Latest

बारामतीतही हल्ला करणार होते संपकरी एसटी कर्मचारी

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver Oak Attack) या निवासस्थानावर गेल्या शुक्रवारी करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर बारामतीमध्ये 12 एप्रिल रोजी आणखी मोठे हिंसक आंदोलन करण्याचा या प्रकरणातील आरोपींचा बेत होता. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून धडक कारवाई केल्यानेच हा बेत फसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा हल्ला पूर्वनियोजित कटासह एक राजकीय षड्यंत्र असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

दरम्यान, या हल्लाप्रकरणात गावदेवी पोलिसांनी पुण्यातील चंद्रकांत सूर्यवंशी या पत्रकाराला बुधवारी अटक केली. त्याच्या अटकेने या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या 115 झाली आहे.

या हल्लाप्रकरणात पोलिसांनी आंदोलनकर्त्या 105 जणांना जागेवरच ताब्यात घेत पुढील कारवाई आणि तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी गतीने तपास करत त्याच रात्री अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह सिल्व्हर ओक निवासस्थानाची रेकी करणार्‍या चौघांना अटक केली.

आरोपींकडून जप्त केलेले मोबाईल, साक्षीदारांकडून मिळालेली महत्त्वपूर्ण माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज या आधारे पोलिसांनी गुन्ह्याच्या केलेल्या सखोल तपासात हल्ला हा पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट झाले. सोबतच पोलिसांना गुणरत्न सदावर्ते यांच्या राहत्या घराच्या गच्चीवरील गुप्त बैठकीची माहिती मिळाली. ज्यात त्या नागपूरमधील व्यक्ती आणि सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचा सहभाग समोर आला आहे. (Silver Oak Attack)

सिल्व्हर ओकवरील आंदोलन हिंसक करण्यासाठी आंदोलकांना मद्य पुरविण्यात आले होते. आंदोलनातील अटक 11 जणांनी मद्यप्राशन केल्याचेही वैद्यकीय तपासणीमध्ये उघड झाले होते, तर गुन्ह्यातील अटक आरोपी अभिषेक पाटील हा बारामतीमधील एका महिलेसोबत मिळून बारामतीमध्ये यापेक्षाही मोठे हिंसक आंदोलन छेडण्याच्या तयारीत होता, अशी माहिती समोर आली आहे.

आंदोलनाला हिंसक वळण देण्यासाठी भडकावू भाषणे करून ती व्हिडीओच्या माध्यमातून यूट्यूब आणि अन्य सोशल मीडिया माध्यमावर प्रसारित करण्यात येत होती. सोबतच व्हॉट्सअ‍ॅपवरील ग्रुपचाही वापर केला जात होता.

एसटी कर्मचार्‍यांकडून 530 रुपये गोळा करून यातील 85 लाख रुपये रोख दिल्याचा आणि एकूण 2 कोटी रुपये अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्याकडे पोच केल्याचा जबाब एका साक्षीदाराने पोलिसांकडे नोंदवला आहे.

SCROLL FOR NEXT