नवी दिल्ली : बदलत्या काळानुसार टॉयलेट आणि बाथरूमचं रूपडं बदलल्याचं दिसतंय. अलीकडच्या काळात तर घरांप्रमाणेच बाथरूमचंही इंटिरिअर केलं जातं. इंडियन आणि वेस्टर्न टॉयलेटचेदेखील विविध प्रकार आढळतात. तुम्ही अलीकडे बांधल्या गेलेल्या घरांमध्ये, बिल्डिंगमधील फ्लॅट किंवा मॉलमध्ये मॉडर्न टॉयलेटचे फ्लश पाहिले असतील, तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, ती म्हणजे त्यावर फ्लशसाठी दोन बटणं दिलेली असतात. त्यापैकी एक मोठं असतं तर एक छोटं असतं. आता ही दोन बटणं का दिलेली असतात आणि त्याचा वापर कसा करायचा, ते जाणून घेऊयात.
दोन बटणं असलेल्या या प्रणालीला 'ड्युएल फ्लश सिस्टिम' म्हणतात. 'ड्युएल फ्लश सिस्टिम' ही अनोखी आणि महत्त्वाची कल्पना अमेरिकन इंटस्ट्रिअल डिझायनर व्हिक्टर पॅपनेक याच्या डोक्यात आली होती. व्हिक्टर पॅपनेकने 1976 मध्ये त्याच्या 'डिझाइन फॉर द रिअल वर्ल्ड' या पुस्तकातही याचा उल्लेख केला आहे. एक बटण एक्झिट व्हॉल्व्हशी जोडलेले असतं.
फ्लशचं मोठं बटण दाबल्याने जवळपास 6 लिटर पाणी कमोडमध्ये सोडलं जातं, तर लहान बटण दाबल्याने 3 ते 4.5 लिटर पाणी येतं. छोट्या बटणामुळे पाण्याची खूप बचत होते. आता याद्वारे पाण्याची बचत कशी आणि किती होते ते जाणून घेऊया. एका घरामध्ये सिंगल फ्लशऐवजी ड्युएल फ्लशिंग संकल्पना वापरल्यास वर्षभरात सुमारे 20 हजार लिटर पाण्याची बचत होऊ शकते. ड्युएल फ्लशची सिस्टीम बसवणं हे सिंगल फ्लशपेक्षा थोडं जास्त महाग असतं; पण तरी त्याचे फायदेही आहेत. ड्युएल फ्लश सिस्टिममुळे पाण्याच्या बिलातही कपात होऊ शकते. त्यामुळे पाण्याच्या गरजेनुसार बटणांचा वापर करता येतो.