बंगळूर ; पुढारी वृत्तसेवा : पक्षाचे वरिष्ठ जसा आदेश देतील, त्यानुसार माझी वाटचाल असणार आहे. 25 जुलै रोजी ते कोणती सूचना करतात, त्याला मी कटिबद्ध असल्याचे सांगत मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बदल निश्चित असल्याचे दर्शवले आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलने करू नका, पक्षादेश मान्य असेल, असेही आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलाबाबत सुरू असलेल्या जोरदार चर्चांना येडियुराप्पा यांनी मौन सोडून पूर्णविराम दिला आहे. 25 जुलै रोजी आमच्या पक्षाचे अध्यक्ष जी सूचना करतील, ती पालन करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे येडियुराप्पा यांनी सांगितल्यामुळे ते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत, हे निश्चित झाल्याचे मानण्यात येत आहे.
बंगळुरातील कारचारकनहळ्ळी येथील कोदंडराम देवस्थानात लोककल्याणासाठी आयोजित धन्वंतरी यज्ञ कार्यक्रमात येडियुराप्पा सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपला राजीनामा निश्चित असल्याचे सूचित केले आहे.
संपूर्ण देशात 75 वर्षे पूर्ण झालेल्या कोणालाही अधिकार देण्यात आलेला नाही; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. येत्या 26 जुलै रोजी राज्यात आपले सरकार दोन वर्षे पूर्ण करणार आहे.
त्यामुळे 25 जुलै रोजी वरिष्ठ काय निर्णय घेतात, कोणत्या सूचना करणार आहेत, याबाबत आपल्याला काही माहिती नाही. त्यांनी कोणत्याही सूचना केल्या तरी, त्या मी पालन करण्यास कटिबद्ध आहे, असे येडियुराप्पा म्हणाले.
हायकमांड कधी सूचना करणार आहेत, याबाबत आपल्याला या क्षणापर्यंत माहिती नाही. पण, पक्षाची शिस्त शिपाई म्हणून पालन करणे आणि त्यानुसार वाटचाल करणे, हे माझे कर्तव्य आहे. 26 जुलै रोजी सरकारचा व्दिवर्षपूर्ती कार्यक्रम आहे. त्यामध्ये आपण सहभागी होणार आहे. वरिष्ठांच्या पुढील सूचनांनुसार मार्गाक्रमण करणार आहे, असेही येडियुराप्पा यांनी सांगितले.
माझ्यासाठी राज्यातील कोणत्याही भागात आंदोलने करण्यात येऊ नयेत. पक्षाच्या आदेशाच्या विरोधात जावून माझ्या हितचिंतकांनी, समर्थकांनी कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केले. मला पाठिंबा दिलेल्या मठाधिशांचा मी ऋणी आहे. मठाधिशांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास यामुळे मी धन्य झालो आहे.
पण, पक्षाच्या विरोधात कोणीही आंदोलने करु नयेत, असे ते म्हणाले. येणार्या काळात भाजप अधिक बलशाली करणे, पुन्हा सत्तेत आणणे, हेच माझे उद्दिष्ट आहे. त्यामुळे माझ्याबाबत येणार्या अफवांवर विश्वास न ठेवता, पक्षाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील राजकीय घडामोडींवर पत्रकारांनी राज्याचे प्रभारी अरूणसिंग यांना छेडले असता त्यांनी, नो कमेंटस असे उत्तर दिले. पुढील आठवड्यात आपण बंगळुरात भेटू, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. यावेळी त्यांनी सकाळी आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांची आपल्या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली. पण, या चर्चेबाबतही त्यांनी माहिती दिली नाही.
येडियुराप्पा यांची खुर्ची जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थक मंत्र्यांत चलबिचल सुरू झाली आहे. येडियुराप्पा मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले, तर आमचे मंत्रिपदही जाऊ शकते. ते फार काळ टिकणार नाही, अशी भीती सतावू लागली आहे. त्यामुळे सरकारमध्ये चलबिचल दिसून येत आहे.