बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : दोघा समाजकंटकांनी बंगळूर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध जोरदार टीका करण्यात आली. शिवाजी महाराजांमुळे आज आपण हिंदू म्हणून जगत असल्याचे सुनावण्यात आले आहे.
सदाशिवनगर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सँकी-टँकी रोडवरील शिवपुतळ्यावर दोन दिवसांपूर्वी अंधारामध्ये समाजकंटकांनी शाई ओतली. याबाबतचा व्हिडीओ काही तासांतच व्हायरल झाला. पुतळा विटंबना करून समाजकंटकांनी काय साध्य केले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बेळगावात कर्नाटक विधिमंडळ अधिवेशन भरवले जाते त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महामेळाव्याचे आयोजन केले जाते. महामेळाव्याला परवानगीपासून ते तो संपेपर्यंत पोलिस व जिल्हा प्रशासनाकडून आडकाठी केली जाते. अशा परिस्थितीतही महामेळावा यशस्वी होतो. यामुळे पोटशूळ उठलेल्या काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. कोल्हापूर येथे अनधिकृत लाल-पिवळा जाळण्यात आला. याचा सूड म्हणून काही कन्नड संघटनांनी चित्रदुर्ग येथे भगवा ध्वज जाळला. त्यातच आता समाजकंटकांनी शिवपुतळा विटंबना केल्याने सरकारकडून कोणतीकारवाई होणार? याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.
सोशल मीडियावर एका वेबसाईटने व्हिडिओ व्हायरल केला. त्यावर उमटलेल्या बहुतेक प्रतिक्रिया समाजकंटकांना वठणीवर आणणार्या आहेत. शिवाजी महाराजांमुळे आज आपण हिंदू म्हणून जगत आहोत. आधी मराठा इतिहास जाणून घ्यावा. शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे कर्तृत्व आणि हिंदवी स्वराज्याची माहिती घ्यावी. इतिहासाची माहिती घेतल्यास असे कृत्य करण्यास कुणीच धजावणार नाहीत, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नेमके काय घडले?
दोन दिवसांपूर्वी दोघा समाजकंटकांनी शिवपुतळ्यावर काळी शाई ओतली. याची माहिती मिळाल्यानंतर सदाशिवनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुतळा व परिसर स्वच्छ केला. काही घडलेच नसल्याचे दाखवण्यात आले. याविरुद्ध सुओमोटो दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला. परिसरातील सीसी टीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहेत. त्यामध्ये दोघा समाजकंटकांनी शिवपुतळ्यावर शाई ओतल्याचे दिसून आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचे प्रेरणास्थान आहेत. पण, कर्नाटकात त्यांचा अपमान वारंवार होत आला आहे. यापुढे असा प्रकार खपवून घेण्यात येणार नाही. प्रशासनाने त्यांच्यावर तीव्र कारवाई करावी. अन्यथा आम्हाला आंदोलन उभे करावे लागेल.
– प्रकाश मरगाळे
अध्यक्ष, सकल मराठा समाज बेळगावछत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न कुणीही करु नये. देशात जे हिंदू आहेत ते केवळ छत्रपती शिवाजी महारजांमुळेच. त्यामुळे सरकारने अशांवर कारवाई करावी, अन्यथा त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत.
– रमाकांत कोंडुसकर
अध्यक्ष, श्रीराम सेना हिंदुस्थानछत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कर्नाटकात सातत्याने होत आला आहे. याविरोधात अनेक तक्रारी करुनही त्याची दखल सरकार घेत नाही. भगवा हातात घेऊन निवडून आलेले लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करताता. पण, आता मराठी माणूस गप्प बसणार नाही.
– संतोष मंडलिक
अध्यक्ष, तालुका म. ए. समिती युवा आघाडी