Latest

प्रेयसीचा खून करून मृतदेह खड्ड्यात फेकला

Arun Patil

मानखुर्द, पुढारी वृत्तसेवा : प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून गोणपाटात भरून उरण येथे खड्ड्यात टाकण्यात आल्याची घटना 19 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी विवाहित प्रियकरास उरण पोलिसांनी अटक केली आहे. ही तरुणी मानखुर्दमध्ये राहत होती. ती नागपाड्यातून बेपत्ता झाली होती.

मानखुर्दच्या साठेनगरमध्ये पूनम चंद्रकांत क्षीरसागर (वय 27) ही तरुणी तिच्या कुटुंबासह राहत होती. नागपाडा, सँडहर्स्ट रोड येथे ती घरकाम करण्यास जात असे. शेअर टॅक्सीने प्रवास करताना टॅक्सीचालक निजामुद्दीन रसिक अली (27) याच्याशी तिची ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. गेली चार वर्षे प्रेमसंबंध होते. मूळचा उत्तर प्रदेशच्या लखनौचा रहिवासी असलेल्या निजामुद्दीनचे लग्न झालेले होते. त्याला दोन वर्षांचा मुलगा आहे.

निजामुद्दीन मुंबईत भाड्याने टॅक्सी चालवून जे. जे. रुग्णालयाच्या आजूबाजूला पदपथावर अथवा टॅक्सीतच राहत असे. 18 एप्रिल रोजी पूनम नेहमीप्रमाणे कामाला गेली. मात्र, ती रात्री घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी मानखुर्द पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदविली. या दिवशी निजामुद्दीन याने पूनमला कल्याणजवळील खडवली येथे फिरायला नेले होते. यादरम्यान पूनमला आलेल्या काही फोनवरून निजामुद्दीन याने संताप व्यक्त करीत तिला मारहाण केली आणि तिचा गळा दाबून तिची हत्या केली.

19 एप्रिल रोजी रात्री त्याने तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून गोणपाटात भरून उरणजवळील चिरनेर येथे रस्त्याच्या कडेला दहा बारा फूट खोल खड्ड्यात फेकून दिला. इकडे मुंबई पोलिस पूनमचा शोध घेत असताना त्यांना तांत्रिक तपासावरून ती निजामुद्दीन याच्याशी त्यादरम्यान वारंवार बोलली असल्याचे समजले होते. त्यावरून पोलिसांनी निजामुद्दीनला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यावेळी त्याने हत्येची कबुली दिली. याच दरम्यान 26 एप्रिल रोजी चिरनेर येथील पोलिसपाटील संजय पाटील हे पहाटे फिरायला गेले असता त्यांना कुजलेला वास आल्याने त्यांनी आणि काही स्थानिकांनी खड्ड्यात उतरून पहिले असता त्यांना तिथे पूनमचा मृतदेह आढळला. त्यांनी याची माहिती उरण पोलिसांना दिली. निजामुद्दीनला अटक करून उरण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

लव्ह जिहादचा आरोप

हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. याची माहिती मिळताच मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी मानखुर्द येथे जाऊन मृत मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली. किरीट सोमय्या म्हणाले की, पूनमचे अपहरण करून फसवणूक करून तिची हत्या करण्यात आली आहे. लव्ह जिहादचे हे आणखी एक प्रकरण आहे. मंगलप्रभात लोढा म्हणाले, अशा घटना वारंवार होत आहेत, सरकारी जमिनीवर रोहिंग्या बांगला देशींना वसवले जात आहे. याबाबत पालिका, जिल्हाधिकारी, पोलिस अधिकार्‍यांना कळवले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT