Latest

फाईव्ह-जी युगात सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाऊ : संजय घोडावत

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : संजय घोडावत ग्रुप उभारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु, जुने सहकारी व मित्र आजही बरोबर आहेत. फाईव्ह-जी युगात येणार्‍या काळात नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न राहील. सर्व घटकांना एकत्र घेऊन पुढे जाऊ, असा विश्वास घोडावत ग्रुपचे प्रमुख उद्योगपती संजय घोडावत यांनी व्यक्त केला. संजय घोडावत विद्यापीठ आयकॉन (एसजीयू आयकॉन) पुरस्कार प्रदान समारंभप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना पत्रकारिता क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल संजय घोडावत विद्यापीठ आयकॉन (एसजीयू आयकॉन) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, एमआयटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मंगेश कराड (शिक्षण), विन्स हॉस्पिटलचे प्रमुख ज्येष्ठ न्यूरो सर्जन डॉ. संतोष प्रभू (वैद्यकीय), सांगलीची क्रिकेटपटू स्मृती मानधना (क्रीडा क्षेत्र) यांना 'एसजीयू आयकॉन' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, उद्योगपती संजय घोडावत यांचा 58 वा वाढदिवस कुटुंबीय व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला.

घोडावत म्हणाले, समाजासाठी काही तरी करण्याच्या हेतूने संजय घोडावत विद्यापीठ व स्कूल निर्माण केले आहे. या वास्तूंशी माझ्या भावना जोडलेल्या आहेत. येणार्‍या काळात विद्यापीठ मोठे बनविणार आहे.

श्रेणिक घोडावत म्हणाले, घोडावत ग्रुपची 30 वर्षांतील वाटचाल सुरुवातीला संघर्षमय, त्यानंतर व्यवसाय, उद्योगवाढीचा काळ राहिला. पुढील पाच वर्षांत व्यवसायाची 'फाईव्ह एक्स'पर्यंत वाढ करणार आहे. लोक, संस्कृती, नेटवर्क, डिजिटल, ईएसजी, ब—ँड बिल्डिंगचा प्रयत्न असणार आहे. ग्रामीण भागात व्यवसाय वाढवून 50 हजार तरुणांना रोजगार देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे.

अभिनेते प्रसाद ओक म्हणाले, कोणताही माणूस आयुष्यात कसा मोठा झाला, याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. अभिनय, संगीत व नृत्यासंदर्भातील इन्स्टिट्यूट घोडावत यांनी स्थापन करावी. पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी यांनी पुरस्काराची घोषणा केली. सूत्रसंचालन सोहम तिवडे यांनी केले. एस. एम. डिसुजा यांनी आभार मानले. यावेळी कर्नाटकच्या धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले, जयचंद घोडावत, विजयचंद घोडावत, राजेंद्र घोडावत, नीता घोडावत, श्रेया घोडावत, सलोनी घोडावत, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT