Latest

बेळगाव कँटोन्मेंट हद्दीतील 936 झाडांवर संकट

Arun Patil

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यंदा वन खात्याने साडेसहा लाख रोपे लावण्याची योजना हाती घेतली आहे; मात्र याच वन खात्याने कँटोन्मेंट हद्दीतील 936 झाडे तोडण्यासाठी 2 लाख 12 हजार 40 रुपयांचे शुल्क भरून घेत झाडे तोडण्यासाठी रितसर परवानगी दिली आहे. झाडे तोडण्याचे कंत्राट 17 लाख 67 हजार रुपयांना देण्यात आले आहे. शहरातील पर्यावरणप्रेमींनी कँटोन्मेंट बोर्ड व वन खात्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

'पर्यावरण वाचवा, रोपे लावा, बीज पेरुया, वन वाढवूया' असा नारा देणार्‍या वन खात्याने झाडे तोडण्यासाठी परवानगी दिल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कँटोन्मेंट बोर्ड हद्दीतील अंगडी कॉलेज, सावगाव रोड, फॅमिली क्वॉर्टर, ट्रेनिंग परिसर, नानावाडी, सावगाव या भागातील झाडे तोडण्यात येणार आहेत. यापूर्वी कँटोन्मेंट बोर्ड हद्दीतील 250 झाडे तोडण्यासाठी वन खात्याने परवानगी दिली होती.

सर्व्हे नं. 50 मधील 71 झाडे, जेएलआर सर्व्हे नं. 44 मधील 358 झाडे,183 सर्व्हे नं. मधील 293 झाडे व इतर ठिकाणची 214 झाडे तोडण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत शहर व उपनगरांतील मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली आहेत. त्यापैकी 250 झाडे जगवण्यासाठी पर्यावरणप्रेमी किरण निपाणीकर यांनी प्रयत्न केले होते. वन खात्याकडे झाड तोडण्यासाठी परवानगी मागताना कसरत करावी लागते.

एक झाड तोडायचे असेल, तर ते तोडणे आवश्यक आहे का, याची चाचपणी केली जाते. ज्या ठिकाणी झाड तोडण्यात येणार आहे त्या परिसरातील नागरिकांची समंती आहे का, याची पडताळणी केली जाते. त्यानंतर झाड तोडण्यास परवानगी मिळते. मात्र, एकाच वेळी 936 झाडे तोडण्यासाठी परवानगी मिळाल्याने आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे.

कंत्राटदाराकडे परवानगी

कँटोन्मेंट बोर्ड हद्दीतील झाडे तोडल्याचेनगरसेवक शंकर पाटील यांच्या निदर्शनास आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात येत असल्याने त्यांनी कंत्राटदाराकडे झाडे तोडण्याची परवागी आहे का, याची चौकशी केली. लागलीच कंत्राटदाराने झाडे तोडण्याची ऑर्डर कॉपी शंकर पाटील यांना दाखवली. वनखात्याची ती ऑर्डर कॉपी पाहून शंकर पाटीलदेखील बुचकाळ्यात पडले. या संबंधी वनखाते व कँटोन्मेंट बोर्डशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

SCROLL FOR NEXT