नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या अडचणींत वाढ झाली असून, लैंगिक शोषणप्रकरणी त्यांच्यावर सुरू असलेल्या खटल्यात दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू जिल्हा न्यायालयाने त्यांच्याविरोधात आरोप निश्चित केले आहेत. सिंह यांच्याविरोधात गेले वर्षभर देशातील अव्वल पैलवानांनी आंदोलन सुरू केले होते.
न्यायालयाने बृजभूषण यांच्याविरोधात 'आयपीसी'चे कलम 354 (विनयभंग), 354 ए (लैंगिक शोषण), 354 डी (पाठलाग करणे) आणि 506 (धमकी देणे) असे आरोप निश्चित केले आहेत. सिंह यांचे सहकारी विनोद तोमर यांच्याविरोधात 'आयपीसी' कलम 109 (गुन्ह्यास प्रवृत्त करणे) आणि 506 (धमकी देणे) असे आरोप निश्चित केले आहेत. तोमर हे कुस्ती महासंघाचे माजी सहायक सचिव आहेत.
बृजभूषण सिंह हे बराच काळ भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याची तक्रार गेल्यावर्षी पहिल्यांदा करण्यात आली. या प्रकरणात विनेश, साक्षी मलिक, बजरंग पुनिया, सत्यव्रत काद्रियान यांसारख्या आंतरराष्ट्रीय मल्लांनी आंदोलनाचा मार्ग निवडला. नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे अनेक दिवस धरणे आंदोलन करण्यात आले. याशिवाय मल्लांनी आपले पुरस्कारही परत केले होते. साक्षीने तर कुस्तीमधून निवृत्तीच घेतली होती. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आश्वासन दिल्यानेे नवी दिल्ली पोलिसांनी 15 जून 2023 रोजी बृजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर एकूण सहा महिलांनी आरोप केले होते. यामध्ये एक अल्पवयीन मुलगी असल्याने 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता; पण नंतर त्या मुलीने माघार घेतल्याने 'पोक्सो'चे कलम हटवण्यात आले होते. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात न्यायालयात आरोप निश्चिती झाल्यानंतर सिंह यांच्याविरोधात लढा देणार्या मल्लांनी आनंद व्यक्त केला.
टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल बजरंग याने ट्विट केले आहे की, बृजभूषण यांच्यावर शेवटी दोषारोप निश्चित झाले. त्यासाठी न्यायालयाचे आभार. महिला पैलवानांनी केलेल्या मोठ्या संघर्षाचा हा विजय आहे. मुलींना अतिशय खडतर काळातून जावे लागले आहे. हा निर्णय त्यांना थोडा दिलासा देईल. ज्यांनी महिला पैलवानांवर टीका केली होती, त्यांना आता थोडी तर शरम वाटत असेल.
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी गीता फोगट हिने म्हटले आहे की, महिल्यांच्या न्यायाच्या लढाईचा हा पहिला विजय आहे. 'देर आए, दुरुस्त आए'. आम्हाला न्यायसंस्थेवर विश्वास आहे. लवकरच आरोपींना त्यांच्या पापाची शिक्षा मिळेल.
या दिवसासाठी आम्ही अनेक रात्री गर्मी आणि पावसात काढल्या आहेत. आमचे करिअर आम्हाला सोडावे लागले आहे. त्यानंतर हा दिवस दिसला आहे. न्यायाची लढाई थोडी पुढे सरकली आहे, त्याबद्दल न्यायालयाचे आभारी आहे.