Latest

बेळगाव : अन् मृत्यूपुढे मैत्रीही थिजली…!

मोहन कारंडे

निपाणी; मधुकर पाटील : यमगर्णी (ता. निपाणी) येथील बिडी कॉलनीतील रहिवासी व गावोगावी फिरून फळे विक्री करणारे कुमार बाळू हवालदार (वय 43) हे दि.3 रोजी महामार्गावर निपाणीजवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हवालदार यांची घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्याच्या वर्गमित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तातडीने अडीच लाख रुपये उभे केले होते. पण, मित्राचा जीव ते वाचवू शकले नाहीत. कुमार यांच्यावर चिकोडी येथे उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मृत्युपुढे मैत्रीही काही करु शकली नाही.

30 नंबर बिडी कारखान्याजवळ थांबलेल्या ट्रकला प्रवासी रिक्षाने मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक सुरेश धोंडिबा लोखंडे (वय 32, रा. सौंदलगा) व कुमार बाळू हवालदार (वय 43, रा. यमगर्णी) असे दोघे गंभीर जखमी झाले होते.

चालक सुरेश निपाणीतून संकेश्वर येथे आंब्याचे बॉक्ससह कुमार यांना घेऊन जात होते. त्यांची रिक्षा महामार्गावर 30 नंबर बिडी कारखान्याजवळ आली असता रस्त्याच्या बाजूला बंद अवस्थेत थांबलेल्या ट्रकला धडकली. त्यामुळे रिक्षाच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. यामध्ये सुरेश व कुमार हे दोघेही रिक्षातच अडकून पडले.

दरम्यान दोघांनाही पोलिस व रस्ते देखभाल जयहिंद कंपनीच्या कर्मचार्‍यांनी येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवले. चालक सुरेश यांची प्रकृती सुधारली. मात्र, कुमार यांची स्थिती खालावली. गेल्या 27 दिवसांपासून कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यासाठी कुमारच्या वर्गमित्रांनी तासाभरात अडीच लाख रुपये गोळा केली.

कुमार यांच्यावर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी होती. त्यामुळे ते गावोगावी फिरून फळे विक्री करत होते. त्यांची आई अंथरुणाला खिळून आहे. अशा स्थितीत वर्गमित्रांनी त्याला वाचविण्यासाठी मोठी धडपड चालवली होती. सोमवारी त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयातून चिकोडीतील सरकारी रुग्णालयात दाखल हलवले होते. मात्र काळाने मंगळवारी सकाळी कुमार यांना हिरावून नेले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी,आई असा परिवार आहे.

कुमार हवालदार हा सच्चा मित्र होता. आम्ही सर्वजण विद्यामंदिर शिक्षण संस्थेत शिकावयास होतो. कुमार हा फळे विक्री करुन आपला उदरनिर्वाह करत होता. त्याचा अपघात झाल्यानंतर मित्रांनी सोशल मीडियावर संदेश फिरवून त्याच्या उपचारासाठी 2 लाख 50 रुपये गोळा केले होते. आमच्या मैत्रीतील तो एक कोहिनूर हिरा होता, इतके सारे प्रयत्न करूनही कुमार आमच्यातून निघून गेल्याचे मोठे दुःख वाटते.
– दीपक सावंत, वर्गमित्र निपाणी

SCROLL FOR NEXT