बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना विष पाजून बापानेही आत्महत्या करण्यासाठी विष प्राशन केले. तब्बल तीन तास अंगात विष भिनल्याने दोन्ही मुलींचा मृत्यू झाला. तर वडिलांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
अनिल चंद्रकांत बांदेकर (45, रा. रामनगर, कंग्राळी खुर्द) असे बापाचे नाव असून, अंजली (8 वर्षे) व अनन्या (4 वर्षे) या दोन मुलींचा अंत झाला आहे. या प्रकरणी अत्यवस्थ अनिल बांदेकर यांच्यावर एपीएमसी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
घरासमोर सातत्याने पडणारा उतारा, यातून आपल्यावर कोणीतरी जादूटोणा करते आहे म्हणून अनिल बांदेकर यांची मन:स्थिती बिघडली होती. यातूनच त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व सोबत आपल्या मुलींनाही विष दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी तसेच अनिल यांच्या पत्नीने दिलेली माहिती अशी की, हे कुटुंब मूळचे जुने बेळगावचे आहे. काही महिन्यांपासून कंग्राळी खुर्दमधील रामनगर दुसरा क्रॉस येथे भाडोत्री राहते. अनिल यांची सासरवाडी विजयनगर येथे आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून अनिल, त्यांची पत्नी व मुले विजयनगर येथेच राहत होते.
अनिल बांदेकर सासरवाडीत राहत असले, तरी दररोज देवासमोर दिवा लावण्यासाठी व पूजेसाठी रामगनर येथील भाडोत्री घराकडे येत होते. सकाळी नाष्टा झाल्यानंतर अंदाजे दहा ते अकराच्या सुमारास या घराकडे येऊन दिवा लावून पूजा आटोपून पुन्हा विजयनगरला जात होते. आजही घरातून ते तसेच सांगून आले होते. परंतु, येताना त्यांनी दोन्ही मुलींनाही सोबत नेले.
बुधवारी सकाळी ते घरातून निघताना पत्नी जयाला म्हणाले की, आज आपल्याला थोडेसे अत्यवस्थ वाटते आहे. डॉक्टरकडे जाऊन येतो. तेव्हा पत्नी जया यांनी होकारार्थी मान हलवली. सकाळी अकराच्या सुमारास ते रामनगरला गेले. येताना त्यांनी अनन्या व अंजलीलादेखील सोबत नेले.
पतीने डॉक्टरना दाखवले का व मुलीही सोबत गेल्या आहेत म्हणून पत्नी जया वारंवार फोन करत होत्या. परंतु, फोनला प्रतिसाद मिळत नसल्याने आधी त्या पती नेहमी जात असलेल्या दवाखान्यात पोहोचल्या.
परंतु, ते तेथे आले नसल्याचे समजल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास त्या घरी गेल्या. यावेळी दरवाजा आतून बंद होता. त्यांनी शेजार्यांना बोलावून खिडकी उघडायला सांगितली. यावेळी तिघेही निपचित पडल्याचे दिसून आले.
अनिल यांनी मुलींना नेमके केव्हा विष पाजले होते, याची माहिती मिळाली नाही. परंतु, विष प्यायल्यानंतर तीन वाजेपर्यंत बराच वेळ गेल्याने दोन्ही मुलींचा मृत्यू झाला. अनिल यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन्ही मुलींच्या मृत्यूस कारणीभूत व विष पाजून मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक मंजुनाथ बडीगेर व उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री तपास करीत आहेत.
अनिल यांच्या घरासमोर सातत्याने कोणी तरी टाचण्या टोचलेला लिंबू, हळद, कुंकू, काकणे, अगरबत्ती व अन्य करणीबाधेचे साहित्य असलेला उतारा टाकत होते. आपल्यावर कोणीतरी जादूटोणा करत आहे, असे त्यांनी पत्नीला सांगितल्यानंतर पत्नीने आपण पोलिसांत फिर्याद देऊ, काळजी करू नका, असा धीर दिला होता.
दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या घरासमोर काळी बाहुली देखील पडली होती. त्यामुळे ते अधिकच अस्वस्थ झाल्याचे पत्नीचे म्हणणे आहे. यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी सध्या तरी अशीच नोंद करून घेतली असून तपास सुरू केला आहे.
घरासमोर करणी साहित्य पडत असल्याने अनिल बांदेकर अत्यवस्थ होते. ते फरशी फिटिंगचा व्यवसाय करत होते. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून काम नसल्याने ते घरीच बसून होते. नुकतेच ते रिअल इस्टेट व्यवसायात घुसले होते. यामध्ये त्यांना आर्थिक नुकसान झाल्याचेही सांगण्यात येते.
परंतु, या सर्व कारणांतून त्यांनी मुलींना विष का पाजले? हे पोलिसांनाही अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रश्नाचे उत्तर अनिल बांदेकर हे स्वतःच देऊ शकतात. परंतु, त्यांच्यावरच अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याने या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी गुलदस्त्यात आहे.
अनिल बांदेकर यांना दोन वर्षांचा मुलगादेखील आहे. परंतु, तो लहान असल्याने व आईला सोडून राहत नसल्याने अनिल बांदेकर हे आपल्या दोन्ही मुलींसह आपल्या भाडोत्री घराकडे आले होते, अशी माहिती समोर आली आहे.