Latest

बाजरीला सुगीचे दिवस

backup backup

भरड धान्यातील एक महत्त्वाचे पीक असणार्‍या बाजरीला जगाच्या कानाकोपर्‍यात नेण्यासाठी सरकारी पातळीवरून विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत. सरकारने परदेशात बाजरीची लोकप्रियता वाढविण्यासाठी आणि बाजरीची निर्यात वाढण्यासाठी एक रोडमॅप तयार केला आहे आणि त्यावर अंमलबजावणी सुरू झाली आहे.

भारत हा कृषीप्रधान देश. आपण शेतीचा विचार केला, तर भरड धान्याला पाणी कमी लागते. मग, बाजरी असो, मका असो, नाचणी असो, ज्वारी असो किंवा अन्य प्रकारचे भरड धान्य असो. या धान्यांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही असून नसल्यासारखी असते. असे असताना देशात भरड धान्याचे उत्पादन घेण्याबाबत शेतकरी फारसे उत्सुक राहिलेले नाहीत. परिणामी, या धान्यांचे क्षेत्रही कमी होत चालले आहे. बाजरीचा विचार केला, तर जगभरात उत्पादन होणार्‍या एकूण बाजरीत भारताचा वाटा हा सुमारे 41 टक्के आहे. तथापि, येत्या काळात आपल्या देशाच्या बाजरीची चव संपूर्ण जग चाखताना दिसेल. याचे कारण आपले भरड धान्य विदेशातही लोकप्रिय ठरत आहे. बाजरीला जगाच्या कानाकोपर्‍यात नेण्यासाठी सरकारी पातळीवरून विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत. सरकारने परदेशात बाजरीची लोकप्रियता वाढविण्यासाठी आणि बाजरीची निर्यात वाढण्यासाठी एक रोडमॅप तयार केला आहे आणि त्यावर अंमलबजावणी सुरू झाली आहे.

'एपिडा'सह (अ‍ॅग्रीकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अ‍ॅथोरिटी) अन्य निर्यात संस्थांकडून भरड धान्य निर्यातीसाठी संयुक्तपणे प्रयत्न केले जात आहेत. परदेशात रोड शो, फूड फेस्टिव्हल, कॉन्क्लेव्ह आदींचे आयोजन करून भरड धान्यांकडे परदेशातील नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचवेळी निर्यातीसाठीदेखील प्रोत्साहन दिले जात आहे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान सर्व खासदारांना भरड धान्यांच्या पदार्थांचा समावेश असलेले भोजन दिले. अन्य सरकारी कार्यक्रमातदेखील भरड धान्यांच्या पदार्थांना प्रामुख्याने स्थान दिले जात आहे. बाजरी आणि अन्य भरड धान्य तसेच त्यापासून तयार होणार्‍या उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ तयार करण्यासाठी सरकारकडून सकारात्मक पाऊल टाकले जात आहे. त्याचे परिणामही हाती पडत आहेत.

चार-पाच दशकांपूर्वीची गोष्ट असेल. यासाठी राजस्थानचे उदाहरण घेता येईल. जेव्हा एखादा पाहुणा घरात येत असे किंवा तीज उत्सव असे तेव्हा घरात गोड पदार्थ म्हणून तांदूळ आणि गव्हाची पोळी तयार केली जायची. अर्थात, दररोजच्या जेवण्यात विशेषत: हिवाळ्यात बाजरी, मक्याची भाकरी, बाजरीपासून तयार केलेला पदार्थ किंवा मक्याचा दलिया, उन्हाळ्यात ओटपासून तयार केलेला दलिया, अन्य भरड धान्यांपासून तयार केलेली भाकरी आणि हिरव्या पालेभाज्या, कढी यास स्थानिक बोली भाषेत 'खाटा' असेही म्हटले जायचे, ते पदार्थ मोठ्या आवडीने सेवन केले जायचे. कालांतराने भरड धान्याची जागा गव्हाने घेतली आणि आता तर गहू, तांदूळ सोडून बहुतांश लोक जंक फूडवर भर देत आहेत. त्याचे दुष्परिणाम पाहावयास मिळत आहेत. औषधाच्या आधारे जीवन जगावे लागत आहे. इम्युनिटीदेखील कमी झाली आहे. अर्थात, ही दुसरी बाजू झाली.

भरड धान्याच्या शेतीवर कमी खर्च येतो. त्याचबरोबर पाणीही कमी लागते. मग, बाजरी घ्या, मका घ्या, नाचणी घ्या, ज्वारी घ्या अशा प्रकारचे कोणतेही भरड धान्य घ्या. यात कीड पडण्याचे प्रमाणही कमीच असते. यासाठी कीटकनाशक फवारणी करण्याचीदेखील फारशी गरज भासत नाही. असे असतानाही त्याचे उत्पादन कमी होऊ लागले आहे. विशेष म्हणजे, जगातील एकूण बाजरीपैकी भारताचा वाटा 41 टक्के आहे. राजस्थानात तर बाजरी हे खरीप पिकांतील प्रमुख पीक म्हणून ओळखले जाते. आज सर्व राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटना या शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्याबाबत विचार करत असताना भरड धान्य उत्पादनाबाबत काही गोष्टी स्पष्ट होणे गरजेचे आहे. भरड धान्याच्या निर्यातीचे मार्केटिंग योग्य रितीने होत असेल आणि ही उत्पादने बाजारात आक्रमक रणनीतीसह उतरत असतील, तर त्याचा शेवटी फायदा हा शेतकर्‍यांनाच होणार आहे. यानिमित्ताने एक कटू सत्य सांगावे लागेल. जंकफूडच्या विळख्यात सापडलेल्या जगात भरड धान्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी 2018 साल उजाडावे लागले. 2018 हे वर्ष बाजरीचे वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्यापुढचे पाऊल म्हणजे जगाला भरड धान्याचे महत्त्व पुन्हा पटवून सांगण्यासाठी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यासाठी 2021 मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रस्ताव मांडला. तेव्हा जगातील 72 देशांनी भारताच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यानुसार नवे वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. योजनाबद्ध रितीने भरड धान्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. डिसेंबरमध्ये रोम येथे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाची सुरुवातही झाली.

परकीय भूमीवर 'बायर सेलर मीट' यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. उत्पादक आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद कायम करण्याच्या कार्य योजनेवर अंमलबजावणी सुरू झाली आहे. लोकांना आता भरड धान्याचे महत्त्व कळू लागले आहे. कुपोषणाविरुद्ध भरड धान्य हे मोठे शस्त्र ठरू शकते. तसेच हायपरटेन्शन आणि मधुमेह यासारख्या आजारावर भरड धान्य हे उपयुक्त ठरू शकते, हे समजू लागले आहे. 'आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष' याचा फायदा घेण्यासाठी भारताला नव्या रणनीतीसह पुढे वाटचाल करावी लागेल. अर्थात, सरकारने दक्षिण अफ्रिका, दुबई, जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, जर्मनी, अमेरिका, इंग्लंडसह अनेक देशांत रोड शो, प्रदर्शन, फूड फेस्टिव्हल आदींचे आयोजन करण्याचा रोडमॅप आखला आहे. कालांतराने त्याचे सकारात्मक परिणाम हाती लागणार आहेत. 2018 मध्ये बाजरी वर्ष साजरे केल्यानंतर 2021-22 मध्ये बाजारीच्या निर्यातीत 8 टक्के वाढ नोंदली गेली. एकंदरीतच परदेशातील बाजारात बाजरीसह भरड धान्यांची मागणी वाढेल आणि त्याचा लाभ देशातील शेतकर्‍यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपाने मिळेल, हे निश्चित!

– नवनाथ वारे, कृषी अभ्यासक

SCROLL FOR NEXT