक

backup backup

मिरज : पुढारी वृत्तसेवा आयबीमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांना पाच लाखांचा गंडा घालणार्‍या अभिषेक राजेंद्र वैद्य (रा. आरग, ता. मिरज) या बोगस आयबी अधिकार्‍याचा मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषणने आवळल्या. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश सूर्यवंशी (रा. बाभळगाव, जि. लातूर) यांचा पुण्यातील हिंजवडी येथे टूर्स अँड ट्रॅव्हलसचा व्यवसाय आहे. सूर्यवंशी आणि संशयित अभिषेक वैद्य यांची पुण्यातील हिंजवडीमध्ये कार चालवत असताना ओळख झाली होती. त्यावेळी वैद्य याने सूर्यवंशी यांना आपण आयबीमध्ये अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर वैद्य याने सूर्यवंशी यांना इंजिनिअरिंग झालेल्यांसाठी 'आयबी'मध्ये जागा निघाल्या आहेत. तेथे नोकरी लावण्याचे आमिष दाखविले.

तसेच शेअर मार्केट आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास आपला फायदा होईल, असे सांगितले. त्यानुसार 'आयबी'मध्ये नोकरी आणि गुंतवणुकीच्या आमिषाने वैद्य याने सूर्यवंशी यांच्याकडून पुणे आणि आरग येथे 3 लाख 50 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर कोणतीही शंका येऊ नये यासाठी वैद्य याने 'आयबी'मध्ये नोकरी लागल्याबाबतचे वेगवेगळे बनावट ई-मेल पाठवून नोकरी लावल्याचा भास निर्माण केला. तसेच अमित पडसाळगे आणि संतोष दाहाळे या दोघांना देखील 'आयबी'मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी वैद्य याने प्रत्येकी 75 हजार रुपये, असे 1 लाख 50 हजार घेतले. ती रक्कम सूर्यवंशी यांच्या खात्यावर पाठविण्यास सांगितले. त्यानंतर सूर्यवंशी यांच्या खात्यावरील तीदेखील रक्कम वैद्य याने काढून घेतली.

'आयबी'मध्ये नोकरी लागण्याच्या आशेपोटी तिघांनी वैद्य याला पाच लाख रुपये दिले होते. परंतु तिघांना 'आयबी'मध्ये कोणत्याही प्रकारची नोकरी लागली नव्हती. संबंधित तिघांनी याबाबत वैद्य याच्याकडे वारंवार विचारणा केली. परंतु वैद्य यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरेश सूर्यवंशी यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यांच्या तपासाठी मिरज ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तपास करीत होते. त्यावेळी बोगस आयबी अधिकारी संशयित अभिषेक वैद्य हा आरग येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून त्याला अटक केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT