Latest

बुडणार्‍या बँकांचा इशारा

दिनेश चोरगे

अमेरिकेला आर्थिक महासत्तेपासून सर्वात जुन्या लोकशाहीपर्यंत अनेक विशेषणांनी गौरवले जात असले, तरी बदलत्या परिस्थितीत 'बुडणार्‍या बँकांचा देश' असे नवे विशेषण अमेरिकेला लागेल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. आठवडाभरात दोन बँका बुडाल्यानंतर तिसरी बँकही बुडण्याच्या मार्गावर होती. परंतु, मदतीचा हात मिळाल्यामुळे ती सावरण्यात यश आले. सिलिकॉन व्हॅली बँकेनंतर न्यूयॉर्कमधील सिग्नेचर बँक बंद झाली. पाठोपाठ फर्स्ट रिपब्लिक बँक धोक्यात आली असताना तिच्यासाठी 11 मोठ्या बँकांनी मदतीचा हात दिला. अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रावरील आर्थिक संकट अधिक गडद झाले असून, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. आर्थिक क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की, तिथे बटरफ्लाय इफेक्ट अन्य कोणत्याही क्षेत्रापेक्षा अधिक प्रमाणात जाणवतो. बटरफ्लाय इफेक्ट म्हणजे जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात फुलपाखराने पंख हलवले तरी त्याचे परिणाम अन्य कुठल्याही कोपर्‍यातील हवामानावर होऊ शकतात. त्याचप्रमाणे जगाच्या कानाकोपर्‍यातील कोणतीही वित्तीय संस्था अडचणीत आली की, त्याचे परिणाम जगभरातील बँकांपासून शेअर बाजारापर्यंत जाणवत असतात. स्वाभाविकपणे अमेरिकेतील बुडणार्‍या बँकांचे भारतावर काय परिणाम होऊ शकतील, याबाबत सर्वसामान्यांमध्ये कुतूहलमिश्रित भीती आहे. शेअर बाजारावर त्याचा परिणाम होत आहेच आणि तिथे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये गेल्या काही दिवसांत बुडाले आहेत. मात्र, आर्थिक विषयाच्या तज्ज्ञांनी भारतीय बँकिंग क्षेत्राबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. आशिया खंडातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेले भारतातील बँकिंग क्षेत्र सुरक्षित असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. अमेरिकेतील बँकिंग संकटाचा भारतातील बँकांवर फार मोठा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या काही महिन्यांमध्ये महागाई कमी करण्याच्या नावाखाली कर्जांच्या व्याजदरात सातत्याने वाढ केली आहे. अशा रितीने जर कमी कालावधीत व्याजदरात मोठी वाढ केली, तर देशातील बँकांवर व्याजदराचा बोजा वाढतो. अमेरिकेत साधारण तशीच परिस्थिती दिसून आली. फेडरल रिझर्व्ह या तेथील मध्यवर्ती बँकेने महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी मार्च 2022 पासून व्याजदरात साडेचार टक्क्यांनी वाढ केली. अमेरिकेत बँक कर्जावरील व्याजदर तेवढ्याच प्रमाणात वाढले. बँकिंग क्षेत्रातील अडचणी वाढण्यासाठी तेच प्रमुख कारण ठरले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही मे 2022 पासून व्याजदर वाढविण्यास प्रारंभ केला. कमी कालावधीत व्याजदरात अडीच टक्के वाढ केली. यामुळे ठेवींवरील व्याजदर वाढले; पण कर्जेसुद्धा महाग झाली. रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर बँका कर्जावरील व्याजदर लगोलग वाढवतात. परंतु, ठेवींवरील व्याजदर वाढविण्यासाठी तशी घाई करीत नाहीत. आता ठेवींवरील व्याजदरातसुद्धा वाढ सुरू झाली असून, कर्ज आणि ठेवींवरील व्याजदरातील तफावत कमी होत आहे. परिणामी बँकांचे व्याज उत्पन्न कमी होईल. भारतीय बँकांच्या उत्पन्नावरील हा परिणाम पुढच्या तिमाहीत दिसून येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अमेरिकेतील सध्याच्या आर्थिक संकटाने पंधरा वर्षांपूर्वीच्या आर्थिक संकटाच्या स्मृती जागवल्या आहेत. त्यावेळच्या अमेरिकेतील वॉशिंग्टन म्युच्युअलच्या पतनानंतर, आताचे संकट तेवढेच गंभीर स्वरूपाचे असल्याचे मानले जाते. फर्स्ट रिपब्लिक बँकेसाठी अमेरिकेतील अकरा मोठ्या बँकांनी मदतीचे पॅकेज जाहीर करण्याच्या घटनेनेही पंधरा वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कारण त्यावेळीही सुरुवातीला बँकांनी एकत्र येऊन कमकुवत बँकांना आर्थिक मदत केली होती. नंतर काही बँकांनी इतर बँका खरेदी करून हे संकट पसरू नये, यासाठी प्रयत्न केले होते. क्रेडिट सुईसच्या संकटानंतर जगभरातील मोठ्या बँका सावध झाल्या असतानाच अमेरिकेनेही बँकिंग क्षेत्राला आधार देण्यासाठी पावले उचलली. कारण सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक काही तासांमध्ये बुडाल्याने तेथील बँकिंग क्षेत्र संकटात सापडले. अमेरिकन सरकारने 13 मार्च रोजी सिलिकॉन व्हॅली बँकेतून पैसे काढण्यास बंदी घातल्याने ग्राहक अडचणीत आले. अधिकृत माहितीनुसार साठ स्टार्टअप्सचे सुमारे चारशे कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. पैसे अडकल्याने या स्टार्टअप्सच्या कामावरही परिणाम झाला आहे. भारतीय स्टार्टअप कंपन्यांची वर्तमान स्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने स्टार्टअप संस्थापकांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. जर बँकेतून पैसे काढण्यावर बंदी कायम राहिल्यास अनेक भारतीय स्टार्टअप्सही अडचणीत येतील. सिलिकॉन व्हॅली बँक अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करते. फेडरल रिझर्व्हने धोरणात्मक व्याजदरात घेतलेल्या आक्रमक द़ृष्टिकोनामुळे या बँकेला मोठा फटका सहन करावा लागला. दरम्यान, न्यूयॉर्कमधील सिग्नेचर बँकही बंद केल्याचे जाहीर करण्यात आले. सिलिकॉन व्हॅली बँकेपाठोपाठ दोन दिवसांच्या अंतराने ही दुसरी मोठी बँक बंद झाल्याने जगभरात खळबळ उडणे स्वाभाविक होते. क्रिप्टोकरन्सीतील गुंतवणूकदारांशी व्यवहार असलेल्या या बँकेला आभासी चलनातील दर खाली-वर होण्याचा फटका बसल्याचे मानले जाते. सिलिकॉन व्हॅली बँक बुडण्याचा हादराही या बँकेच्या बुडण्यास कारणीभूत ठरला. सिलिकॉन व्हॅली बँक बंद पडल्याने घाबरलेल्या ठेवीदारांनी सिग्नेचर बँकेतील पैसे काढून घेण्यास सुरुवात केली होती.

कॅलिफोनिर्र्यामधील फर्स्ट रिपब्लिक बँकेचा ग्राहकवर्गसुद्धा सिलिकॉन व्हॅली बँकेप्रमाणेच आहे. काही तासांत सिलिकॉन व्हॅली बँकेतून ठेवीदारांनी 40 अब्ज डॉलर काढून घेतल्याने ती बुडाली होती. फर्स्ट रिपब्लिक बँकेचीही हीच स्थिती आहे. जे. पी. मॉर्गन आणि अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून अतिरिक्त निधी मिळाल्याचे फर्स्ट रिपब्लिक बँकेने जाहीर करूनही समभाग कोसळले होते. आता अमेरिकेतील 11 मोठ्या बँकांनी फर्स्ट रिपब्लिकसाठी 30 अब्ज डॉलरचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. मदतीसाठी पुढे येऊन बँकांनी तिच्यावर विश्वास दर्शवला आहे. अमेरिकेतील बँकिंग जगतासाठी आणि पर्यायाने जगभरातील आर्थिक क्षेत्राला तारण्यासाठी हा विश्वास कितपत उपयोगी ठरेल, हे पाहावे लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT