Latest

बारावीच्या प्रश्‍नपत्रिका नेणारा टेम्पो आगीत खाक

Arun Patil

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा : नाशिक-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी 'द बर्निंग टेम्पोचा थरार' प्रवाशांनी अनुभवला. मध्य प्रदेशातून बारावी बोर्डाच्या प्रश्‍नप्रत्रिका पुण्याकडे घेऊन जाणारा आयशर कंपनीचा टेम्पो जळून खाक झाला. टेम्पोतील प्रश्‍नपत्रिका जळून त्याचीही राख झाली.

बुधवारी (दि. 23) सकाळी सहा वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात हॉटेल साई प्रसाद समोर ही घटना घडली. मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आयशर टेम्पो (क्रमांक एमपी 36, एचओ 795) नाशिकवरून पुण्याकडे जात होता. टेम्पो चंदनापुरी घाट ओलांडतेवेळी पाठीमागील बाजूने अचानक पेट घेतला. ही बाब टेम्पो चालक मनीष चौरसिया व मॅनेजर रामविलास राजपूत यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी टेम्पो रस्त्याच्या बाजूला घेतला.

घटनेची माहिती मिळताच संगमनेर नगरपालिकेचा आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही आग आटोक्यात आणली.

टेम्पोमध्ये बारावीच्या बोर्डाचे परीक्षेचे पेपर असल्याचे समजते. नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक सध्या जुन्या घाटातून सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, डोळासणे महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेत सुदैवने जीवित हानी झाली नाही.

SCROLL FOR NEXT