Latest

बनावट नोटांच्या कारखान्यावर आरळे येथे छापा; तिघांना अटक

Arun Patil

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : करवीर तालुक्यातील आरळे येथे पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणणार्‍या रॅकेटचा जुना राजवाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुख्य सूत्रधार अमित मारुती काटकर (वय 30, रा. आरळे, करवीर) याच्या घरावर छापा टाकून बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. काटकरसह तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अमित काटकरसह तानाजी पांडुरंग भोगम (51, रा. भोगमवाडी, करवीर) व शाहीर सुखदेव वाघमारे (37, रा. तुळशी माढा, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने संशयितांना 9 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

बनावट नोटा छपाईप्रकरणी आणखी काही जणांच्या सहभागाच्या संशयावरून चौकशी सुरू आहे. संशयितांकडून पाचशेच्या 62 म्हणजे एकूण 31 हजार रु.च्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर अधीक्षक तिरुपती काकडे यांनी बनावट नोटा छपाईची दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. बनावट नोटांची छपाई केव्हापासून आणि किती प्रमाणात करण्यात आली, नोटा चलनात आणण्यासाठी टोळीचा वापर झाला या शक्यता गृहित धरून तपास केला जाणार आहे.

भोगमवाडी येथील वीटभट्टी व्यावसायिक नारायण पांडुरंग जाधव यांच्याकडे संशयित शाहीर वाघमारे हा कामाला होता. वाघमारेने जाधव यांच्याकडून गेल्यावर्षी काही रक्कम अ‍ॅडव्हान्सपोटी घेतली होती. या वर्षाचे काम संपल्याने जाधव यांनी त्याच्याकडे राहिलेल्या 50 हजारांच्या रकमेची मागणी केली.

वाघमारेने भोगमवाडी येथील दुसरे वीटभट्टी व्यावसायिक तानाजी भोगम याच्याशी संपर्क साधून द्यावयाच्या असलेल्या रकमेबाबत चर्चा केली.

संशयित भोगमने त्याचा नातेवाईक अमित काटकर याच्याशी संपर्क साधून 500 रुपयांच्या बनावट नोटांची मागणी केली व त्या वाघमारेला पोहोच केल्या. वाघमारेने फिर्यादी जाधव यांना काही दिवसांपूर्वी 50 हजाराच्या नोटांचे बंडल दिले.

पोलिसी खाक्याने तोंड उघडले

नोटा मोजताना काही नोटांबाबत संशय आला. त्यानंतर जाधव यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. चौकशीअंती पाचशे रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी वाघमारेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्याचा प्रतिसाद मिळताच त्याने तोंड उघडले व तानाजी भोगम व अमित काटकर यांची नावे निष्पन्न झाली.

महत्त्वाचे धागेदोरे हाती

पथकाने दोन्हीही संशयितांच्या घरावर छापा टाकला. काटकर याच्या घरात नोटा छपाईची यंत्रसामग्री आढळली आहे. त्यामध्ये लॅपटॉप, कलर प्रिंटर, स्कॅनर, नोटा छपाईसाठी लागणारे कागद असेे साहित्य आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT