Latest

बनावट गुणपत्रकांच्या आधारे मेडिकल प्रवेश

Arun Patil

खटाव / वडूज ; पुढारी वृत्तसेवा : मायणी येथील रूरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर आणि हॉस्पिटल या मेडिकल कॉलेजमध्ये कमी गुण असणार्‍यांना बनावट मार्कलिस्ट तयार करून बीएएमएस कोर्सला प्रवेश दिले असल्याच्या तक्रारीची सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश दिल्याचे निष्पन्‍न झाल्याने वडूज पोलिस ठाण्यात मनोज सुरेश कांबळे (रा. फलटण) यांनी तक्रार दाखल केली असून त्यानुसार संबंधित चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पैकी एकाला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. याबाबत वडूज पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती आणि मनोज कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2008 साली अनिरुद्ध माने याला 12 वी परीक्षेत 49.50 टक्के, मनोज निंबाळकर याला 50.17 टक्के गुण मिळाले होते. दोघांनाही बीएएमएस पदवीसाठी पीसीबी ग्रुपमध्ये लागणारे 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले नव्हते.

मायणी मेडिकल कॉलेजच्या संस्थापकांनी आणि नागपूर येथील डॉ. त्रिदीप गुहा यांनी आर्थिक व्यवहार करुन सेंट्रल बोर्ड ऑफ हायर एज्युकेशन नवी दिल्ली येथील 12 वी ची परिक्षा 52 आणि 54 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रके माने आणि निंबाळकर या विद्यार्थ्यांना मिळवून दिली. रामलाल जैन विद्यालय रेशीमबाग, नागपूर या शाळेचे शाळा सोडल्याचे बनावट दाखले जोडून त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश दिला. 2006 साली उस्मान सय्यद यालाही 12 वी परिक्षेत कमी गुण मिळाले होते.

संबंधित संस्थापक व डॉ. त्रिदीप गुहा यांनी सय्यद याला 12 वी परिक्षेत 62 टक्के गुण मिळाल्याचे गुणपत्रक आणि माधवराव अनंत इतकरी महाविद्यालय पुणे या अस्तित्वात नसलेल्या कॉलेजचा शाळा सोडल्याचा दाखला बनावट दाखला तयार करुन मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश दिला होता.

2010 मध्ये शामला पाटील या विद्यार्थीनीलाही कमी गुण असताना अधिक 61 टक्के गुण मिळाल्याचे गुणपत्रक आणि गोंदीयाच्या अस्तित्वात नसलेल्या एका कॉलेजचा शाळा सोडल्याचा दाखला संबंधितांनी आणि गुहा यांनी तयार करुन मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश दिला होता. या सर्व विद्यार्थ्यांची कागदपत्रे विद्यापीठाकडेही पाठविण्यात आली होती. हे सर्व प्रवेश देतेवेळी मोठे आर्थिक व्यवहार झाले होते. दि. 18 मे 2021 रोजी याविषयी मनोज कांबळे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार दिली होती.

स्थानिक गुन्हे शाखेने तपास करुन अनिरुद्ध माने, मनोज निंबाळकर, उस्मान सय्यद, शामला पाटील यांनी बनावट दाखले प्राचार्य अरबुने यांना देवून बीएएमएस करिता प्रवेश घेऊन पदवी घेतल्याचे निष्पन्न झाले असल्याचे कांबळे यांना लेखी कळविले आहे. त्यानंतर 4 एप्रिल रोजी कांबळे यांनी वडूज पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून एकाने अटकपूर्व जामीन घेतला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास एलसीबी करत असून त्यातून बरेच धागेदोरे बाहेर येणार आहेत.

म्होरक्यांवर कारवाई कधी होणार?

मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये लाखो रुपये घेऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक प्रवेश दिले गेले आहेत. त्या कागदपत्रांच्या आधारे अनेक बोगस डॉक्टर तयार झाले आहेत. माझ्या तक्रारीचा तपास विलंबाने करण्यात आला. त्यातही म्होरक्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात असल्याची शंका येत आहे. तपास यंत्रणेवर जिल्ह्यातील दोन मोठ्या नेत्यांचा प्रभाव आहे. या प्रकरणाचा त्वरित सखोल तपास होऊन दोषींवर कारवाई व्हावी; अन्यथा त्या दोन नेत्यांची नावे उघड करण्याचा इशारा मनोज कांबळे यांनी दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT