Latest

प्राप्तीकर खात्याचे नवे नियम; घरात रोकड ठेवताना सावधान!

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  करचुकवेगिरी रोखण्यासाठी व काळा पैसा आटोक्यात आणण्यासाठी सरकारने अनेक नियम घालून दिले आहेत. एखाद्याने आपल्याजवळ किती रोख रक्कम ठेवावी, रोखीने व्यवहार करताना काय खबरदारी घ्यावी, याचे विशिष्ट नियम आहेत. घरात किती रोकड ठेवता येते, हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. या संदर्भात प्राप्तीकर विभागाने काही मर्यादा निश्चित केली आहे. ही नियमावली समजून घेणे आपल्या हिताचे ठरेल.

आपण आपल्या घरात कितीही प्रमाणात रोख रक्कम ठेवू शकतो. परंतु या रकमेविषयी तपास यंत्रणेने चौकशी केली, तर तुम्हाला त्या रोखीचा स्रोत सांगावा लागेल. पैसे योग्य मार्गाने कमावले असतील, तर तुमच्याकडे त्याची संपूर्ण कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तसेच, या पैशाचा प्राप्तीकर भरला असेल, तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. मात्र स्रोत सांगू शकत नसाल तर तपास यंत्रणा तुमच्यावर कारवाई करू शकतात.

एका वर्षात १ कोटींहून अधिक रोख बँकेतून काढल्यास २ टक्के टीडीएस भरावा लागेल. एका वर्षात २० लाखांपेक्षा जास्त रोख
व्यवहार केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. ३० लाखांहून अधिक रोख मालमत्तेच्या खरेदी-विक्रीची चौकशी होऊ शकते. तुम्ही कधीही २ लाख रुपयांपेक्षा जास्तीची खरेदी रोखीने करू शकत नाही. तसे करायचे असेल तर तुम्हाला पॅन आणि आधारदेखील दाखवावा लागेल.

क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे एकावेळी १ लाख रुपयांच्या वरच्या व्यवहाराची चौकशी केली जाऊ शकते. नातेवाईकांकडून एका दिवसात २ लाखांपेक्षा जास्त रक्कम रोखीने घेता येणार नाही, हे काम बँकेतून करावे लागेल. कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडून २० हजारांपेक्षा जास्त रोख कर्ज घेऊ शकत नाही. तुम्ही २,००० पेक्षा जास्त रोख रक्कम देऊ शकत नाही. घरी बेहिशेबी रोख रकमेसह पकडला गेलात, तर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या नियमानुसार (सीबीडीटी) तुम्हाला १३७ टक्के दंड भरावा लागू शकतो. एका आर्थिक वर्षात २० लाख रुपयांपेक्षा जास्त रोखीने व्यवहार केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. एकावेळी ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी पॅन क्रमांक देणे आवश्यक आहे..

SCROLL FOR NEXT