Latest

बहार विशेष : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज एक अलौकिक योद्धा

Arun Patil

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र आजही दीपस्तंभाप्रमाणे जगाला मार्गदर्शन करीत आहे. व्हिएतनामचे राष्ट्रप्रमुख हो-चि-मिन्ह यांच्यापासून ते भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी शिवचरित्रापासून प्रेरणा घेतली आहे. देशाचे स्वातंत्र्य युद्ध असो की, सामाजिक, राजकीय आंदोलने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या शिवाजी महाराजांच्या कार्यानेच प्रज्वलित झाली. कारण, 'स्वातंत्र्य' हे शिवाजी महाराजांचे साध्य होते आणि 'प्रभावी युद्धतंत्र' हे त्यांचे साधन होते. आज शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्यांचा वेध घेणारा हा खास लेख…

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या हजारो वर्षांच्या काल प्रवाहातील एक स्वयंप्रकाशी तेज:पुंज सूर्य! पराक्रम, साहस, त्याग, समर्पण, संघटन, नेतृत्व, राष्ट्रभक्ती या सर्व गुणांची ते सगुण साकार मूर्ती होते. म्हणून त्यांची मुक्तकंठाने स्तुती करताना संत सज्जनांच्याही मुखातून शब्द उमटले होते…

'यशवंत कीर्तिवंत। सामर्थ्यवंत वरदवंत।
पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा॥
आचारशील विचारशील। दानशील धर्मशील।
सर्वज्ञपणे सुशील। सकलांठायी॥

चहुदिशांना आसुरी सुलतानशाह्या अत्याचाराचा राक्षसी थयथयाट करत असताना अत्यंत निर्भयपणे शिवाजीराजांनी स्वराज्याचा संकल्प सिद्धीस नेला. अतिबली, महाबली परचक्रांना धूळ चारत स्वातंत्र्याचे अनमोल रत्न खेचून आणले. अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात या महामानवाने शुन्यातून नूतन सृष्टी निर्माण करून दाखवली.
मात्र, केवळ ध्येय उच्च दर्जाचे असून चालत नाही, तर त्यासाठी तिथपर्यंत पोहोचण्याच्या मार्गाचेही नियोजन आवश्यक असते. 'स्वातंत्र्य' हे शिवरायांचे साध्य होते, तर प्रभावी 'युद्धतंत्र' हे त्यांचे साधन होते.

गनिमी कावा :

शिवप्रभूंच्या अनोख्या युद्धतंत्राचं नाव होतं 'गनिमी कावा.' यामध्ये शत्रूला बेसावध ठेवणे, त्याचे सर्व अंदाज चुकवणे, कमीत कमी सैन्याचा वापर करून शत्रूचा पूर्ण पराभव करणे, अचानक हल्ला करणे व शत्रू सावध होताच सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे, अशा अनेक युक्त्यांचा अंतर्भाव होता.

शाहिस्तेखान सव्वा लाखाचं प्रचंड सैन्य घेऊन पुण्यात तळ ठोकून बसला होता. मात्र, केवळ दोनशे वीरांनी मध्यरात्री लालमहालावर छापा टाकला आणि तीन बोटे तुटताच तीन वर्षे ठाण मांडून बसलेला शाहिस्तेखान तीन दिवसांत पुणे सोडून पळाला.
गनिमी कावा यशस्वी होण्यास शत्रूची बितंबातमी मिळणे आवश्यक असते आणि त्यासाठी हवे प्रभावी हेर खाते! बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरांनी वेळोवेळी गनिमांच्या हालचाली राजांपयर्र्ंत पोहोचवल्या म्हणून तर ऐन मोगल गाभ्यात असलेले सुरत शहर शिवाजी महाराजांना लुटता आले.

युद्ध नेतृत्व करणार्‍या सेनापतीला मानसशास्त्राचेही अचूक ज्ञान हवेच. उदा., अफजलखानाला स्वत:च्या शक्तीचा अहंकार होता; मग त्याला डिवचल्यावर तो प्रतापगडाच्या पायथ्याशी यायला तयार होईल हा राजांचा अंदाज खरा ठरला किंवा अफजलखानाच्या आक्रमणामुळे आपला समाज धास्तावला आहे, हे लक्षात घेऊन आई भवानीने स्वप्नात येऊन मला द़ृष्टांत दिला आणि यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला, असे सांगून महाराजांनी समाजाचे मनाधैर्य उंचावले.
अशाप्रकारे गनिनी काव्याच्या तंत्राने अनेकदा मराठ्यांनी विजयश्री खेचून आणली.

रणक्षेत्राची निवड :

जो सेनापती शत्रूने निवडलेल्या रणांगणात न जाता आपण निवडलेल्या रणभूमीवर शत्रूला येण्यास भाग पाडतो, तो युद्धापूर्वीच निम्मी लढाई जिंकलेला असतो.

शिवाजी महाराजांवर आलेले अफजलखानाचे आक्रमण फार भयानक होते; पण जर खान प्रतापगड आणि महाबळेश्वरमधील जावळीत आला, तर त्याची अवस्था कात्रीच्या दोन पात्यांमध्ये अडकलेल्या कागदाप्रमाणे होईल, हे राजांनी हेरले आणि अफजलखानला जावळीत येण्यास प्रवृत्त केले. त्यातून अद्भुत पराक्रमाचा इतिहास घडवला.
अशाच प्रकारे तीस हजार सैन्य घेऊन कार्तलबखान कोकणात जाण्यासाठी उंबर खिंडीतून वाटचाल करू लागला. त्यावेळी त्याची अभूतपूर्व कोंडी करून मावळ्यांनी त्याचा पूर्ण पराभव केला.

दुर्गनिर्मिती :

गड-कोट हे तर राज्याचे आधारस्तंभ. गडांमुळे राज्याचे सामर्थ्य वाढते, हे लक्षात घेऊन महाराजांनी किल्ले जिंकले किंवा नवे किल्ले बांधले. त्यांच्या अखेरच्या काळात स्वराज्यातील दुर्गांची संख्या साडेतीनशेपेक्षा जास्त झाली होती.

राजांची नजर रत्नपारखी होती. एखाद्या डोंगराचे महत्त्व ओळखून ते त्याचे रूपांतर बळकट दुर्गामध्ये करत. मुरुंबदेवाच्या डोंगरावर बांधलेला 'राजगड' आणि भोरप्याच्या डोंगरावर बांधलेला 'प्रतापगड' त्याची साक्ष देतात.

समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कुरटे बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग उभारला. त्याची तटबंदी भक्कम हवी म्हणून शिशाच्या रसाचा वापर केला. 'जंजिरा' सिद्धीकडून जिंकता येत नाही म्हणून त्याच्या समोरील बेटावर 'पद्मदुर्ग' बांधून राजापुरीच्या उरावर दुसरी राजापुरी उभी केली.

राज्याभिषेकानंतर राजे दक्षिण दिग्विजयाला गेले. वेल्लोरचा किल्ला जिंकता येत नाही म्हणून समोरच्या डोंगरावर 'साजरा' व 'गोजरा' हे किल्ले बांधले. तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला त्यांनी त्यावेळी जिंकला म्हणून तेथे भविष्यात राजाराम महाराज आश्रय घेऊ शकले. म्हणून 'जैसे श्रीकृष्णाचे सुदर्शन तैसे शिवराजांचे गडकोट दुर्ग!'

संघटन कौशल्य :

अजस्र सह्याद्रीच्या मस्तकावर सशस्त्र संघटन निर्माण करून महाराजांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले. बारा मावळातील काटक, चपळ, चिवट, मनस्वी, झुंजार, धाडसी, निष्ठावान मावळ्यांची अभेद्य तटबंदी बांधली. राजांच्या सेनेत कोण, कुठल्या जातीचा याला महत्त्व नव्हते, तर कर्तृत्वाला मान होता. अफजलखानाला भेटायला जाताना अंगरक्षक म्हणून कोणा मोठ्या सरदाराला घेतले नाही, तर जीवा महालाला बरोबर घेतले; कारण तो सय्यद बंडाशी दांडपट्ट्यात मुकाबला करू शकतो म्हणून.

राजांची शिस्त कडक होती; मात्र तितकेच ते प्रेमळही होते. अफजलखान वाईला आल्यावर कान्होजी जेधे यांना सुरक्षिततेच्या कारणासाठी त्यांचा कुटुंबकबिला त्यांनी तळेगाव ढमढेरे येथे हलवण्यास सांगितले. राजाराम महाराजांचा विवाह त्यांनी लावून दिला तो देशासाठी हौतात्म्य पत्करणार्‍या प्रतापराव गुजरांच्या मुलीशी. पावनखिंडीत बाजीप्रभूंनी बलिदान केल्यावर त्यांच्या घराण्याला मानाचे पान देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. या उदाहरणांवरून राजे आपल्या सेनेवर कसे प्रेम करत होते ते दिसून येते.

बलवंत आरमार :

अदिलशाही व मोगलाई या दोन देशावरील शत्रूंशी झुंज देत असताना राजांचे समुद्राकडेही बारीक लक्ष होते. सागरावर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यांनी समर्थ आरमार निर्माण केले. जहाज कारखाना काढला. त्यासाठी अनुभवी पोर्तुगीज कारागीर बोलावले. विविध प्रकारची लढाऊ गलबते तयार केली. पश्चिम समुद्रात जलदुर्गांची मालिका उभी केली. जंजिरेकर सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यांना तोडीस तोड जबाब दिला. बसरूर येथे सागरी स्वारी केली. मराठे मस्कतपर्यंत आपली जहाजे घेऊन गेले. सागरी व्यापाराला प्रेरणा दिली. म्हणून तर भारतीय आरमाराचे जनक म्हणून शिवरायांचे नाव आदराने घेतले जाते.

नैतिक अधिष्ठान :

राजांनी जो उद्योग आरंभिला होता, त्याचे प्रयोजन काय होते? केवळ राजपदाच्या उपभोगासाठी त्यांना राज्य हवे होते काय? ही संकुचित भावना त्यामागे नव्हती; तर या भूमिपुत्रांची अत्याचारी राजवटीतून मुक्तता करायचे ध्येय त्यामागे होते. भाजीच्या देठालासुद्धा हात लावू नका, अशी आज्ञा ते अधिकार्‍यांना देत होते. कारण, इथली रयत सुखी असणं हे त्यांचे लक्ष्य होते. म्हणून हे राज्य देवा-धर्माचं होतं, न्यायनीतीचं होतं, हे तर श्रींचे राज्य होते.

शिवरायांच्या ठायी प्रभू रामचंद्रांचे चारित्र्य आणि भगवान श्री कृष्णाचे चातुर्य याचा अनोखा संगम झाला होता. म्हणून तर महाराजांचे वर्णन करताना कवयित्री पद्मा गोळे म्हणतात,

'नजर तुझी संजिवक पडता वठल्या झाडावरती
समशेरीसह लाख मावळे वीर प्रगटले भवती॥
पराभूत ही भूमी उठली शस्त्रास्त्रे परजुनिया
महाराष्ट्राला महानतेप्रत नेसी तू शिवराया॥
(लेखक पुणे येथील इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष व नामवंत व्याख्याते आहेत.)

मोहन शेटे
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT